Headlines

shivsena targets cm eknath shinde delhi visit belgao issue bjp

[ad_1]

राज्यात सत्तापालट झाल्यापासून शिवसेना विरुद्ध भाजपा या वादाची जागा आता उद्धव ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदे गट या वादानं घेतली आहे. दोन्ही बाजूंनी जोरदार आरोप-प्रत्यारोप होत आहेत. आपणच खरी शिवसेना, असा दावा दोन्ही बाजूंनी केला जात आहे. शिवाय, शिवसेनेचं निवडणूक चिन्ह असलेला धनुष्यबाण नेमका कुणाकडे जाणार? याची देखील चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर गेले असताना शिवसेनेकडून त्यांच्यावर टीका करण्यात आली आहे. सामनामधून शिवसेनेनं मुख्यमंत्र्यांना टोला लगावतानाच बंडखोर आमदारांच्या शिंदे गटावर देखील तोंडसुख घेतलं आहे.

“मराठी माणसांच्या एकजूट फोडीचा नजराणा”

शिवसेनेनं एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या बंडखोर आमदारांवर बंडखोरीवरून टीका केली आहे. “इकडे महाराष्ट्रात शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसल्याचं समजताच तिकडे बेळगावसह संपूर्ण सीमा भागात मराठी जनांत आक्रोश सुरू झाला. कारण कर्नाटक सरकारने सीमा भागात मराठी बांधवांवर नव्याने दमनचक्र सुरू केल्याचं वृत्त आलंय. मुख्यमंत्र्यांनी बेळगाव-सीमा भागातील मराठी बांधवांवरील अत्याचारांचा विषय पंतप्रधानांसमोर जोरकसपणे मांडायलाच हवा. बेळगावसह सीमाभाग तात्काळ केंद्रशासित करा, ही आपली मागणी त्यांनी पंतप्रधानांसमोर लावून धरली पाहिजे. कर्नाटकमधील भाजपा सरकार शिंदेंचा शब्द खाली पडू देणार नाही, याबाबत आमच्या मनात तरी शंका नाही. शिंदे दिल्लीला शिवसेना फुटीचा, मराठी माणसांच्या एकजूट फोडीचा नजराणाच घेऊन जात असल्याने दिल्लीचे सरकार त्यांना काहीच कमी पडू देणार नाही”, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

“महाराष्ट्रात आता पैशांचा पाऊस पडेल”

दरम्यान, भाजपाप्रणीत सरकार राज्यात आल्यामुळे दिल्लीची पूर्ण मदत महाराष्ट्राला आता मिळेल, असं शिवसेनेनं म्हटलं आहे. “महाराष्ट्रात आता पैशांचा पाऊस पडेल. हात पुढे केला की हवे ते मिळेल. कारण महाराष्ट्रात दिल्लीच्या मनाप्रमाणे घडलंय. शिंदे व त्यांच्या लोकांनी दिल्लीला हवं तसं करून दिलंय. महाराष्ट्राचे तीन तुकडे करून तीन वेगळी राज्ये निर्माण करण्याचा विचार दिल्लीच्या मनात आहे आणि त्याची लवकरच अंमलबजावणी होईल, असं कर्नाटकमधले भाजपाचे मंत्री जाहीरपणे बोलतात. त्यावर ना मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया ना नागपूरकर उपमुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका. महाराष्ट्र तोडण्याच्या केंद्राच्या योजनेला या दोघांचा छुपा पाठिंबा तर नाही ना? या शंकेला वाव मिळत आहे”, अशा शब्दांत शिवसेनेकडून सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

“…तर लगेच त्यांची आमदारकी रद्द होईल, कोर्टातही जावं लागणार नाही”, संजय राऊतांचा बंडखोर आमदारांना टोला!

“मुंबईबाबत दिल्लीचा विचार बरा नाही”

“शिवसेना हा एकमेव महाराष्ट्रीय बाण्याचा पक्ष आहे. याची पोटदुखी ज्यांना होती, त्यांनीच शिवसेना फोडून आनंदाची विकृत ढेकर दिली. प्रादेशिक अस्मितेस कायमचे खतम करण्याचे डावपेच देशात सुरू आहेत. मुंबईच्या बाबतीत दिल्लीचा विचार सध्या बरा नाही. मुंबईचं महत्त्व कमी करण्याची एकही संधी दिल्लीकर सोडत नाहीत. मुख्यमंत्री शिंदेंना याबाबत वेगळी बूमिका घ्यावी लागेल. भाजपाच्या हो ला हो केलेत, तर मुंबई हातची जाईलच, महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचे मनसुबे भाजपा तडीस नेईल. तेव्हा शिंदे गट काय करणार?”, असं देखील अग्रलेखात म्हटलं आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *