सोलापूर : तिरंगा ध्वजाने दिला महिला बचत गटांना रोजगाराचा आधार | The indian flag provided employment support to women self help groups amy 95स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून राबविण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा अभियानासाठी सोलापूर जिल्ह्यात उपलब्ध सहा लाख १० हजार तिरंगा ध्वज उपलब्ध झाले. परंतु त्यातील सदोष ध्वज वेळीच दुरूस्त करून वितरण करण्याची जबाबदारी महिला बचत गटांनी यशस्वीपणे पार पाडली आहे. यात सुमारे सात हजार बचत गटांना तिरंगा ध्वजाच्या रूपाने रोजगाराचा आधार मिळाला आहे.

हर घर तिरंगा अभियानाचे नियोजन जिल्हा प्रशासनासह जिल्हा परिषद व महापालिका प्रशासनाने केले असता त्यात सुमारे सहा लाख ५० हजार तिरंगा ध्वजांची मागणी होती. त्यापैकी सहा लाख ३५ हजार तिरंगा ध्वज प्रत्यक्ष उपलब्ध झाले. तथापि, त्यापैकी सुमारे ७५ हजारांएवढे तिरंगा ध्वज सदोष आढळून आले असता त्यातील दुरूस्ती करण्यायोग्य बहुतांशी ध्वज महिला बचत गटांनी दुरूस्त केले आहेत. दुरूस्तीच्या कामाबरोबरच ध्वज वितरणाची जबाबदारीही महिला बचत गटांनी उचलली आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दाखविलेली संवेदनशीलता आणि प्रेरणेमुळे महिला बचत गटांना प्राधान्यक्रमाने ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडता येणे शक्य झाले आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या (उमेद) जिल्हा व्यवस्थापिका मीनाक्षी मडवळी यांची ही माहिती दिली.

उमेदकडे एकूण दोन लाख ६० हजार ५३८ तिरंगा ध्वज वितरण आणि दुरूस्तीसाठी आले होते. या कामासाठी २३ महिला बचत गट प्रभाग संघांनी ४५ लाख रूपयांपेक्षा अधिक भांडवल उपलब्ध करून दिले. त्यामुळे तिरंगा ध्वज दुरूस्तीचे काम अधिक सुकर झाले. या कामातून महिला बचत गटांना सहा लाखांपेक्षा जास्त मोबदला मिळाल्याचे मीनाक्षी मडवळी यांनी सांगितले. ध्वजाचा आकार योग्य प्रकारे दुरूस्त करता आला. उसवलेली शिलाई करता आली. इतर दुरूस्तीची कामेही होऊ शकल्यामुळे ध्वजांमधील दोष तत्परतेने दूर करणे शक्य झाले. ध्वजावरील अशोक चक्र विशिष्ट ठिकाणी नसलेले ध्वज दुरूस्त करता आले नाहीत. त्याचे प्रमाण जेमतेम एक-दोन टक्के होते. म्हणजे बहुतांशी तिरंगा ध्वज वितरीत करता आल्याचे महिला बचत गटांना समाधान वाटते. उमेदचे जिल्हा व्यवस्थापक सचिन चवरे, राहुल जाधव यांच्यासह निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार-ढोक, रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी चारूशीला मोहिते-देशमुख तहसीलदार,गटविकास अधिकारी, अभियानाचे पदाधिकारी, यंत्रणेने नेटके नियोजन केल्यामुळे युध्द पातळीवर ही जबाबदारी पार पाडता आली, असेही मडवळी यांनी नमूद केले. जिल्ह्यात एकूण २१ हजार महिला बचत आहेत. त्यांच्या प्रभाग संघांची संख्या ६९ एवढी आहे. या सर्व बचत गटांना तिरंगा ध्वज वितरण आणि दुरूस्तीच्या कामात सामावून घेता आले नसले तरी हा पहिलाच प्रयोग होता. तो युद्ध पातळीवर पूर्ण करता आला आहे.Source link

Leave a Reply