Headlines

दिव्यांग व्यक्तींच्या विवाहासाठी अर्थसहाय्य योजनेबाबत राज्य सरकार सकारात्मक – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे

[ad_1]

पुणे, दि. 03 : दिव्यांग व्यक्तींचे जीवन सामान्य व्यक्तीप्रमाणे सुखकर व्हावे, यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात येत आहेत. दिव्यांग जोडप्यांच्या लग्नासाठी त्यांना विशेष अर्थसहाय्य देणारी योजना सुरू करण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असून याबाबत राज्य स्तरावर लवकरच एक बैठक आयोजित करण्यात येईल, अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या पुढाकारातून पुणे येथे आयोजित 12 दिव्यांग जोडप्यांच्या अनोख्या विवाह सोहळ्यादरम्यान त्यांनी केलेल्या सुचनांची दखल घेऊन श्री.मुंडे यांनी दिव्यांग जोडप्यांच्या विवाहासाठी अर्थसहाय्य योजनेबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचे सांगितले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, अपंग हक्क विकास मंच, पवार चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई, महात्मा गांधी सेवा संघ संचालित दिव्यांग पुनर्वसन केंद्र पुणे यांच्या वतीने व खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून प्रथमच आयोजित केल्या गेलेल्या 12 दिव्यांग जोडप्यांच्या अनोख्या सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे, विजय कान्हेकर, अभिजित राऊत, दीपिका शेरखाने यांसह मान्यवर उपस्थित होते.

स्वतः कोविड बाधित असूनही दिव्यांग बांधवांच्या आयुष्यात लग्न सोहळा अनुभूती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या कार्य व इच्छा शक्तीचे कुतूहल व आदर वाटतो असे म्हणत धनंजय मुंडे व राजेश टोपे यांनी सुप्रियाताई यांना कोविड मधून लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.

दिव्यांगांचा सामुदायिक विवाहसोहळा राज्यभर राबवावा – खा. सुप्रिया सुळे

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे व आरोग्यमंत्री राजेश टोपे या दोघांच्या सहकार्याशिवाय हा लग्न सोहळा होऊच शकला नसता. हा सामुदायिक विवाह सोहळा हा केवळ एक टप्पा असून पुढे अशा प्रकारचे कार्यक्रम राज्यभरात राबवायचे आहेत, यासाठी सामाजिक न्याय मंत्री व आरोग्यमंत्री यांनी आपल्या विभागांमार्फत सहकार्य करावे, अशी सूचना खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केली.

दिव्यांग नोंदणी व युडीआयडी राज्यव्यापी मोहीम

खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकाराने खासदार शरदचंद्र पवार यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त 12 डिसेंबर 2021 ते 12 मार्च 2022 या दरम्यान दिव्यांग व्यक्तींची नोंदणी करून त्यांना आवश्यक असलेले वैश्विक ओळखपत्र (UDID Card) देण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त प्रयत्नातून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

राज्य व केंद्र शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळवण्यासाठी हे युडीआयडी कार्ड असणे अनिवार्य आहे. त्यामुळे नोंदणी नसलेल्या दिव्यांग बांधवांची या विशेष मोहिमेंतर्गत जास्तीत जास्त नोंदणी केली जावी यासाठी ही मोहीम राज्यभरात अधिक व्यापक पद्धतीने राबविली जाईल तसेच आरोग्य विभाग यासाठी आवश्यक सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

असा रंगला विवाह सोहळा…

पुणे येथील मार्केट यार्ड परिसरातील एका मंगलकार्यालयात या सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, सर्व 12 जोडप्यांचा हळदी समारंभ व अन्य विधी संपल्यानंतर प्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे सामुहिक पूजन करून सर्व नवदाम्पत्यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. या सोहळ्यादरम्यान मास्क वापरण्यासह कोविड विषयक नियमांचेही पालन करण्यात आले.

०००

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *