“शिवसेनेचं नाव व चिन्ह गोठवून हिंदुत्ववादी मतं एका पेटीत आणण्याचा भाजपाचा डाव” पृथ्वीराज चव्हाणांचं मोठं विधान | congress leader prithviraj chavan on shivsena name and symbol dhanushyban satara press conference rmm 97



मागील काही दिवसांपासून शिवसेना पक्षात अंतर्गत कलह सुरू आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना पक्षाला खिंडार पडलं आहे. शिवसेनेचे बहुसंख्य आमदार शिंदे गटात सामील झाल्याने मूळ शिवसेना कुणाची? शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण कुणाचं? याबाबत शिवसैनिक आणि सामान्य जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. हे प्रकरण आता निवडणूक आयोगाकडे गेलं आहे.

धनुष्यबाण आणि ‘शिवसेना’ नावासाठी शिंदे गट आणि ठाकरे गटात वाद सुरू असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं विधान केलं आहे. शिवसेनेचं नाव आणि चिन्ह गोठवून सर्व हिंदुत्ववादी मतं एका पेटीत आणण्याचा भाजपाचा डाव असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ते सातारा येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

सध्याच्या राजकीय स्थितीबद्दल बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “महाराष्ट्रात मुदतपूर्व निवडणुकांची शक्यता नाकारता येणार नाही. कारण सरकार स्थापन करण्यामध्ये प्रचंड वाद निर्माण होईल किंवा वाद उद्भवेल, अशी भीती मला वाटते. त्यामुळे नाइलाजानं त्यांना मुदतपूर्व निवडणुकीचं पाऊल उचलावं लागेल. सध्या निवडणूक आयोगासमोर खरी शिवसेना कोणती? हा वाद सुरू झाला आहे. विधानसभा आणि लोकसभेचं चित्र स्पष्ट आहे. पण संघटनेच्या पातळीवर जे शाखाप्रमुख आहेत, जिल्हाप्रमुख आहेत, बाकी पदाधिकारी आहेत, त्यांची काय परिस्थिती आहे, यावर निवडणूक आयोगाला निर्णय घ्यावा लागेल.”

हेही वाचा- “दीपक केसरकर हा भामटा आणि लबाड माणूस” शिवसेना नेत्याची बोचरी टीका!

“पण एक विश्लेषक म्हणून वैयक्तिक मत सांगू इच्छितो की, यामध्ये भाजपाचा एकमेव उद्देश असा आहे की, शिवसेनेचं नाव आणि चिन्ह गोठवायचं आणि याचा फायदा घ्यायचा. शिवसेना आणि भाजपात विभागलेली हिंदुत्ववादी मतं एका पेटीत आणायची, हा त्यांचा (भाजपाचा) डाव आहे. त्यामुळे येत्या काळात शिवसेनेचं चिन्ह गोठवलं तर मला आश्चर्य वाटणार नाही. पण जो निर्णय घ्यायचा आहे, तो निवडणूक आयोग घेईल” असं विधान पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे.

हेही वाचा- “…अन् पवारांनी दिलेलं दुसरं कामही राऊतांनी पूर्ण केलं” उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवरून नारायण राणेंची टीका

काँग्रेसचे काही आमदारही फुटण्याची शक्यता आहे, या चर्चेबद्दल विचारलं असता चव्हाण म्हणाले, “मला एवढंच माहीत आहे की, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राहिलेली शिवसेना यांच्यातील आमदार फोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी साम-दाम-दंड-भेदचा वापर केला जात आहे. त्यामुळे सावध राहिलं पाहिजे असं मी माझ्या पक्षश्रेष्ठींना सांगितलं आहे.”



Source link

Leave a Reply