मागील काही दिवसांत अनेक नेत्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. अलीकडेच उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यांचा हा प्रवेश ठाकरे गटाला मोठा धक्का होता. यानंतर आता ठाकरे गटाचे कोकणातील एकमेव आमदार राजन साळवीही शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी आज रत्नागिरी येथे शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे एक तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. मतदारसंघातील विविध कामांसाठी राजन साळवी यांनी उदय सामंतांची भेट घेतल्याची प्राथमिक माहिती समजत आहे. मात्र, आमदार साळवी आणि उदय सामंत यांच्यात अशी अचानक भेट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. याबाबतचं वृत्त ‘टीव्ही ९ मराठी’ने दिलं आहे.
हेही वाचा- “…त्यांना बकबक करावी लागते” मुख्यमंत्र्यांसमोरच आव्हाडांची श्रीकांत शिंदे यांच्याशी शाब्दिक चकमक
खरं तर, काही दिवसांपूर्वीच राजन साळवी हे शिंदे गटात जाणार असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. मात्र, आपण ठाकरे गटातच राहणार असून शिवसेनेशी एकनिष्ठ राहणार असल्याची भूमिका साळवी यांनी घेतली होती. त्यानंतर आमदार साळवी सातत्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत विविध कार्यक्रम आणि बैठकीत दिसले आहेत. पण या दोन्ही नेत्यांमध्ये एक तास चाललेल्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.