Headlines

SWIFT म्हणजे काय? ते कसं काम करतं? रशियावर त्याचा काय परिणाम होईल, जाणून घ्या सोप्या भाषेत

[ad_1]

तुषार सोनवणे झी मीडिया, मुंबई : रशिया आणि युक्रेन दरम्यान युद्ध सुरू आहे. त्यामुळे रशियाच्या आक्रमकतेला रोखण्यासाठी पाश्चात्त देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादायला सुरूवात केली आहे. यामध्ये सर्वात जास्त चर्चा होतेय ती, म्हणजे स्विफ्ट या सिस्टिमची!  स्विफ्ट सिस्टिममधून रशियाच्या बँकांना वगळण्यात येणार आहे. 

अनेक तज्ज्ञ याला आर्थिक निर्बंधांचे ब्रम्हास्त्र म्हणत आहेत. यामुळे रशियाच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलं जाऊ शकतं असं म्हटलं जातंय. नक्की स्विफ्ट सिस्टिम काय आहे. रशियाच्या बँकांसाठी ती बॅन केल्यास, नक्की कोणता परिणाम होऊ शकतो. 

स्विफ्ट म्हणजे काय?

Society for Worldwide Interbank Financial Telecommunication (SWIFT)ही जागतिक पेमेंट यंत्रणा आहे. स्विफ्ट ही पैसे ट्रान्सफर करण्यासाठीची मॅसेजिंग सिस्टिम आहे. 1973 साली ही सिस्टिम सुरू झाली. बँका आणि इतर वित्तीय संस्था पैशांच्या देवाण घेवाणीचे व्यवहार सुरक्षितपणे करण्यासाठी ही सिस्टिम वापरतात. स्विफ्ट सिस्टिम वापरणाऱ्या प्रत्येक संस्थेला 8 किंवा 11 अंकांचा विशेष क्रमांक दिला जातो.

स्विफ्ट कसं काम करतं?

समजा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोण्या ग्राहकाला अमेरिकेतील Bank of America (BofA)च्या मित्राला पैसे पाठवायचे असतील, तर स्टेट बँकेचे ग्राहक नाव खाते क्रमांक, शाखेचे नाव आणि स्विफ्ट कोड नमूद करून तो व्यवहार करू शकतो. 

एकदा हा व्यवहार सुरू झाल्यानंतर, SBI BofA ला एक SWIFT संदेश पाठवेल. जो नंतर BofA द्वारे व्हेरिफाय होईल. त्यानंतर तुमच्या अमेरिकेतील मित्राच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर होतील. 

SWIFT का महत्वाचे आहे?

स्विफ्ट प्रणाली सध्या जगभरातील 200 पेक्षा अधिक देशांमध्ये वापरली जाते. यामध्ये 11000 वित्तीय संस्थांचा सामावेश आहे. जागतिक पातळीवर ही यंत्रणा वापरली जाते. 

निर्बंधांचा रशियावर कसा होणार परिणाम?

रशियावर अमेरिकेसह पाश्चात्त देशांनी निर्बंध घातले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर पैशांच्या देवाणघेवाणीसाठी ही सिस्टिम वापरली जाते. त्यामुळे रशियाच्या बँकांसाठी ही सिस्टिम बंद झाल्यास, बँकांना इतर देशातील बँकांशी व्यवहार करणे अडचणीचे होईल. रशियन बँकांना देशाबाहेर पैसे पाठवता येणार नाही किंवा इतर देशांकडून पैसे स्विकारता येणार नाही. 

रशियाची आयात निर्यात होणार बाधित

स्विफ्ट सिस्टिम बॅन केल्याने, रशियात होणारी आयात बाधित होऊ शकते तसेच, रशियातून निर्यात बाधित होऊ शकते.

रशियासमोर पर्याय

स्विफ्ट सिस्टिमवर निर्बंध येऊ शकतील याबाबत, रशिया देखील तयार असल्याचे बोलले जाते. कारण, रशियाने 2014 साली युक्रेनचा क्रिमिया प्रांत ताब्यात घेतला होता. त्यावेळीही अमेरिकेने रशियावर स्विफ्ट निर्बंधांचा इशारा दिला होता. परंतू त्यावेळी रशियाची आर्थिक स्थिती बिकट होती. शिवाय स्विफ्ट सिस्टिमला पर्यायी यंत्रणा उपलब्ध नव्हती. त्यामुळे रशियाने जास्त आक्रमक कारवाया केल्या नव्हत्या. किंबहूना एक पाऊल मागेच घेतले होते.

रशियाप्रमाणेच 2012 साली इराणवर स्विफ्ट सिस्टिम बंदीचे निर्बंध घालण्यात आले होते. त्यानंतर इराणच्या तेलाचे दर प्रचंड गडगडले होते. तसेच अर्थव्यवस्थाही कोंडीत सापडली होती. 

स्वतःची यंत्रणा केली तयार

2014 नंतर रशियाने स्वतःची स्विफ्टला पर्यायी यंत्रणा उभारली. ही सिस्टिम म्हणजेच SPFS होय.या सिस्टिमध्येही 2021 वर्षापर्यंत 400 हून अधिक वित्तीय संस्था जोडल्या गेल्या आहेत. ज्यापैकी 400 संस्था बँका आहेत. या संस्था अर्मेनिया, बेलारूस, जर्मनी, कझाकिस्तान, किर्गिस्तान, स्विझरलँडमधील आहेत.

शिवाय चीन हा रशियाचा जवळचा मित्र आहे. चीननेही अशीच एक सिस्टिम विकसित केली आहे. ती म्हणजे  Cross-Border Inter-Bank Payments System होय. रशियाला आपल्या सिस्टिमसोबत चीनची CIPS सिस्टिम देखील वापरता येईल.  

त्यामुळे स्विफ्ट सिस्टिममधून रशियन बँकांना बाहेर केल्यानंतर देशाच्या अर्थव्यवस्थेवर किती परिणाम होईल, हे येत्या काळात दिसून येईलच. तोपर्यंत खरंच रशियाला या निर्बंधांचा मोठा फटका बसलाय हे म्हणणं घाईचं होईल.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *