Headlines

सोलापुरात राष्ट्रवादीच्या विस्ताराला अडथळा ; नव्या राजकीय समीकरणांचा परिणाम

[ad_1]

एजाज हुसेन मुजावर, लोकसत्ता 

सोलापूर : माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची साथ सोडल्यानंतर गेल्या पाच वर्षांत सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद घटली आहे. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात आघाडीतील घटक पक्ष शिवसेना आणि काँग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादीने सत्तेचा लाभ उठवत स्वत:ची ताकद वाढविण्याचा प्रयत्न केला. यात जिल्हा ग्रामीणपेक्षा सोलापूर शहरात पक्षाला उभारी मिळण्याची चिन्हे दिसत असतानाच राज्यात मोठे राजकीय नाटय़ घडून महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी भाजपबरोबर जाऊन सत्ता मिळविल्यानंतर राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्याचा फटका सोलापुरात महापालिका ताब्यात घेण्याचे राष्ट्रवादीचे स्वप्न भंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

  माजी महापौर महेश कोठे यांनी दहा वर्षांपूर्वी सुशीलकुमार शिंदे यांच्यावरील निष्ठा सोडून स्वत:चे आमदारकीचे घोडे गंगेत न्हाण्यासाठी काँग्रेसमधून शिवसेनेत उडी मारली होती. त्याच सुमारास कोठे यांच्याच तालमीत तयार झालेले वादग्रस्त पार्श्वभूमी असलेले तौफिक शेख यांनीही २०१४ साली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसमधून सोयीनुसार एमआयएममध्ये जाऊन सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. धार्मिक ध्रुवीकरणाच्या प्रयोगातून कोठे आणि शेख यांनी बघितलेले आमदारकी स्वप्न झटक्यात भंग पावले. नंतरच्या पाच वर्षांत स्थानिक राजकीय समीकरण बदलले. पुढील २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीत महेश कोठे यांना शिवसेनेने उमेदवारी नाकारली. तर तिकडे पलीकडे एमआयएमचे तौफिक शेख हे कर्नाटकातील रेश्मा कडेकनूर यांच्या हत्येप्रकरणी तौफिक शेख हे तुरुंगात गेले. परिणामी इकडे एमआयएममध्ये त्यांचे भवितव्य धोक्यात आले.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसने ताकद वाढविण्यावर भर दिला असता महेश कोठे यांनी विचारपूर्वक शरद पवार यांच्या संपर्कात येऊन आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीची सत्ता प्रस्थापित करून दाखविण्याचा विश्वास दिला. शरद पवार आणि अजित पवार यांनीही कोठे यांच्यावर विश्वास ठेवून सोलापूरच्या पक्षाची संपूर्ण सूत्रे कोठे यांच्याकडे दिली. त्यामुळे पक्षातील काही जुनी प्रस्थापित मंडळी दुखावली.

त्यातच कोठे यांनी काँग्रेसमधील आपले जुने मित्र माजी महापौर अ‍ॅड. यू. एन. बेरिया, नलिनी चंदेले काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांसारख्या काँग्रेसमध्ये दुखावलेल्या मंडळींना राष्ट्रवादीत आणले. एवढेच नव्हे तर एमआयएमपासून दुरावलेले तौफिक शेख यांनाही राष्ट्रवादीच्या दारावर आणून उभे केले. त्यामुळे पवार काका-पुतणे कोठे यांच्यावर जाम खूश झालेले. या सा-या घडामोडीत स्वत:च्या सहका-यांना राष्ट्रवादीत आणणारे महेश कोठे यांनी पक्षाच्या सुकाणू समितीसह संपूर्ण पक्ष स्वत:च्या वर्चस्वाखाली ठेवला असताना स्वत: मात्र अधिकृतपणे राष्ट्रवादीत प्रवेश केला नाही.

सोयीस्कर पक्षांतर

सोलापूरचे तत्कालीन पालकमंत्री दत्ता भरणे यांच्या कच्छपी लागलेले पूर्वाश्रमीचे बसपाचे व नंतर वंचित बहुजन आघाडीत गेलेले ज्येष्ठ नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनाही राष्ट्रवादीत प्रवेश करावासा वाटू लागला. यासह इतर अनेकजण राष्ट्रवादीच्या मंडपात येण्यासाठी आतुर झाले असतानाच अचानकपणे राज्यात राजकीय नाटय़मय घडामोडी घडल्या. याच पार्श्वभूमीवर गेल्या आठवडय़ात पंढरपूरच्या आषाढी वारीत विठ्ठलाच्या शासकीय महापूजेसाठी आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महेश कोठे यांनी भेट घेतली. एवढेच नव्हे तर त्यांच्याच साक्षीने त्यांचे विश्वासू सहकारी तथा महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, मनोज शेजवाल आदी मंडळींनी एकनाथ शिंदे यांच्यावर निष्ठा वाहात त्यांच्या गटात प्रवेश केला. कोठे यांच्या डोळय़ादेखत त्यांचेच जीवाभावाचे सहकारी राष्ट्रवादीचा विचार सोडून झटक्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात गेल्यामुळे कोठे यांची एकूणच राजकीय विश्वासार्हता पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे.

 शरद पवार यांनी कोठे यांना तात्काळ मुंबईत बोलावून घेऊन खुलासा मागितला. तेव्हा आपण कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीत सोडणार नाही, असे वचन कोठे यांनी दिले खरे; परंतु त्यांची सुशीलकुमार शिंदे यांच्यापासूनची राजकीय वाटचाल लक्षात घेता कोठे यांच्याविषयीची विश्वासार्हता राष्ट्रवादीत विचार करायला लावणारी ठरल्याचे मानले जात आहे. या स्थितीत आगामी महापालिका निवडणुकीची संपूर्ण सूत्रे महेश कोठे यांच्याकडे सोपविली जातील किंवा कसे, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. दुसरीकडे एमआयएमचे तौफिक शेख यांची अडचण लक्षात पाहता त्यांना राष्ट्रवादीतच राहण्याशिवाय तरुणोपाय नाही, असे सांगितले जाते. तर वंचित बहुजन आघाडीपासून दूर झालेले आनंद चंदनशिवे यांची कोंडी झाली आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *