दमदार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यत भातपिकावरील कीडरोग टळला



रत्नागिरी : सुमारे दोन आठवडय़ांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात शुक्रवारी सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे भातपिकावरील कीडरोगाचा धोका टळला आहे. गेले काही दिवस कोरडय़ा पडलेल्या भातशेतात या पावसामुळे पाणी साचले असून पिवळी पडण्याच्या स्थितीत असलेली रोपे पुन्हा हिरवीगार होणार आहेत.

दरम्यान, वेगवान वारा आणि मुसळधार पावसामुळे समुद्र खवळला असून हंगामाच्या आरंभीला मच्छीमारांना फटका बसला आहे. पाण्याला प्रचंड करंट असल्यामुळे जाळी मारणेही अशक्य झाल्याने हण्र, दाभोळमधील शेकडो नौकांनी जयगड, भगवतीबंदर येथे सुरक्षेसाठी आसरा घेतला आहे.

जुलैच्या दुसऱ्या पंधरवडय़ात पडलेल्या कमी पावसामुळे भातशेती कोरडी पडून करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याचीही चिन्हे दिसू लागली होती. त्यामुळे जिल्ह्यातील वरकस भातशेती संकटात सापडली होती. अजून चार दिवस अशीच स्थिती राहिली असती तर अडचणीत वाढ झाली असती, असे शेतकऱ्यांसह अभ्यासकांनी सांगितले होते. पण गुरुवारी सायंकाळपासून पावसाला आरंभ झाला. शुक्रवारीही दिवसभर जिल्ह्यात अनेक ठिकाणी वेगवान वाऱ्यासह पाऊस पडत राहिल्याने बळीराजा चिंतामुक्त झाला. शिल्लक राहिलेली भात लावणीची कामे या पावसामुळे शेतकऱ्यांना पूर्ण करता येणार आहेत.

या पावसामुळे संगमेश्वर तालुक्यातील नांदळज-उजगाव-कोळंबे मार्गावर पिंपळाचे भले मोठे झाड कोसळल्याने वाहतूक बंद पडली. सायंकाळपर्यंत ते झाड बाजूला करण्याचे काम चालू होते. पावसाने सुरुवात केल्यानंतर परशुराम घाटासह, रघुवीर घाटावर प्रशासनाकडून विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे.

गेल्या सोमवारी (१ ऑगस्ट) मासेमारीवरील वार्षिक बंदीचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर जिल्ह्यातील सुमारे २० टक्के मच्छीमारांनी समुद्रात नौका घातल्या. समुद्रही शांत असल्याने वातावरण मासेमारीला पूरक होते. पण शुक्रवारी पावसाळी वातावरणामुळे तो पुन्हा खवळला असून सुरक्षिततेसाठी नौकांनी जयगड, भगवतीसह जवळच्या बंदरात नांगर टाकला. वाऱ्यामुळे लाटा उसळल्या असून या परिस्थितीत जाळय़ांचे रोप तुटण्याची भीती असते. जाळे वाहून जाते किंवा लाटांच्या तडाख्याने जाळी तुटतात. हे नुकसान टाळण्यासाठी मच्छीमार नौका बंदरात उभ्या करणे पसंत करतात.

खराब वातावरणाचा फटका मच्छीमारांना पहिल्या आठवडय़ात बसला आहे. सुरुवातीला गिलनेटला बांगडा, ट्रॉलिंगला चिंगळं आणि म्हाकुळ मासा मिळत होता. छोटय़ा नौकांना दहा ते बारा हजार रुपयांची तर मोठय़ा नौकांना २५ हजारांहून अधिक रुपयांची मासळी मिळत होती; पण पावसाने त्यांचा खंड पडला असून सुरुवातीला मच्छीमारांच्या आशांवर पाणी फेरले गेले आहे. सध्या म्हाकुळचा दर दोनशे ते अडीचशे रुपये किलो, बांगडा शंभर ते एकशे वीस रुपये, तर चिंगळं पाचशे रुपये किलोपर्यंत दर आहे.

जिल्ह्यात शुक्रवारी (ता. ५) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत एकूण सरासरी ३६.३२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यात लांजा तालुक्यात सर्वाधिक ६४.५० मिलिमीटर पाऊस पडला. त्याखालोखाल राजापूर (४८.३० मिमी), संगमेश्वर (४५.४०),चिपळूण (४१.८०), दापोली (४१.५०), गुहागर (३१.९०), आणि खेड (२९.७०) याही तालुक्यांमध्ये चांगला पाऊस झाला. यंदाच्या मोसमात गेल्या १ जूनपासून ५ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात एकूण सरासरी १७६४.२० मिलिमीटर पाऊस पडला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यात अनेक ठिकाणी येत्या ११ ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून ऑरेंज अलर्टह्ण जारी करण्यात आला आहे. विशेषत: किनारपट्टी भागातील लोकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Source link

Leave a Reply