Headlines

शिक्षक म्हणजे – कोरी पाटी असणाऱ्या बालकांना कृतीशील बनवून त्यांचं जीवन फुलवणारा गुरु

समाज घडविण्याचे सामर्थ्य ज्या शिक्षकांच्या जवळ आहे तो शिक्षक कसा असावा याची चतुसूत्री विनोबा भावे यांनी एके ठिकाणी सांगितली आहे. ते म्हणतात विद्यार्थी शिक्षक परायण असावा ,शिक्षक विद्यार्थी परायण असावा,दोघेही ज्ञान परायण असावेत.आणि ज्ञान हे सेवा परायण असावे हे लक्षात घेऊन जीवनाची पुढील वाटचाल करता करता शैक्षणिक क्षेत्रामध्ये येऊ घातलेली चिंताजनक अरिष्ट दूर करण्यासाठी समाजप्रबोधनाचा पाईक या नात्याने संघर्षात सुद्धा राहू या.

पुढारलेला असो अथवा प्रगतीच्या मार्गावरील देश असो सर्वाना शिक्षण ही अत्यावश्यक गोष्ट झालेली आहे हे सर्वांनीच मान्य केलेय. अशा महत्वपूर्ण शिक्षणव्यवस्थेचा खराखुरा कणा असतो शिक्षक. शिक्षणात अभ्यासक्रम सुधारले, भव्य इमारती झाल्या, शैक्षणिक साहित्याने शाळा सुसज्ज झाल्या, अगदी डिजिटल क्लासरूम झाल्या तरीसुद्धा यातला कोणताही घटक शिक्षकाची जागा घेऊ शकत नाही हे मात्र निश्चित आहे. कोरी पाटी असणाऱ्या बालकांना कृतीशील बनवून त्यांचं जीवन फुलवणारा,विद्यार्थ्यांना आयुष्यात यशस्वी करण्याचा प्रयत्न करणारा महत्त्वपूर्ण घटक असतो शिक्षक.

अशा शिक्षक वर्गाला जनमाणसामध्ये मानाचं स्थान ज्या ज्या महामानवांनी मिळवून दिलं त्यात महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले ,छ.शाहू महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महाराजा सयाजीराव गायकवाड ,भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन,डॉ. जे पी नाईक, कर्मवीर भाऊराव पाटील अशांचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. यातील बहुतांश मंडळी स्वतः शिक्षक तर होतीच पण समाजातल्या तळागाळातल्या जनतेला शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी अग्रेसरपणे काम करणारी होती.

अशापैकीच माजी राष्ट्रपती राधाकृष्णन यांचा जन्मदिन पाच सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. राधाकृष्णन म्हणजे तल्लख बुद्धी, ओघवते वक्तृत्व,सखोल व्यासंग आणि शिकवण्याची हौस या गुणांच्या बळावर शिक्षण क्षेत्रात उत्तुंग यश प्राप्त केलेले व्यक्तिमत्व होते. म्हणूनच त्यांचा गौरव सर्वत्र झाला होता. त्यांच्या या अंगच्या गुणांची अंगीकारता शिक्षण क्षेत्रातील सर्वानी घ्यावी या उद्देशाने कदाचित या शिक्षक दिनाची निर्मिती केली गेली असावी. खरंतर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या महामानवांनी शाळा सुरू केल्या. कर्मवीर भाऊराव पाटलांनी पायी अनवाणी फिरून मुले शाळेकडे आणली.रात्रदिवस खस्ता खाऊन शाळा चालवल्या.आंबेडकरांनी प्रचंड शिक्षण घेऊन या भारतातल्या समस्त जनतेला शिका संघटित व्हा संघर्ष करा हा मूलमंत्र दिला. समाज परिवर्तनाचा मोठा लढा उभारला.अशा सर्वांनाच शिक्षकदिना निमीत्त क्रांतीकारी अभिवादन.

समाज मानव आणि शिक्षण या तीन गोष्टींचे अतूट नाते आहे.समाजात सुखासमाधानाने राहता यावं.आपली कुणाकडून फसवणूक होऊ नये,सन्मानाने जगता यावं म्हणून माणसाला शिक्षणाची गरज असते.पण समाज रचना जशी पालटते सुखदुःखाच्या कल्पना जशा बदलतात तसा शिक्षणाचा चेहरामोहरा सुद्धा पालटतो. स्वातंत्र्यपूर्व काळातील शिक्षण, स्वातंत्र्यानंतरचे 40 ते 45 वर्षातले शिक्षण ,1990 नंतरचे खाजगीकरण जागतिकीकरण उदारीकरणाच्या रेट्याच्या काळातील शिक्षण, सक्तीच्या मोफत शिक्षणाचा हक्क अधिकार अधिनियम लागू केल्यानंतर चे शिक्षण या सगळ्यांमध्ये निश्चित आपल्याला फरक आढळून येईल.

आज तर आपण म्हणतो की ज्ञानाचा परीस्फोट झाला आहे. कालचे ज्ञान आज शीळे ठरत आहे.नवीन शैक्षणिक धोरण २०२० ने समाजात प्रचंड संभ्रम केल्याचे चित्र डोळ्यासमोर आले आहे.अगदी जलद होणार्या समाजातल्या वेगवेगळ्या सामाजिक आणि राजकीय बदलांच्या संदर्भामुळे माणसांच्या मनावरील ताण,असुरक्षितता, माणूसघाणी वर्तणूक, मानसिक अनारोग्य ,गुन्हेगारी यात वाढ होत चाललेली दिसतेय.हे चित्र या लोकशाही व्यवस्थेला बरोबर नाही. त्यामुळेच मागे एकदा या शिक्षण व्यवस्थेने मूल्य शिक्षणाचा जादा तास सुरू केला होता. तो पुन्हा एकदा स्वतंत्रपणे शाळाशाळांतून सुरू करावा असे बोलले जातेय.याद्रृष्टिनेही शिक्षकांनी सतर्क राहयला हवे्.

शिक्षण ही बाब समाजातल्या मूठभर लोकांची मिरासदारी राहता कामा नये हा लोकशाहीतला उच्च विचार असतो. मात्र स्वातंत्र्याच्या 74 वर्षांनंतरही शिक्षणाच्या समान संधी समाजातल्या तळातल्या घटकापर्यंत पोहोचल्या का? असा प्रश्न उपस्थित झाला तर त्याचे उत्तर नाही असेच दिले जाते. म्हणूनच या शिक्षण व्यवस्थेतला सर्वात महत्त्वाचा घटक शिक्षक या नात्याने फार मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. बदलत्या काळात ज्ञानदानाची कल्पना मागे पडून स्वयंअध्ययन पद्धत, ज्ञानरचनावाद पुढे आला. त्यासाठी शिक्षक हा उपक्रमांचा नियोजन बनला तरच शिक्षणातून गतिमान व चाकोरीला चिकटून न राहणारा विद्यार्थ्यी तयार होईल.त्यासाठी शिक्षकांनीसुद्धा सतत नवनव्या ज्ञानाशी संपर्क ठेवून स्वतः नेहमी अध्ययनशील राहिले पाहिजे .यासाठी ची जाणीव करून देणारा दिवस म्हणजेच शिक्षक दिन असावा असं मला वाटतं.

संवेदनशील मनाचा ,विद्यार्थिनिष्ट ,जिज्ञासू, समाजाभिमुख आणि कर्तव्यदक्ष असा शिक्षक समाजाचा भाग्यविधाता ठरत असतो. अशा शिक्षकाला समाज शिरोधार्य मानतो हे लक्षात घेऊन समाजातील परिवर्तन व शिक्षण विचारातला बदल याचा संदर्भ लक्षात घेऊन समाजात त्याने आपली भूमिका पार पाडली पाहिजे. शिक्षक वर्गाने आपली भूमिका पार पाडताना आपण लोकशाहीत वावरत आहोत. देशाने आपल्याला संविधान दिले आहे .या संविधानामध्ये आपले हक्क आणि कर्तव्य आहेत. ते विद्यार्थ्यांच्या वर जास्तीत जास्त बिंबवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करायला हवा. त्याच बरोबर ज्या उदात्त उद्देशाने आपण शिक्षण क्षेत्रात पाऊल ठेवले तो उद्देश सर्वप्रथम लक्षात घ्यायला हवा.

शिक्षकांच्या वर होणाऱ्या अन्यायाविरोधात पेटून उठायला हवे.आज फार गुंतागुंतीची परिस्थिती आहे.शिक्षकांना अनेक प्रकारची अशैक्षणिक कामं करायला लागतात. कितीतरी चांगले आदर्श शिक्षक यांना मूळ कामापासून वंचित करून कार्यालयीन अशैक्षणिक कामांमध्ये गुंतवलं जातयं. लेखनिकाच काम दिलं जातंय. वेगवेगळ्या सर्वेच काम दिलं जातंय. अशैक्षणिक काम जर वाढत चालली तर शिक्षणातील गुणवत्ता राहणार कशी? याबाबत समाजातल्या सर्व घटकांनी विचार करावा असं मला वाटतं.एका बाजूला शिक्षणाचा दर्जा सुधारला पाहिजे, गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे अशी समाजाच्या सर्व थरातून चाललेली ओरड आणि दुसर्या बाजूला शिक्षकावर पडणारा अशैक्षणिक कामांचा भार याकडे निमूटपणे पाहण्याची तटस्थ वृत्ती हे चित्र सुद्धा बरोबर वाटत नाही.

5 सप्टेंबर या शिक्षक दिनाच्या निमित्ताने सर्व थरातील शिक्षक बंधू-भगिनींना आम्ही शुभकामना देताना समाज घडविण्याचे सामर्थ्य ज्या शिक्षकांच्या जवळ आहे तो शिक्षक कसा असावा याची चतुसूत्री विनोबा भावे यांनी एके ठिकाणी सांगितली आहे. ते म्हणतात विद्यार्थी शिक्षक परायण असावा ,शिक्षक विद्यार्थी परायण असावा,दोघेही ज्ञान परायण असावेत.आणि ज्ञान हे सेवा परायण असावे हे लक्षात घेऊन जीवनाची पुढील वाटचाल करता करता शैक्षणिक क्षेत्रामध्ये येऊ घातलेली चिंताजनक अरिष्ट दूर करण्यासाठी समाजप्रबोधनाचा पाईक या नात्याने संघर्षात सुद्धा राहू या. शिक्षक विद्यार्थी यात कोरोना काळात पडलेली दरी दूर करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहू या. गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आपल्यावरील अशैक्षणिक कामांचा बोजा कसा कमी करता येईल याचा पाठपुरावा शासनाकडे करूया. तरच भविष्यकाळ तुम्हा आम्हासाठी उज्वल ठरेल.





ले.मारुती बळवंत शिरतोडे , जिल्हा परिषद शाळा नं. 2 पलूस रा. वाझर तालुका खानापूर जिल्हा सांगली

Leave a Reply