लग्नातील खर्चिक कार्यक्रमाला फाटा देत सुर्डीच्या शेख कुटुंबियांनी केली सामाजिक संस्थेला मदत

वैराग /प्रतिंनिधी – लग्नातील अवाढव्य आणि खर्चिक कार्यक्रमाला फाटा देत बार्शी तालुक्यातील सुर्डीच्या शेख कुटुंबियांनी आपल्या मुलाच्या लग्नात प्रार्थना फाउंडेशन या सामाजिक चळवळीत काम करणार्‍या संस्थेला 11 हजार 111 रुपयांची मदत केली. त्यांच्या ह्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोल्हापूर येथे पत्रकारिता करणारे पैलवान मतीन शेख यांचा विवाह वैराग येथील युसुफ सय्यद यांच्या मुलीशी 14 नोव्हेंबर रोजी पार पडला. मतीन शेख हे स्वत: पत्रकार आणि पैलवान आहेत. सामाज कार्यात ते सतत अग्रेसर असतात.कोल्हापुरातील थुंकी मुक्त चळवळ , खेळाडूंनी व्यसनापासून दूर राहावे अशा अनेक चळवळी मध्ये त्यांचा सहभाग आहे.

लग्न हे आयुष्याचा एक अस्वमरणीय असा क्षण असतो. अनेक जण लग्नात भरपूर खर्च करत असतात. बॅण्ड-बाजा, नवदेवाला बसायला घोडा ,डीजे ,डॉल्बी ह्या सर्व गोष्टींवर खर्च करत असतात. या सर्व खर्चाला फाटा देत पत्रकार मतीन यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी असा निर्णय का घेतला ? वाचूया मतीन शेख यांच्या लेखणीतून…

लगीन म्हणलं की आमच्या इकडे एकरात मंडप, जेवणाच्या पंगतीवर पंगती, बॅण्ड-बाजा, नवदेवाला बसायला घोडा, वरात, अलीकडे आलेला तो डी.जे, असा बरचसा खर्चिक कार्यक्रम… मला हे नको होतं. आपल्या लग्नावेळी या गोष्टींना जरा फाटा देत काही तरी सामाजिक उपक्रम घेत नवा पायंडा पाडावा असं मनात योजलं होतं. पत्रकारिता करत असताना मिळणाऱ्या मासिक मानधनातून माझी बचत सुरु होती.१११११ रुपये जमवले. ही रक्कम योग्य ठिकाणी मार्गी लागावी या हेतूने प्रार्थना फाऊंडेशन  एक सामाजिक चळवळ चालवणारे प्रसाद मोहिते यांची निवड केली.

प्रसाद गेल्या काही वर्षापासून वंचित, अनाथ मुलांचा संभाळ करत आहेत. या कामासाठी त्यांनी स्वतःची पाच एकर जमीन देखील विकली. पत्नी अनु यांना सोबत घेत त्यांनी भिक मागणाऱ्या, रस्त्यावर फिरणाऱ्या मुलांना आसरा देत शिक्षणाच्या प्रवाहात आणलं, मायेची उब दिली. निराधार वृद्धांचा संभाळ करत आहेत. सध्या ते प्रार्थना बालग्राम व वृद्धाश्रम उभारणीचे काम सुरु आहे. निम्म्यापर्यंत बांधकाम आले आहे. बांधकामासाठी लागणाऱ्या विटा, सिमेंटच्या खर्चासाठी आपली रक्कम देता येईल असं डोक्यात आलं….

आणि लग्न सोहळा व बालदिनाचे औचित्य साधत माझ्या पत्रकारितेच्या मानधनातून जमवलेली छोटीशी रक्कम व शैक्षणिक साहित्य प्रसाद यांचा सन्मान करत प्रार्थना फाऊंडेशनला सुपूर्द करण्यात आली. यावेळी आमचे मामे कुस्ती सम्राट पै.अस्लम काझी, मोठे मामा सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अफसर काझी. वडील महिबूब शेख या सर्वांच्या हस्ते हा उपक्रम पुर्ण केला.

बाकी यात काय मोठ्ठेपण नाही. किंवा खुप थोर कृती ही नाही. परंतू या समाजातील वंचित घटकाचे आपण काही तरी देणे लागतो ही जाणिव सतत राहावी. त्यासाठी आपण काही तरी विधायक कृती करुन, निरर्थक गोष्टी मागे सोडून वेगळा पायंडा पाडायला हवा यासाठीच हा अट्टाहास!   – पत्रकार , पैलवान  मतीन शेख.  

Leave a Reply