Headlines

देशातील महत्वाकांक्षी व पथदर्शी गृहनिर्माण प्रकल्पाबाबत घेतलेल्या हरकतीबाबत कॉ. आडम मास्तर आक्रमक

सोलापूर :- माकपाच्या ९ ऑगस्टच्या आंदोलनाच्या अनुषंगाने पोलीस प्रशासन व पालिका प्रशासनाची तारांबळ उडताच. आक्रमक व उत्स्फुर्तपणे आलेल्या जनसमुदायाला रोखता न आल्याने पोलीस प्रशासनामार्फत मा. पालिका आयुक्त पी.शिवशंकर यांच्याशी चर्चा करण्याचा प्रस्ताव आल्याने ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) व शिष्टमंडळाला विनंती करण्यात आली. त्या अनुषंगाने पालिका आयुक्त कार्यालय येथे तब्बल अर्धा तास चर्चा घडली. या शिष्टमंडळात नगरसेविका कामिनिताई आडम, युसुफ शेख (मेजर), कुर्मय्या म्हेत्रे, मुरलीधर सुंचू, यशोदा दंडी, अनिल वासम आदी उपस्थित होते.

या दरम्यान आडम मास्तर यांनी प्रथम पालिका आयुक्त यांनी देशातील महत्वाकांक्षी व पथदर्शी गृहनिर्माण प्रकल्पाबाबत घेतलेल्या हरकतीबाबत चर्चा करताना संबंधित हरकतीबाबत सखोल विश्लेषण करताच आयुक्तांनी सदर हरकत मागे घेणार व स्थगिती उठवणार असल्याचे आश्वासन दिले. त्याचबरोबर रे नगरला पाणी पुरवठा करण्यासंबंधी सुद्धा सकारात्मक निर्णय शासनाकडे पाठवणार असल्याचेही सांगितले. तसेच दिव्यांगाना अद्याप थकीत अनुदान मिळालेले नसून ते तातडीने मिळवून देण्यासंबंधी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले. अर्थातच कोणत्याही परिस्थितीत रे नगरच्या लाभार्थ्यांना आपल्या हक्काचे व स्वप्नातील घर मिळणार यात तिळमात्र शंका नाही असे मत प्रसार माधायामांशी बोलताना कॉ. आडम मास्तर व्यक्त केले.

९ ऑगस्ट आंदोलनाच्या धर्तीवर पोलीस प्रशासनाकडून सोलापूर महानगर पालिकेला चौतर्फा कडक बंदोबस्त लावल्यामुळे हजारो आंदोलक गनिमीकावा पद्धतीने मौक्याच्या ठिकाणी जमले होते. परंतु लोकशाही व सनदशीरमार्गे धरणे आंदोलन करण्याचे ठरले असताना पोलिसांनी प्रचंड दडपशाही करून कार्यकर्त्यांना दिसताक्षणी ताब्यात घेतले. एक प्रकारची अघोषित संचारबंदीचे वातावरण निर्माण केले. हि परिस्थिती पाहत ९ ऑगस्ट १९४२ च्या चाले जाव आंदोलनाची प्रचीती आली. ज्या अर्थी देशाच्या स्वातंत्र्यासाठी रस्त्यावर आलेल्या आंदोलकांवर इंग्रजांनी केलेल्या जुलम जबरदस्तीप्रमाणे आज पोलीस प्रशासनाकडून झालेली आहे.

महाविकास आघाडी सरकार हे शिवशाहीवर चालणारी व पुरोगामित्व जपणारी आघाडी आहे. शाहू-फुले-आंबेडकर तथा अण्णा भाऊ साठे यांच्या विचाराचा वारसा सांगणारी व जनतेचे राज्य आहे असे अभिवचन देणारी आघाडी मग जनता विरुद्ध पोलीस हे समीकरण का रुजवत आहे. असा सवाल आडम मास्तर यांनी केला.

कॉ.आडम मास्तर पालिका आयुक्त यांच्यासोबत चर्चेला गेले हि गोष्ट आंदोलकांना कळताच आंदोलक शांततेत मोक्याच्या ठिकाणी जमले त्या ठिकाणी जाऊन आडम मास्तर यांनी पालिका आयुक्त यांच्या सोबत झालेल्या सकारात्मक निर्णयाची व एकंदरीत कामगारांच्या विजयाची भूमिका व्यक्त करून लोकांना शांततेत मार्गस्थ होण्याचे आवाहन केले. त्यावेळी सर्व आंदोलकांनी विजयाचा आनंद व्यक्त केले.

९ ऑगस्ट भारताच्या इतिहासातील क्रांती दिन या दिनाचे औचित्य साधून भारतीयांना गुलामीकडे नेणाऱ्या केंद्र सरकारच्या प्रतिगामी धोरणा विरोधात आणि वाढती महागाई, पेट्रोल-डीझेल, गॅस दरवाढ, बेरोजगारी, उपासमार आणि कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारच्या अपयशाविरोधात माकपा च्यावतीने देशव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली. मोदी हटाव, देश बचाव हा नारा घेऊन संपूर्ण देशभर आंदोलन करण्यात आले. याच अनुषंगाने सोलापुरातही राष्ट्रीय समस्यांसोबत स्थानिक श्रमिकांचे प्रश्न प्रामुख्याने रे नगर प्रकल्पाबाबत पालिका आयुक्तांनी घेतलेली हरकतीच्या विरोधात सर्व कामगार लाल झेंडा खांद्यावर घेऊन महापालिकेकडे आगेकूच करताना पोलिसांनी बळाचा वापर करून पांगापांग केली व प्रमुख नेते व कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक कारवाईच्या नावाखाली सकाळीच ताब्यात घेतले. यावेळी जवळपास ७५० महिला व २५० पुरुष यांना ताब्यात घेऊन पोलीस मुख्यालय येथे दाखल केले. जर राज्यातील सरकार सुद्धा केंद्र सरकारप्रमाणे भूमिका घेत असेल तर महाविकास आघाडीला सरकारला अर्थ काय? या घटनेचा माकपाच्या वतीने राज्य सरकार व स्थानिक पोलीस प्रशासनाचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *