Headlines

आयुक्त साहेब मयत समर्थ भास्कर च्या कुटुंबियांना न्याय द्या. डी.वाय.एफ.आय. व एस.एफ.आय. ची मागणी

 


न्यायासाठी आंदोलन करणाऱ्या तरुण व विद्यार्थ्यांना जबरदस्तीने  पोलिसांनी घेतले ताब्यात



सोलापूर दि.१४:- मयत समर्थ धोंडीबा भास्कर च्या कुटुंबियांना तातडीने स्मार्ट सिटी योजनेतून ५० लाख रुपये आर्थिक मदत करा व समर्थ भास्कर च्या मृत्यूस कारणीभूत असणारे प्रशासकीय अधिकारी व कंत्राटदार यांच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी. अशी रास्त, नागरी मागणी डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया व स्टूडंट फेडरेशन ऑफ इंडिया च्या वतीने करण्यासाठी सोलापूर महानगर पालिका मा. आयुक्त कार्यालय येथे तरुण व विद्यार्थी शिष्टमंडळाद्वारे निवेदन घेऊन येताच पोलिसांनी बळाचा वापर करून निदर्शन करण्यास मज्जाव केला आणि अटक सत्र सुरु केले. यावेळी युवा आघाडीचे जिल्हा सचिव अनिल वासम यांनी पोलीस प्रशासनाचा तीव्र निषेध व्यक्त केले. 


सोमवार दि. १४ जून २०२१ रोजी सकाळी ११ वाजता डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया व स्टूडंट फेडरेशन ऑफ इंडिया च्या वतीने सोलापूर महानगर पालिका मा. आयुक्त कार्यालय येथे स्मार्टसिटी च्या ढिसाळ कारभारामुळे दगावलेल्या मयत समर्थ भास्कर यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावे या मागणीसाठी युवा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष विक्रम कलबुर्गी यांच्या नेतृत्वाखाली निदर्शन करण्यात आले. 

यावेळी युवा महासंघाचे राज्य उपाध्यक्ष अशोक बल्ला, विद्यार्थी आघाडीचे जिल्हा सचिव मल्लेशम कारमपुरी, शाम आडम, दत्ता चव्हाण आदींच्या शिष्टमंडळाने मा. आयुक्त पी.शिवशंकर यांना निवेदन देऊन या प्रकरणी सविस्तर चर्चा केले. संबंधित प्रकरणी कारणीभूत असणारे अधिकारी व कंत्राटदार यांच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल करून तातडीने करावी करावी व मयताच्या कुटुंबियांना ५० लाख आर्थिक मदत तातडीने अदा करावी. अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा या प्रसंगी देण्यात आला. 


सदर निवेदनात म्हंटले आहे कि, केंद्र सरकार भारतातील प्रमुख शहरांचा अत्याधुनिक पद्धतीने विकास करण्यासाठी स्मार्ट सिटी योजना अमलात आणली. हि योजना अमलात आणताना स्थानिक स्वराज्य संस्थाचे अधिकार हिरावून घेतले. केवळ नियंत्रणाचे काम प्रशासनाकडे दिले. वास्तविक खाजगी संस्थामार्फत कंत्राटी तत्वावर कंत्राटदारांकडून स्मार्ट सिटी बनविण्यास सरकारकडून प्राधान्यक्रम दिलेला आहे. स्मार्ट सिटीचे करार, नियम, निर्बंध यांचा ताळमेळ लागताना दिसून येत नाही. 

एखाद्या शहराचा किंवा त्या शहरातील विशिष्ट भागाचा विकास करताना विकासाचे टप्पे, कामाचा आराखडा, कामाची प्रगती आणि कामाचे मूल्यमापन याबाबी ढोबळमानाने लक्षात घेतले जातात. या कामाचे लेखापरीक्षणही केले जाते. या सगळ्या तांत्रिक बाबींची पूर्तता वेळेच्या मर्यादेत होत आहे का नाही. याबाबत जबाबदार नागरिक म्हणून शंका उपस्थित होत आहे. 

जुना दत्त मंदिर पासून ते पंचकट्टा दरम्यान स्मार्ट सिटी अंतर्गत कामकाज सुरु आहे. या रस्त्यावर गुरुवार दि. १० जून २०२१ रोजी कामकाज सुरु असताना रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या दुकानदारांची वाहने, पादचाऱ्यांची गर्दी, वाहतूक सुरु असताना प्रचंड वर्दळीतून रस्ता काढत मयत समर्थ धोंडीबा भास्कर हा १३ वर्षीय मुलगा घरगुती कामानिमित्त जाताना बेभान सुटलेल्या ट्रॅक्टर खाली स्मार्ट सिटी अंतर्गत वाहन चालकाच्या चुकीमुळे ट्रॅक्टर खाली चिरडला गेला. त्यामुळे तो मुलगा जागीच अवघ्या काही क्षणात दगावला. त्या चिमुकल्या निष्पाप मुलाचा बळी गेला. याला हे स्मार्ट सिटी योजनेचे प्रशासकीय अधिकारी, कंत्राटदार यांच्या बेजबाबदार आणि निष्काळजीपणामुळे घडलेले आहे. हे अत्यंत गंभीर आणि दखलपात्र गुन्हा आहे. या स्मार्ट सिटी योजनेची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत स्मार्ट सिटीच्या निष्काळजीपणा आणि निकृष्ट दर्जाच्या कामामुळे दगावलेल्या मयताच्या कुटुंबियांना तातडीने स्मार्ट सिटीच्या निधीतून प्रत्येकी १० लाख आर्थिक मदत द्या. 


यावेळी कादर शेख, राहुल बुगले, तौसीद कोरबू, रोहित सावळगी, व्यंकटेश कोंका, पूनम गायकवाड, प्रियंका कीर्तने, बाळकृष्ण मल्याळ, विजय हरसुरे, नरेश गुल्लापल्ली, मधुकर चिल्लाळ, विनायक भैरी, दुर्गादास कनकुंटला, राहुल भैसे, प्रशांत आडम, बाबुराव बंधारम, शिवा श्रीराम, अकिल शेख, बालाजी गुंडे, असिफ पठाण, इलियास सिद्धिकी आदींसह शेकडो तरुण व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *