Headlines

तेलंगणमधील धरणामुळे राज्यातील गावांना पुराचा फटका ; सोमनपल्ली गाव उद्ध्वस्त , महामार्गावरील जंगलात २०६ कुटुंबांचे वास्तव्य 

[ad_1]

रवींद्र जुनारकर, लोकसत्ता

गडचिरोली : तेलंगणातील मेडीगट्टा धरणामुळे सिरोंच्या तालुक्यातील ५४ गावांना महापुराचा फटका बसला आहे. सोमनपल्ली गाव पुरामुळे पूर्णत: उद्ध्वस्त झाले आहे. या गावातील २०६ कुटुंबांनी महामार्गावरील जंगलात ताडपत्रीच्या साहाय्याने तिथेच तंबू उभारून वास्तव्याला सुरुवात केली आहे. आता आम्ही गावात परत जाणार नाही, आम्हाला इतरत्र हलवा, आमचे पुनर्वसन करा अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरल्याने जिल्हा प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे.  जंगलात १० दिवसांपेक्षा अधिक कालावधीपासून लोक वास्तव्याला आहेत.

महाराष्ट्र – तेलंगणा सीमेवर सिरोंचा तालुका वसलेला आहे. अतिशय दुर्गम अशा या नक्षलवादग्रस्त या तालुक्याला १९८६ नंतर प्रथमच पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे.  तेलंगणाचा महत्त्वाकांक्षी मेडीगट्टा धरणामुळे हा तालुका उद्ध्वस्त झाला. हा प्रकल्प महाराष्ट्राच्या साथीने पूर्ण झाला आणि त्याची किंमत आता सीमेवरील नागरिकांना मोजावी लागत आहे. या प्रकल्पाच्या निर्मितीवेळेस गडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यातील नागरिकांनी प्रचंड विरोध केला होता. मात्र, तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने स्थानिक लोकांचा तीव्र विरोध झुगारून प्रकल्पाला मान्यता दिली. तो विक्रमी वेळेत पूर्ण देखील झाला. या धरणामुळे ज्याची भीती होती ती आता खरी ठरतेय.

 यंदा आलेल्या पुरात सिरोंचा तालुक्यातील सीमेवरील ५४ गावे पाण्याखाली गेली. त्यातील सोमनपल्ली गाव तर पूर्ण पाण्याखाली गेले. गाव पूर्णत:  उद्ध्वस्त झाल्याने तेथील नागरिकांनी लगतच्या महामार्गावरच आसरा घेतला आहे. पुरामुळे गावाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे नागरिक प्रचंड अस्वस्थ आहेत. तहसीलदार जितेंद्र शिकतोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार २०६ कुटुंब लगतच्या महामार्गावर वास्तव्यास असून पुन्हा पूर आल्यास आम्हाला परत रस्त्यावर यावे लागेल. त्यामुळे, आमचे इतरत्र पुनर्वसन करा, आम्ही गावात जाणार नाही  अशी आक्रमक भूमिका घेतल्याने प्रशासन देखील बुचकळय़ात पडले आहे. या ठिकाणाला जिल्हाधिकारी संजय मीना, पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी भेट देऊन गावकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ग्रामस्थ त्यांच्या मागणीवर ठाम आहेत. तहसीलदार शिकतोडे यांनीही वारंवार ग्रामस्थांची भेट घेतली. परंतु ग्रामस्थ आम्हाला गावात जायचे नाही या मागणीवर ठाम आहे. परंतु ते ज्या परिसरात वास्तव्यास आहेत, त्या ठिकाणी साप, विंचू  व इतर कीटकांचा धोका आहे. ताडपत्रीच्या साहाय्याने उभारलेल्या तंबूत पावसाचे पाणी गळत असल्याचे चित्र आहे. छत्तीसगडला जाणाऱ्या महामार्गाच्या दुतर्फा जवळपास दीड किलोमीटर हे तंबू पाहावयास मिळतात. प्रशासन त्यांच्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. मात्र, नागरिक ऐकायला तयार नाहीत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ यात हस्तक्षेप करून मार्ग काढावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात तहसीलदार शिकतोडे यांच्याशी संपर्क साधला असता ५४ गावांना पुराचा फटका बसला आहे. ३४ गावात पुराचे थेट पाणी गेल्याने तेथील परिस्थिती वाईट होती. सोमनपल्ली गाव पूर्णत: उद्ध्वस्त झाले आहे. गावातील २०६ कुटुंबे महामार्गावर तंबूत आहेत. ते तिथून गावात पुन्हा जाण्यास तयार नाहीत. प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांना अन्नधान्य तथा रोज टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

वर्षभर खायचे काय? :

मेडीगट्टा धरणाचे ८५ दरवाजे उघडण्यात आल्याने या वर्षी सिरोंचा तालुक्यातील सोमनपल्ली या गावासह नवीन सोमनूर, जुने सोमनूर, शुकरअली, टेकडाताला, पिडलाया, गुमलकोंडा, मुक्तापूर, कोतापल्ली, अंकिसा, चितरवेला या प्रमुख गावांना सर्वाधिक फटका बसला आहे. गोदावरी, इंद्रावती, वैनगंगा, पामुलगौतम या प्रमुख नद्यांमुळेही पूरपरिस्थिती निर्माण झाली. पुरामुळे या भागातील आदिवासी शेतकऱ्यांची शेती पूर्णत: उद्ध्वस्त झाली आहे. शेतजमीन पूर्णत: खरडून निघाल्याने आता ही शेती पीक घेण्यायोग्य नाही, तेव्हा आम्ही वर्षभर खायचे काय, असाही प्रश्न आदिवासी बांधव करीत आहेत.

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडून उपेक्षा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात धावती भेट दिली असली तरी पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या सिरोंच्या तालुक्याची या दोघांनी उपेक्षा केली. माजी आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी भेट घेऊन पूरग्रस्तांना मदत केली. सोमनपल्लीच्या २०६ लोकांच्या तंबूला भेट देऊन जिल्हा काँग्रेसकडून मदत दिली. फडणवीस सरकारने लोकांची मते न जाणता तेलंगणाचे राज्यातील मेडीगट्टा धरण पूर्ण केले. त्याचाच हा परिणाम असल्याची टीका केली. सरकार अजून येथे पोहोचले नाही असेही ते म्हणाले. एकरी २५ हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी लावून धरली.

पुनर्वसन एकमेव उपाय

उद्ध्वस्त झालेल्या सोमनपल्ली या गावाचे पुनर्वसन करण्याशिवाय दुसरा पर्याय शासनाकडे नाही, असे या भागातील लोक म्हणत आहेत. मेडीगट्टा धरणाचे काम सुरू होण्यापूर्वी राज्य शासनाला धरण होऊ देऊ नये अशी विनंती केली होती. मात्र त्याची साधी दखलही घेतली गेली नाही. आता दरवर्षी सिरोंचा व परिसरातील गावांना पुराचा फटका बसणार आहे. तेव्हा या गावांचे पुनर्वसन करण्याशिवाय पर्याय नाही, असे लोक ओरडून सांगत आहेत.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *