Headlines

some shiv sainik in ahmednagar with eknath shinde group zws 70

[ad_1]

मोहनीराज लहाडे, लोकसत्ता 

नगर: जिल्ह्यात शिवसेनेचा एकही आमदार नाही, यापूर्वीही शिवसेनेला अपवादात्मकच यश मिळाले होते. पक्षाचे उपनेते दिवंगत अनिल राठोड यांनी नगर शहरावर तर पारनेरवर माजी आमदार विजय औटी यांनी दीर्घकाळ वर्चस्व ठेवले होते. मात्र सध्याच्या बदलत्या राजकीय परिस्थितीत जिल्हा शिवसेनेतून जे संकेत मिळत आहेत, नगरसेवकांचा व काही पदाधिकाऱ्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा मिळत आहे.

माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी शिवबंधन बांधलेले आहे. यापूर्वीच्या शिवसेनेमधील बंडात जिल्ह्यातून फारसा पाठिंबा मिळाला नसल्याचे वास्तव असले तरी सध्याची जिल्हा शिवसेनेतील परिस्थिती तशी राहिलेली नाही,  हे एकनाथ शिंदे यांच्या बंडातून उघड झाले आहे.

एकनाथ शिंदे यांचा आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शिवसेनेचा फारसा संबंध आलेला नाही. नगर शहरात मात्र तशी परिस्थिती नाही. सन २०१० मध्ये शीला अनिल शिंदे महापौर होताना, सन २०१६ मध्ये सुरेखा संभाजी कदम महापौर होताना आणि सध्याच्या महापौर रोहिणी संजय शेंडगे यांच्या निवडीत एकनाथ शिंदे यांनी सक्रिय भूमिका बजावली आहे. त्यातूनच शिवसेनेच्या नगर शहरातील नगरसेवकांचा आणि शिंदे यांचा वेळोवेळी थेट संपर्क राहिलेला आहे. दोन-चार महिन्यांपूर्वी शिवसेनेच्या महापौर म्हणून श्रीमती शेंडगे यांच्या प्रभागतील रस्त्यांसाठी एकनाथ शिंदे यांनी ३५ कोटींचा निधी मंजूर केलेला आहे.  शिवसेनेचे जेष्ठ नगरसेवक आणि तत्कालीन महापौरांचे पती अनिल शिंदे यांनी एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी निवड होताच जाहीरपणे आनंदोत्सव साजरा केला. तत्पूर्वी स्वीकृत नगरसेवक मदन आढाव यांनी ध्वनिचित्रफीत प्रसारित करुन एकनाथ शिंदे यांना पाठिंबा व्यक्त केला.

शहराच्या बोल्हेगाव उपनगरातील शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाचे अभिनंदन करणारा टोलेजंग फलक लावला होता. बंडाचे चित्र पुरेसे स्पष्ट झाले नव्हते, त्यावेळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी समर्थनासाठी नगरमधील पक्षाच्या नगरसेवकांशी थेट संवाद साधला होता, त्यावेळीही काही अनुपस्थितीत राहिले. अशी काही उदाहरणे शहर शिवसेनेतील परिस्थिती पूर्वीसारखी एकसंधतेची राहिलेली नाही, अनेकांचा कल एकनाथ शिंदे यांच्याकडे झुकलेला आहे, हेच स्पष्ट करते.

संपर्कप्रमुखांवर रोष

शिवसेनेतील बंडखोर आमदारांच्या प्रतीकात्मक पुतळय़ाचे दहन करण्यात आले. याच कार्यक्रमात संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर हटावची मागणी करत नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याही पुतळय़ाचे दहन केले. कोरगावकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्याशी साटेलोटेह्ण करतात, असा थेट आरोपच यावेळी करण्यात आला. या घटनेतून शिवसेनेतील अंतर्गत खदखद बाहेर पडली. मात्र वरिष्ठ पातळीवरून त्याची कोणतीही दखल घेतली गेली नाही. राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने शिवसेनेने महापौरपद मिळवले आहे. केडगाव उपनगरातील दोन शिवसैनिकांच्या हत्याकांड प्रकरण झाल्यानंतर लगेचच शिवसेनेने राष्ट्रवादीचे आमदार जगताप यांचा पाठिंबा मिळवत महापौर पद मिळवले. यावरून शिवसेनेच्या नगरसेवकांच्या एका गटामध्ये प्रचंड नाराजी आहे. महापालिकेतही राष्ट्रवादी शिवसेनेवर वेळोवेळी कुरघोडय़ा करते, मात्र महापौर पद मिळाले यातच शिवसेना समाधानी आहे. शिवसेनेतील ही अस्वस्थता, बंडाला साथ देणारी लक्षणे लक्षात घेऊन कोणी तसा अहवालही वरिष्ठांना पाठवला नाही किंवा वरिष्ठ पातळीवरून कोणत्या नेत्यांनी नगरला धावही घेतली नाही.

राज्य पातळीवर पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्याने, नगरमध्ये पक्षाचा आमदार नसताना, या अस्वस्थतेची कोणतीही दखल घेतली जाणार नाही हे उघड आहे. म्हणूनच शिवसेनेची झाकली मूठह्ण तशीच राहिली. माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेवासे मतदारसंघातून यापूर्वी कधीही शिवसेनेचा उमेदवार अगदी जिल्हा परिषद पातळीवरही स्थान मिळवू शकलेला नाही, त्यामुळे या मतदारसंघाचा आणि शिवसेनेचा थेट कोणताही संबंध नाही.  जिल्ह्याच्या उत्तर भागात, शिर्डी मतदारसंघातील खासदारपद शिवसेनेकडे आहे. खासदार सदाशिव लोखंडे यांनी पक्षप्रमुख ठाकरे यांना समर्थन दिले आहे. त्यापूर्वीही खासदार भाऊसाहेब वाकचौरे शिवसेनेचे होते. मात्र या दोन्हीही वेळी मतदारसंघातील त्यावेळच्या परिस्थितीचा फायदा शिवसेनेला मिळाला. अन्यथा शिर्डी मतदारसंघ काही शिवसेनेचा हक्काचा मानला जात नाही. या मतदारसंघावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजीमंत्री बाळासाहेब थोरात आणि भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री राधाकृष्ण विखे अशा दोघा विळय़ाभोपळय़ाचे नाते असलेल्या नेत्यांचे वर्चस्व आहे. तेथील शिवसेनेचे अस्तित्व क्षीण आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *