आदिवासी महिलेवर सामूहिक अत्याचार करून हत्या, ४२ दिवस मृतदेह पुरल्याचा आरोप, चित्रा वाघ म्हणाल्या… | Chitra Wagh comment on Nandurbar Gang rape case after visiting familyनंदूरबारमध्ये एका आदिवासी महिलेवर सामूहिक अत्याचार करून तिची हत्याचा झाल्याचा गंभीर आरोप पीडितेच्या वडिलांनी केला. यानंतर महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी नंदूरबारमध्ये घटनास्थळी भेट दिली आणि पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यात त्यांनी स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी बलात्कार आणि हत्याचं प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच दोषी अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी केली आहे.

चित्रा वाघ म्हणाल्या, “नंदूरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात खडशा या गावी एका आदिवासी महिलेवर सामूहिक अत्याचार करून हत्या करण्यात आला. तसेच पीडित महिलेचा मृतदेह लकटवण्यात आला, असा आरोप पीडितेच्या वडिलांनी केला आहे. याबाबत त्यांनी पोलिसांकडे तक्रारही केली आहे. प्रसिद्धी माध्यमांमधून पीडितेचा मृतदेह ४२ दिवस पुरून ठेवण्यात आला होता अशा बातम्या दाखवण्यात आल्या आहेत.”

“गुन्हा दाखल, आरोपीला अटक”

“या प्रकरणी नंदूरबार भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी आणि मी घटनास्थळी गेलो होतो. तेथे दिसलेली वस्तूस्थिती समोर आणण्यासाठी आम्ही पत्रकार परिषद घेत आहोत. २ ऑगस्ट २०२२ रोजी पीडितेच्या वडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. त्याच दिवशी गुन्हा दाखल झाला आणि ज्या आरोपीचं नाव घेण्यात आलं त्या आरोपीलाही अटक करण्यात आली. ५ ऑगस्टपर्यंत त्याला पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर तो न्यायालयीन कोठडीत आहे,” अशी माहिती चित्रा वाघ यांनी दिली.

“पीडितेचा मृतदेह जाळण्यात आला नव्हता”

चित्रा वाघ पुढे म्हणाल्या, “२ ऑगस्ट रोजीच धडगाव ग्रामीण पोलीस स्टेशन या ठिकाणी मृत महिलेचं शवविच्छेदन करण्यात आलं. त्यानंतर तो मृतदेह कुटुंबाला देण्यात आला. आदिवासी समाजात अंतिम संस्काराच्या दोन प्रथा आहे. एका प्रथेत मनुष्य मृत झाल्यानंतर मृतदेह जाळला जातो आणि दुसऱ्या प्रथेत मृतदेह पुरला जातो. पीडितेचा मृतदेह जाळण्यात आला नव्हता, तर पुरण्यात आला होता. त्याकडे आदिवासींची वेगळी पद्धत म्हणून कुणाला लक्ष द्यावं वाटलं नसावं, असं मला वाटतं.”

“सामूहिक बलात्कार आणि हत्येचा पीडितेच्या वडिलांकडून गंभीर आरोप”

“यानंतर जवळपास एक महिन्यानंतर ६ सप्टेंबर २०२२ रोजी पीडितेच्या वडिलांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आणि मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचं आणि नंतर खून करण्यात आल्याची तक्रार केली. यानंतर नंदूरबार पोलीस अधीक्षकांनी तात्काळ पुन्हा एकदा मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यासाठी मुंबईला पाठवण्याचा निर्णय घेतला,” असं वाघ यांनी सांगितलं.

“मृतदेह कुजल्याने केमिकल अॅनालिसिस”

यासाठी प्रथम न्यायदंडाधिकारी यांची परवानगी घेत १२ सप्टेंबरला तो मृतदेह शवविच्छेदनासाठी पुन्हा एकदा मुंबईत जे. जे. रुग्णालयात पाठवण्यात आला. मृतदेह कुजला होता. त्यामुळे केमिकल अॅनालिसिस करण्यात आलं. त्याचा अहवाल अद्यापही मिळालेला नाही. त्यासाठी पोलीस थांबलेले आहेत,” असंही चित्रा वाघ यांनी नमूद केलं.

“पोलिसांनी महत्त्वाच्या पुराव्याची दखल घेतली नाही”

यावेळी चित्रा वाघ यांनी तपास अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले. त्या म्हणाल्या, “या प्रकरणात धडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक आणि तपास अधिकारी यांनी अक्षम्य हलगर्जीपणा केला आहे. पीडित मुलीने शेवटचा कॉल तिच्या भावाला केला होता. त्यात एक ओळखीच्या आणि दोन अनोळखी व्यक्तींनी माझ्यावर बलात्कार केल्याचं आणि ते मला मारून टाकणार आहेत, असं सांगितलं होतं. इतका महत्त्वाचा पुरावा असलेला फोन पोलीस निरिक्षकांना दिलेला असताना त्यांनी त्याची दखल घेतली नाही.”

“शवविच्छेदन करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून बेजबाबदार वक्तव्य”

“पोलिसांनी त्याचवेळी कलम ३७६ ए. डी. आणि ३०२ नुसार गुन्हा दाखल व्हायला हवा होता. मात्र, त्यासाठी बराच कालावधी लागला. एवढंच नाही, तर धडगाव ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनीही हे प्रकरण बलात्काराचं असल्याचं पोलिसांनी सांगितलं नसल्यानं तशी तपासणी केली नाही, असं बेजबाबदार आणि धक्कादायक वक्तव्य केलं. त्याच्या ऑडिओ क्लिप्स उपलब्ध आहेत,” अशी माहिती चित्रा वाघ यांनी दिली.

“दोषी अधिकाऱ्यांची बदली नको, निलंबन करा”

“या प्रकरणी दोषी आढळलेल्या एक पोलीस निरिक्षक, तपास अधिकारी आणि चार पोलीस कॉन्स्टेबल यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. त्यांची बदली नको तर निलंबनच व्हायला हवं, अशी मागणी आम्ही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.

“डॉक्टरांची समिती नेमून दोषींवर कारवाई करा”

वाघ पुढे म्हणाल्या, “या प्रकरणातील सत्य समोर आणण्यासाठी डॉक्टरांची एक समिती नेमावी आणि जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही आम्ही केली आहे. नंदूरबार भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी विशेष तपास पथक नेमण्याची मागणी केली आहे. त्यात पोलीस उपाधीक्षक, महिला सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि एक पोलीस निरिक्षक यांचा समावेश असणारं एक पथक बनवण्यात आलं.”

हेही वाचा : मंत्रीपद मिळताच संजय राठोड यांचा चित्रा वाघ यांना इशारा; म्हणाले “मी आत्तापर्यंत शांत होतो, पण आता…”

“एसआयटीचे प्रमुख बदला”

“असं असलं तरी विशेष तपास पथकाच्या प्रमुखपदी गुन्हा घडला त्या भागाच्या पोलीस उपाधीक्षकांना नेमण्यात आलंय. त्यामुळे या प्रकरणाचा निष्पक्ष तपास होण्यासाठी पथकाचं प्रमुख म्हणून इतर कार्यक्षेत्रातील उपाधीक्षकांना नेमावं, अशी मागणी आम्ही केली आहे,” असंही त्यांनी सांगितलं.Source link

Leave a Reply