“खड्ड्यांवरून कल्याण डोंबिवली पालिकेचे नाव ‘केडीएमसी बुक ऑफ अजब रेकॉर्ड’मध्ये जाणार” | The name of Kalyan Dombivli Municipal Corporation will go in the KDMC Book of Strange Records from the pits msr 87



“ कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील पावसाळ्यापूर्वीचे आणि त्यानंतर पडणारे खड्डे भरण्यासाठी पालिका प्रशासनाने १५ कोटी १५ लाख रुपयांची तरतूद केली आहे. परंतु, पाऊस सुरू झाला तरी शहर अभियंता विभागाने पावसाळ्यापूर्वी रस्ते सुस्थितीत करण्याच्या कामाच्या निविदा प्रक्रियाच पूर्ण केल्या नाहीत. त्यामुळे मे अखेरपर्यंत शहरातील एकही खड्डा बुजविण्यात आला नाही. हेच खड्डे मुसळधार पाऊस सुरू झाल्यानंतर मोठ्या आकाराचे झाले आहेत. प्रवाशांना मनस्ताप देत हे खड्डे बुजविण्यासाठी प्रशासन आता १५ कोटींचा चुराडा करणार आहे.”, अशी टीका मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार प्रमोद पाटील यांनी केली आहे.

देखरेख करण्यासाठी विश्वासू अभियंत्यांची नेमणूक करावी –

तसेच, “पालिकेतील शहर अभियंता, बांधकाम विभाग, ठरावीक ठेकेदार यांची वर्षानुवर्षाची अभद्र युती शहरांमधील खड्ड्यांना जबाबदार आहे. त्यामुळे नवनियुक्त आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी माजी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली यांना जी महत्वाची खड्ड्यांसारखी कामे मार्गी लावणे जमले नाही. ती कामे मार्गी लावण्यासाठी स्वत: लक्ष घालून या कामांवर देखरेख करण्यासाठी विश्वासू अभियंत्यांची नेमणूक करावी.”, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली आहे.

खड्डयांची शास्त्रोक्त पध्दतीने भरणी केली जात नाही –

याचबरोबर, “खड्डे भरण्याची कामे ठेकेदाराला दिली की त्याचे कामगार मनमानेल तसे खड्डे भरणी करतात. या खड्डयांची शास्त्रोक्त पध्दतीने भरणी केली जात नाही. या कामावर देखरेख करण्यासाठी ठेकेदार, पालिकेचा पर्यवेक्षक अभियंता तेथे नसतो. त्यामुळे शास्त्रोक्त पध्दतीने न भरलेले खड्डे दोन दिवसात पुन्हा जैसे थे स्थितीत असतात. महिनाभरापासून शहराच्या विविध भागात खड्डे पडले आहेत. या कामांकडे बारकाईने कोणा अधिकाऱ्याचे लक्ष नाही. करदाता सामान्य नागरिक, नोकरदार मात्र वेळेवर कर भरणा करून वाहतूक कोंडी, खड्ड्यांचा मनस्ताप सहन करत प्रवास करत आहे.” अशी टीका देखील आमदार पाटील यांनी केली आहे.

जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी –

खड्डे भरणीच्या कामाच्या निविदा प्रक्रिया, ठेकेदारांना कामाचे आदेश मार्च, एप्रिलमध्ये देऊन मे महिन्यात पावसाळ्या पूर्वीची खड्डे भरणीची कामे पूर्ण करणे अपेक्षित असते. यावेळी प्रथमच जुलै सुरू झाला तरी शहर अभियंता विभाग पावसाळापूर्वीची आणि त्यानंतरची खड्डे भरण्यासाठी निविदा प्रक्रियाच पूर्ण करत होते. हे धक्कादायक आहे. अशाप्रकारच्या वेळकाढूपणा करणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आमदार पाटील यांनी केली आहे. तर, माजी आयुक्तांचे आजार, शहर अभियंता विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सलगच्या सु्ट्टया यामुळे ही कामे रखडली असल्याचे पालिका अभियंते सांगतात.

खड्ड्यांपुढे ठाणे पोलीस हतबल? म्हणतात, “अनावश्यक कारणांसाठी घरातून बाहेर पडू नका, किंवा…”

पालिकेचा अजब आणि गलथान कारभार –

“कल्याण-डोंबिवली पालिकेचा हा सगळा अजब आणि गलथान कारभार पाहून पालिकेचे नाव ‘केडीएमसी बुक ऑफ अजब रेकॉर्ड’ मध्ये जाणार एवढे मात्र नक्की.” असा उपरोधिक टोला आमदार पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना लगावला आहे.

१० ठेकेदार नेमून खड्डे भरणीची कामे सुरू –

पालिका अधिकाऱ्यांनी मात्र दहा प्रभागांच्या हद्दीत १० ठेकेदार नेमून खड्डे भरणीची कामे सुरू केली आहेत. आता खडी टाकून खड्डे भरले जात आहेत. पाऊस कमी झाल्यानंतर सिमेंट मिश्रणाचा गिलावा खड्ड्यांमध्ये भरण्याचे नियोजन केले आहे, असे सांगितले.

खड्ड्यांवरून मीम्स –

पालिका हद्दीतील खड्ड्यांवरुन अनेक मीम्स समाज माध्यमांवर फिरत आहेत. मिरची, लसूण, कोथिंबीर एकत्र करून तो डबा हातात घेऊन दुचाकी वरून घेऊन फिरविला तरी खड्ड्यांमुळे होणाऱ्या आदळआपटीत डब्यात आपोआप मिरची, कोथिंबीरची घुसळण होऊन चटणी तयार होते, ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन एका गंभीर जखमीला उचलून ‘अरे काय झाल’ म्हणून विचारतात, त्याने ‘मी डोंबिवलीत गेलो होतो,’ असे म्हणून डोंबिवलीतील खड्ड्यांवर भाष्य केले आहे.



Source link

Leave a Reply