Headlines

Uddhav Thackeray PC Maharashtra Political Crisis Uddhav Thackeray on Shivsena New Symbol Shivsena Dhanushyaban Symbol



Maharashtra Political Crisis, 08 July 202 : शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर ४० आमदारांचा मोठा गट घेऊन एकनाथ शिंदेंनी भाजपासोबत सरकार स्थापन केलं. यानंतर दोन तृतियांश आमदार शिवसेनेतून बाहेर पडल्यामुळे मूळ शिवसेना कोणती? अशी चर्चा सुरू झाली. लोकांमधून निवडून आलेले दोन तृतियांश लोकप्रतिनिधी ज्या बाजूला असतील, तीच खरी शिवसेना, अशी भूमिका बंडखोर आमदारांकडून सातत्याने मांडली जात आहे. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. धनुष्यबाण शिवसेनेकडेच राहणार असल्याचं स्पष्ट करतानाच शिवसेना पक्ष देखील कुणीही घेऊन जाऊ शकत नाही, कायद्याने ते शक्य नाही असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

“शिवसेना काही अशी गोष्ट नाहीये की कुणीतरी घेऊन पळत सुटला. कुणी चोरून नेऊ शकेल अशी शिवसेना नाही. विधिमंडळ पक्ष किंवा रस्त्यावरचा पक्ष हा जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावर उतरत असतो. मग त्या पक्षाच्या माध्यमातून हे लोकप्रतिनिधी निवडून जात असतात. समजा की कधीकाळी एखादा आमदार पक्ष सोडून गेला म्हणजे पक्ष संपतो का? सगळे आमदार जरी गेले, तरी पक्ष संपू शकत नाही. आमदार जाऊ शकतात, पक्ष जाऊ शकत नाही”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

“मी ‘वर्षा’तून बाहेर पडल्यावर देवेंद्र फडणवीसांना फोन केला, ते म्हणाले..”, बंडखोर आमदार आशिष जैस्वाल यांचा खुलासा!

“हा संभ्रम निर्माण केला जात आहे. मी सगळ्यांना सांगतोय की तुम्ही त्यांच्या भ्रमामध्ये अडकू नका. विधिमंडळ पक्ष हा वेगळा असतो आणि नोंदणीकृत पक्ष वेगळा असतो. त्यात असंख्य मतदार, पदाधिकारी, सदस्य असतात. त्या पदाधिकाऱ्यांना हे असंच उचलून कुणी घेऊन जाऊ शकत नाही. सगळ्यांना पैशांच्या दमदाटीवर कुणी घेऊन जाऊ शकत नाही. धनुष्यबाण शिवसेनेकडेच राहील”, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली.

सोबत राहिलेल्या आमदारांचं कौतुक

दरम्यान, यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी त्यांच्यासोबत शिवसेनेत राहिलेल्या १५ आमदारांचं कौतुक केलं आहे. “विधिमंडळात जे आमदार माझ्यासोबत राहिले, त्यांचं मला जाहीर कौतुक करायचंय. त्यांनाही आमिषं दाखवण्यात आली, धमक्याही देण्यात आली. तरी काहीही झालं तरी आम्ही हटणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

धनुष्यबाण शिवसेनेकडेच

धनुष्यबाण चिन्ह कुणाकडे जाणार? याविषयी देखील संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, धनुष्यबाण शिवसेनेकडेच अर्थात उद्धव ठाकरेंकडेच राहणार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. “कायद्याने जे नमूद केलंय, त्यानुसार धनुष्यबाण कुणीही शिवसेनेकडून हिरावून घेऊ शकत नाही. ती चिंता सोडा. नवीन चिन्हाचा विचार करण्याची गरजच नाही. मी ठामपणे सांगतोय की शिवसेनेपासून धनुष्यबाण कुणीही वेगळा करू शकत नाही. मी कायद्याच्या अभ्यासकांशी बोलून मी सांगतोय. माझ्या मनाचं अजिबात सांगत नाहीये”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.



Source link

Leave a Reply