Headlines

“शिवसेना संपत आलेला पक्ष”, भाजपा अध्यक्ष नड्डांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले… | Uddhav Thackeray first reaction on J P Nadda statement of Shivsena will vanished pbs 91



भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शिवसेना संपत आलेला पक्ष असल्याचं म्हणत देशात केवळ भाजपा पक्ष राहणार असल्याचं वक्तव्य केलं. यावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. “महाराष्ट्रात शिवसेना संपण्याच्या मार्गावर आहे, असं नड्डा म्हणतात. मात्र, त्यांनी शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करूनच पाहावा,” असं थेट आव्हान ठाकरेंनी दिलं. ते सोमवारी (१ ऑगस्ट) मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, “जे. पी. नड्डा यांचं भाषण ऐकलं. त्यात ते म्हणत आहेत की लोकं २०-३० वर्षे इतर पक्षात काम करून भाजपात येतात. म्हणजे इथं यांचं कर्तुत्व शून्य आहे. आता यांच्याकडे काहीच आचार-विचार नाही. भाजपात लढणारा इतर कोणताच पक्ष राष्ट्रीय स्तरावर नाही. इतर पक्ष संपले, जे संपले नाहीत ते इतर सर्व पक्ष संपतील आणि केवळ भाजपाच टिकणार असंही नड्डा म्हणाले. त्यांचं हे वक्तव्य देशाला हुकुमशाहीकडे नेणारं वक्तव्य आहे.”

“शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करूनच पाहावा”

“महाराष्ट्रात शिवसेना संपण्याच्या मार्गावर आहे, असं नड्डा म्हणतात. मात्र, त्यांनी शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करूनच पाहावा. राष्ट्रवादी कुंटुंबाचा पक्ष, काँग्रेस भाऊ-बहिणीचा पक्ष असून भाजपाला वंशवादाविरोधात लढायचं असं ते म्हणतात, पण भाजपाचा वंश कोठून सुरू झाला हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण तेच म्हणतात काँग्रेस, राष्ट्रवादीसह इतर पक्षांमधील अनेक नेते भाजपात येत आहेत. इतर पक्षातील लोक त्यांच्याकडे येणार असतील तर मग भाजपाचा वंश नेमका कोणता?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी भाजपाला केला.

“आजचं राजकारण अत्यंत निर्घृण आणि घृणास्पद”

“आजचं राजकारण अत्यंत निर्घृण आणि घृणास्पद आहे. त्यांच्यासोबत येतील ते आपले हे राजकारणातलं समजू शकतो. मात्र, जे आपले गुलाम होतील ते काहीकाळ आपले आणि त्यांचं काम संपलं की ते गुलाम जातील. यातून त्यांनी गुलामगिरीकडे जाण्याची दिशा ठरवली आहे. त्याचा सर्वांनी प्रत्येक पातळीवर विरोध करायला हवा,” असंही ठाकरेंनी नमूद केलं.

हेही वाचा : Photos : सकाळी सात वाजता घरात, १० तास चौकशी, दिवसभरात ईडीकडून संजय राऊतांवर नेमकी काय कारवाई? वाचा…

“संजय राऊतांबद्दल मला अभिमान आहे”

यावेळी संजय राऊतांवरही उद्धव ठाकरे बोलले. ते म्हणाले, “संजय राऊतांबद्दल मला अभिमान आहे. तुमच्याकडे बळ आहे म्हणून तुम्ही इतरांना संपवत असाल तर दिवस कायम राहत नाहीत. दिवस फिरतील तेव्हा नड्डा काय करणार? संजय राऊत यांचा गुन्हा काय आहे? ते निर्भिड पत्रकार आहेत. ते मरेन पण शरण जाणार नाही असं म्हटलेत.”

जे. पी. नड्डा नेमकं काय म्हणाले होते?

देशातील सर्व पक्ष संपणार, फक्त भाजपाच राहणार असं विधान भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांनी केलं आहे. आपण जर आपल्या विचारधारेवर चालत राहिलो, तर देशातील सर्व प्रादेशिक पक्ष संपतील असं ते म्हणाले आहेत. जे पी नड्डा बिहारमध्ये भाजपाच्या १४ जिल्हा कार्यालयांचं उद्घाटन करण्यासाठी पोहोचले होते. यावेळी बोलताना त्यांनी हे विधान केलं. यावेळी त्यांनी शिवसेना संपत आलेला पक्ष असल्याचाही उल्लेख केला.

जे पी नड्डा म्हणाले “भाजपाच्या विरोधात लढणारा एकही राष्ट्रीय पक्ष आज शिल्लक राहिलेला नाही. आपली खरी लढाई कुटुंबवाद आणि घराणेशाहीविरोधात आहे”. विचारधारेवर चालणारा एकमेव पक्ष असल्याने फक्त भाजपाच राहणार असा दावाही यावेळी त्यांनी केला.

राऊतांच्या घरी सापडलेल्या नोटांवर ‘एकनाथ शिंदें’चं नाव, शिंदे गटाने दिली प्रतिक्रिया, म्हणाले “आम्ही गुवाहाटीला गेलो तेव्हा…”

जे पी नड्डा यांनी यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससोबत लालू प्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता पक्ष, समाजवादी पक्ष, बिजू जनता दल, तेलंगणा राष्ट्र समिती अशा अनेक पक्षांचा उल्लेख केला. ते म्हणाले की, “तामिळनाडूत घराणेशाही, शिवसेना जो संपत आलेला पक्ष आहे, तिथेही हेच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही घराणेशाही आहे. काँग्रेस तर आता भाऊ-बहिणीचा पक्ष झाला आहे”.

Maharashtra News Live : महाराष्ट्रातील विविध घडामोंडीची माहिती एका क्लिकवर…

आपल्या विचारधारेमुळे सर्व राज्यांमध्ये कमळ फुलेल असा विश्वास जे पी नड्डा यांनी व्यक्त केला आहे. या विचारधारेमुळेच जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यात आल्याचं ते म्हणाले. “काँग्रेसने कितीही प्रशिक्षण केंद्रं घेतली तरी त्यांना फायदा होणार नाही. टिकण्यासाठी तुम्हाला प्रशिक्षित कार्यकर्त्यांची गरज लागते. दोन दिवसात पक्षाचे संस्कार आत्मसात होत नाहीत,” असा टोला जे पी नड्डा यांनी लगावला.



Source link

Leave a Reply