Headlines

शिव्यांच्या भडिमारात ‘बोरीचा बार’ उत्साहात

[ad_1]

वाई: शिव्या देण्याची अनोखी परंपरा असलेला ‘बोरीचा बार’ यंदाही परंपरागत पद्धतीने बुधवारी दुपारी सुखेड व बोरी ( ता  खंडाळा) येथील ओढय़ाच्या काठावर पार पडला. दोन्ही गावांतील महिलांनी सनई हलगीच्या तालावर वाजत गाजत ओढय़ावर एकत्र येऊन एकमेकींवर शिव्यांचा भडिमार करत अनोखी परंपरा कायम ठेवली.

नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी पार पडणारा सुखेड व बोरी गावातील बोरीचा बार संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. दोन गावांतील महिला एकत्र येऊन गावांच्या मधून वाहणाऱ्या ओढय़ाच्या काठावर येऊन  एकमेकांना शिव्यांची लाखोली वाहतात. गावातील ओढय़ावर जमून दोन्ही बाजूकडील महिलांकडून एकमेकांना हातवारे करीत शिव्या दिल्या जातात.

बोरीचा बार सुरू असताना पुरुष मंडळी ओढय़ाच्या मध्यभागी उभे राहून दोन्हीकडील महिलांना एकमेकींपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करतात. करोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांनंतर आज श्रावणातल्या षष्ठीला हा बोरीचा बार साजरा होताना हलगी व सनईच्या सुरात महिलांना अधिकच चेव चढत होता.

बार सुरू होण्यापूर्वी दोन्ही गावातील महिला ग्रामदैवताच्या मंदिरासमोर एकत्र आल्या. तेथून या महिला झिम्मा, फुगडी, फेर धरत ओढय़ापर्यंत गेल्या. यंदा ओढय़ाला पाणी कमी असल्याने त्यांनी ओढय़ाच्या काठावर उभे राहून पैलतीरावर एकमेकांकडे हातवारे करत महिलांवर शिव्यांचा भडिमार करीत बोरीचा बार साजरा केला. या वेळी लोणंद पोलिस ठाण्याचे साहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल वायकर यांनी शांतता व सुव्यवस्थेसाठी महिला पोलिसांसह मोठा फौजफाटा तैनात ठेवला होता.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *