Headlines

“आमदारांच्या मनातलं कळायला जयंत पाटील मनकवडे आहेत का?” ‘त्या’ विधानावरून शंभुराज देसाईंचा खोचक सवाल | shinde group leader shambhuraj desai on ncp leader jayant patil statement satara rmm 97



राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अलीकडेच शिंदे-फडणवीस सरकार लवकरच कोसळेल, असं विधान केलं होतं. शिंदे गटातील बहुसंख्य आमदार नाराज असून हे सरकार कधीही कोसळू शकतं, असं त्यांनी म्हटलं होतं. या विधानावरून शिंदे गटाचे आमदार आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी जयंत पाटलांना टोला लगावला आहे. आमदारांच्या मनातलं कळायला जयंत पाटील हे मनकवडे आहेत का? असा सवाल त्यांनी विचारला आहे. ते साताऱ्यात पत्रकारांशी बोलत होते.

जयंत पाटलांच्या वक्तव्याबाबत विचारलं असता शंभूराज देसाई म्हणाले की, आमदारांच्या मनातलं कळायला जयंत पाटील मनकवडे आहेत का? हे मला समजत नाही. त्यांनी सहकार मंत्री, शिक्षण मंत्री आणि वित्त मंत्री म्हणून चांगलं काम केलं आहे. पण आता कुणाच्या मनात काय चाललं आहे, हे ओळखायचं नवीन ज्ञान त्यांना मिळालं आहे, असं मला वाटतं, असा टोला देसाई यांनी लगावला आहे.

हेही वाचा- “महाविकास आघाडीतून बाहेर पडावं म्हणून मी पाच वेळा…” एकनाथ शिंदेंनी सांगितला ‘तो’ प्रसंग

एकनाथ शिंदे यांच्या गटात असणारा एकही आमदार नाराज नाही. आम्ही संपूर्ण विचाराअंती एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचेच काही आमदार आमच्या संपर्कात आहेत. त्यांना रोखून ठेवण्यासाठी जयंत पाटील अशा प्रकारचे वक्तव्ये करत आहेत. त्यांच्या विधानात कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही, असं स्पष्टीकरण शंभूराज देसाई यांनी दिलं आहे.

हेही वाचा“…म्हणून शिवाजी पार्कवर भाषण करण्यास गुलाबराव पाटलांवर बंदी घातली” एकनाथ शिंदेंचा खुलासा, म्हणाले…

दसरा मेळाव्यावरून सुरू असलेल्या संघर्षाबाबत बोलताना ते म्हणाले की, आमचं दसरा मेळाव्याचं पूर्ण नियोजन सुरू आहे. आम्ही आज साताऱ्याचा दौरा केला, संध्याकाळी आम्ही सोलापूरला जाणार आहोत, उद्या नगरला आणि परवा आम्ही पुण्यात जाणार आहोत. सर्व मंत्री, उपनेते आणि खासदार यांना प्रत्येक चार जिल्हे वाटून देण्यात आले आहेत. त्याप्रमाणे सर्वजण संबंधित जिल्ह्यांमध्ये दौरे करणार आहेत. सध्या चांगल्याप्रकारे वातावरण निर्मिती होत आहे. लोकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली होणारा हा दसरा मेळावा आजपर्यंत झाला नाही एवढा मोठा असेल, असंही देसाई यावेळी म्हणाले.



Source link

Leave a Reply