Headlines

ग्रामस्थांच्या सतर्कतेने कोल्हयास मिळाले जीवनदान

सोमवार – दि. १८ ऑक्टोबर रोजी पहाटे पाच वाजता रानमसलेतील शेतकरी भागवत शिंदे आपल्या शेतात कांद्याला पाणी देण्यासाठी गेले असता एक कोल्हा त्यांना बसलेला दिसला. शक्यतो कोल्हा हा एकदम भित्रा प्राणी असतो कुठलंही चाहूल लागताच लगेच पळून जाणारा. परंतु शिंदे यांना पाहिल्यावर देखील तो तिथेच बसला होता. काही वेळानंतर शिंदे आपल्या शेतात पाणी दिल्यानंतर सुद्धा त्याठिकाणी तो कोल्हा बसून राहिला होता. त्या कोल्ह्याला काहीतरी झाले असावे म्हणून जवळ जाऊन पाहिलं असता त्याच्या दोन्ही पायाला जखम दिसून आली. शिंदे यांनी सदर घटनेची माहिती प्रभाकर गायकवाड यांना दिली तीच माहिती गायकवाड यांनी साम TV चे पत्रकार विश्वभूषण लिमये यांना दिली. लिमये यांनी क्षणाचाही विलंब न करता वाईल्डलाईफ काँझर्वेशन असोसिएशनचे सदस्य सुरेश क्षीरसागर यांना दिली.

WCAS चे सदस्य सुरेश क्षीरसागर आणि संतोष धाकपाडे हे काहीवेळातच माळढोक पक्षी परिक्षेत्र नान्नज येथील वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी जावळे मॅडम यांना भेटून सदर घटनेची माहिती दिली. जावळे मॅडम यांनी जखमी कोल्ह्याला रेस्क्यू करण्यासाठी मोबाईल व्हॅन गाडी पाठवून दिली.

घटनास्थळी पोहचल्यानंतर तो जखमी अवस्थेतील कोल्हा एका झाडाखाली सावलीत आराम करत असताना WCAS चे सदस्य व वन कर्मचारी यांना दिसला. रानमसलेतील शेतकऱ्यांनी स्थानिक मेडिकल मधून औषध आणून त्या कोल्ह्याच्या पायावर असलेल्या जखमेवर लावून घेतले होते. तसेच काही बिस्कीट व पाणी देखील त्यानी पाजलेले होते.

WCAS चे सदस्य व वन कर्मचारी यांनी त्या जखमी कोल्ह्याला शेतकरी यांच्या मदतीने एका पिंजऱ्यात बंद केले. त्यानंतर प्राथमिक उपचारासाठी वडाळा येथील पशु वैद्यकीय दवाखान्यात दाखविण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्या जखमी कोल्ह्याला माळढोक पक्षी अभयारण्य क्षेत्र नान्नज येथे घेऊन आले.

त्या जखमी कोल्ह्याला पुढील उपचारासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी जावळे मॅडम व सोलापूर वनविभाग चे वनरक्षक अनिता शिंदे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली राहात ऍनिमलकडे सोपविण्यात आले आहे. त्या कोल्ह्याचा उपचार राहतचे डॉक्टर आकाश जाधव व भीमाशंकर विजापुरे हे करत आहेत.

या जखमी कोल्ह्याच्या रेस्क्यू आणि उपचारासाठी WCASचे सदस्य सुरेश क्षीरसागर,संतोष धाकपाडे, माळढोक पक्षी अभयारण्य क्षेत्र नान्नज येथील कर्मचारी मारुती गवळी, बाबा साठे, दादा दरेराव, दत्तात्रय कसबे, राजेंद्र जाधव, हनुमंत सुपाते, शेतकरी भागवत शिंदे, पार्वती शिंदे, किरण शिंदे, सिकंदर शेख, नाजूकबी शेख, समीर शेख, शिवराई फौंडेशनचे नंदकुमार गरड, दीपक लोहार, गोपाळ गरड यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply