Headlines

सोलापूर जिल्हा ऑक्सिजनमध्ये स्वयंपूर्ण नागरिकांनी काळजी घेण्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आवाहन

सोलापूर,दि.14: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये जिल्ह्यात ऑक्सिजनची कमतरता होती. संभाव्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी यांनी अहोरात्र घेतलेल्या परिश्रमामुळे जिल्हा ऑक्सिजनमध्ये स्वयंपूर्ण झाल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी काढले.

श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालय परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लान्ट आणि साठवणूक केंद्राच्या लोकार्पणप्रसंगी आयोजित कार्यक्रमात श्री. भरणे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरूद्ध कांबळे, महापौर श्रीकांचना यन्नम, आमदार प्रणिती शिंदे, आमदार राजेंद्र राऊत, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक संजय कदम, डॉ. वैशंपायन स्मृती महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर आदी उपस्थित होते.

श्री. भरणे म्हणाले, तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन पूर्ण तयारीने सज्ज झाले आहे. सध्या जिल्ह्याला लागणाऱ्या ऑक्सिजनच्या क्षमतेपेक्षा तीनपट ऑक्सिजन उपलब्ध आहे. यामुळे ऑक्सिजनअभावी कोणत्याही कोरोना रूग्णाचा मृत्यू होणार नाही, याची दक्षता प्रशासनाने घेतली आहे. जिल्हा नियोजनमधून निधी उपलब्ध करून दिल्याने दोन तर केंद्र सरकारच्या भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणकडून दोन हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प तयार झाले आहेत. यातून रोज पाच मेट्रीक टन ऑक्सिजन तयार होणार आहे. याशिवाय ऑक्सिजनचा साठा करण्यासाठी तीन साठवण टँक उभारण्यात आल्याने 32 मेट्रीक टन ऑक्सिजनची क्षमता झाली आहे. यामुळे ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही.

अडचणीच्या काळात सर्व आरोग्य कर्मचारी, अधिकारी यांनी टीमवर्क म्हणून काम केल्याने आपल्याला कोरोना रूग्ण कमी करण्यात यश आले आहे. अजून कोरोना संपला नाही, प्रत्येकाचा जीव महत्वाचा आहे. नागरिकांनी गर्दीत जाणे टाळावे, मास्कचा वापर करावा, हात स्वच्छ धुवावेत, असे आवाहनही श्री. भरणे यांनी केले.

श्री. शंभरकर म्हणाले, आजचा दिवस सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखा आहे. कारण जिल्ह्याने आवश्यकतेपेक्षा तीन पट ऑक्सजन साठा उपलब्ध राहील, याची सोय केली आहे. या ऑक्सिजन प्रकल्पातून एक हजार सिलेंडरची दिवसाला क्षमता निर्माण होणार आहे. 700 रूग्णांना रोज ऑक्सिजन पुरेल, अशी सोय करण्यात आली आहे. सिव्हील हॉस्पिटल सर्व बाबतीत सुसज्ज केले. जिल्ह्यात 9 ऑक्सिजन प्रकल्प आणि 11 साठवणूक टँक उभारण्यात येणार आहेत.

जिल्ह्याला आठ मेट्रीक टन ऑक्सिजनची आवश्यकता आहे. मात्र नवीन प्रकल्पांमुळे 32 मेट्रीक टन ऑक्सिजन तयार होणार आहे. राज्यातील हा पहिलाच तर देशातील तिसरा प्रकल्प असल्याचे डॉ. ठाकूर यांनी प्रास्ताविकात सांगितले.

तत्पूर्वी सिव्हील परिसरात उभारण्यात आलेल्या सर्व ऑक्सिजन प्रकल्प, साठवणूक प्रकल्पांचे लोकार्पण श्री. भरणे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, औषध वैद्यकीय शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. एच.बी. प्रसाद, आयएमएचे डॉ. मिलिंद शहा, मनपाचे उपायुक्त धनराज पांडे, डॉ. पी.आय. अग्रवाल, डॉ.आर.डी. जयकर आदींसह डॉक्टर, कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply