Headlines

“शिंदे गट ‘खोकेवाले’ म्हणून देशभरात…”; विधानसभेच्या पायऱ्यांवरील ठाकरेंविरोधातील बॅनरबाजीवरुन शिवसेनेचा संताप | Shivsena Slams CM Eknath Shinde And Group of MLA for protest Against Aditya Uddhav Thackeray in Vidhan Sabha scsg 91

[ad_1]

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दोन दिवसांमध्ये सत्ताधारी शिंदे गट आणि भाजपा सरकारमधील शिंदे गटाच्या आमदारांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरेंविरोधात आंदोलन केलं. विधानसभेच्या पायऱ्यांवर झालेल्या या आंदोलनामध्ये अगदी गळ्यात बॅनर वगैरे घालून उद्धव आणि आदित्य यांना या बंडखोर आमदारांनी लक्ष्य केलं. आता याच मुद्द्यावरुन शिवसेनेनं बंडखोर आमदारांना ‘बोको हराम’ या दहशतवादी संघटनेप्रमाणे ‘खोके हराम’ असं नाव दिलं आहे. दिल्लीमधील आम आदमी पार्टीपासून ते बिहारमधील नितीश कुमार विरुद्ध भाजपा सत्तासंघर्षामध्येही शिंदे गटातील आमदारांचा खोके घेणारे आमदार असा उल्लेख झाला असून हे महाष्ट्रासाठी अपमानकारक असल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे. ‘खोकेवाले’ म्हणून शिंदे गट देशभरात बदनाम झाल्याचा टोला शिवसेनेनं लगावला आहे.

त्यांच्या अडनावापुढे ‘खोकेवाले’ लागेल
“महाराष्ट्रात गुरुवारी विधानसभा अधिवेशनाचे सूप वाजले. हे पावसाळी अधिवेशन होते. राज्यात यंदा पाऊसही तुफान झाला आहे, पण विरोधकांनी मागणी करूनही सरकार ओला दुष्काळ जाहीर करायला तयार नाही. कारण येथे सर्व सत्ताभोगी असून जनहिताच्या बाबतीत त्यांच्या अकलेचाच दुष्काळ पडला आहे. हा अकलेचा दुष्काळ शेवटचे दोन दिवस सभागृहातून विधानसभेच्या पायऱ्यांवर दिसून आला. पण खोकेछाप शिंदे गटाचा खरा चेहरा उघड झाला. पूर्वी तालेवार लोकांना रावसाहेब, रावबहादूर वगैरे उपाध्या लावल्या जात. पण शिंदे गटाच्या लोकांपुढे म्हणजे त्यांनी चोरलेले जे आमदार वगैरे मंडळी आहेत, त्यांच्या आडनावापुढे यापुढे वंशपरंपरेने ‘खोकेवाले’ ही उपाधी लागेल,” असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.

हा शिक्का पुसता येणे कठीण
“अगदी सहज सोप्या भाषेत हा विषय समजवायचा तर ‘दिवार’ चित्रपटात अमिताभ बच्चन याच्या हातावर कोरले होते, ‘मेरा बाप चोर है!’ त्याच पद्धतीने या चोरांच्या पुढच्या पिढीच्या कपाळावर कोरले जाईल, ‘मेरा बाप, भाई, आजोबा खोकेवाला था! आणि त्याने महाराष्ट्राशी, बाळासाहेब ठाकरे यांच्याशी गद्दारी केली!’ हा शिक्का पुसता येणे कठीण आहे. ही सल मनात टोचत असल्यामुळेच दोन दिवसांपासून शिंदे गटाचे आमदार सभागृह सोडून विधानसभेच्या पायऱ्यांवर बसले व आम्ही ‘खोकेवाले नाही. आम्हाला खोकेवाले म्हणू नका’ असे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत राहिले,” असं ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटल आहे.

बच्चू कडू विरुद्ध राणा संघर्षामध्ये वरिष्ठांचीच प्रेरणा…
“अमरावतीमधील दोन आमदारांत तर खोके प्रकरणावरून चांगलीच जुंपली. रवी राणा विरुद्ध बच्चू कडू यांच्यातील कलगीतुऱ्याने चोर कोण व खोकेवाले कोण याचा पर्दाफाश झाला. रवी राणा महाशयांनी बच्चू कडू यांच्यावर त्यांच्याच गावात जाऊन प्रहार केला. ते म्हणाले, ‘जिथे पैसा तिथे बच्चू कडू. बच्चूसाठी बाप बडा न भय्या, सबसे बडा रुपय्या!’ रवी राणा म्हणतात, ‘मी गुवाहाटीला जाऊन सौदेबाजी करणारा आमदार नाही.’ रवी राणा हे सत्ताधारी पक्षाचे व देवेंद्र फडणवीस यांच्या आतल्या गोटातील आमदार आहेत. ते रोज उठून हनुमान चालिसाचे पठण करतात. त्यामुळे त्यांना सत्य बोलण्याची प्रेरणा व बळ मिळत असावे. शिवाय रवी राणा यांनी जे हनुमान चालिसा आंदोलन सुरू केले त्यामुळे महाराष्ट्रातील खोकेवाल्या कौरवांच्या बाबतीत त्यांच्या मनात राग निर्माण झाला असावा. राणा यांनी मनी सत्याची चाड धरून बच्चू कडू खोकेवाला यांच्यावर जो हल्ला केला, त्यामागे त्यांच्या वरिष्ठांचीच प्रेरणा असावी,” असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.

मुंख्यमंत्री शिंदेंनाही लगावला टोला
“महाराष्ट्राची जेवढी बदनामी या खोके प्रकरणाने केली तेवढी आतापर्यंत कोणीच केली नसेल. शिंदे गटातील सर्व कडू, गोड, आंबट, तिखट, तुरट हे खोक्यांच्या नादी लागले. पण नाव महाराष्ट्राचे बदनाम झाले. पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी खोकेवाले आमदार पुन्हा विधानसभेच्या पायऱ्यांवर बसले. त्यांनी अंगावर चित्रविचित्र पोस्टर्सचे कपडे घालून होळीची सोंगं आणली. त्यांचे वर्तन आणि हावभाव अत्यंत विचित्र व उबग आणणारे होते. फक्त पाठीमागे शेपटी लावून माकडउड्या मारायचेच काय ते बाकी होते. आपण आता सत्ताधारी बाकांवर आहोत व विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या ‘खोका’ पक्षाचे महनीय सदस्य आहोत. सत्ताधारी बाकांवर बसून आपणास लोकहिताची, राज्याच्या कल्याणाची कामे पुढे रेटायची आहेत हे खरे म्हणजे त्यांच्या लक्षात राहायला हवे. मात्र त्याचाच विसर या मंडळींना पडावा, हे त्यांच्या चारित्र्यास साजेसे आहे. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसलेल्या खोका आमदारांचे हे विचित्र चाळे मुख्यमंत्री स्वतः पाहत होते व त्यांनी या आमदारांना भल्याच्या चार गोष्टी सांगितल्या नाहीत. कारण आडातच नाही तेथे पोहोऱ्यात कोठून येणार? हाच प्रश्न आहे,” अशा शब्दांमध्ये शिवसेनेनं मुख्यमंत्री शिंदे यांनाही लक्ष्य केलं आहे.

खोकेवाल्यांचा उद्धार झालाच
“त्या खोका आमदारांचा माकडखेळ पाहत आपले मुख्यमंत्री उभे राहिले व खोकेवाल्यांची कहाणी सफल झाली. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. पावसाने राज्यात हाहाकार माजला आहे. दहीहंडीच्या खोकेवाले पुरस्कृत खेळाने अनेक गोविंदांचा मृत्यू झाला आहे, पण सत्ताधारी पक्षाचे ‘खोकेवाले गोविंदा’ विधानसभेच्या पायरीवर बसून हाणामारी करीत राहिले. महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेचे व स्वाभिमानाचे हे असे मातेरे झाले. राज्याच्या रस्त्यांवर आज फक्त खड्डे आहेत. त्या खड्ड्यांचे रस्ते कधी होणार? मुख्यमंत्री म्हणतात, सर्व रस्ते सिमेंटचे करू. कराल तेव्हा कराल. पण सध्या महाराष्ट्र खड्ड्यात व आमदार खोक्यांत फसले आहेत. महाराष्ट्रात व बाहेर जेथे जावे तेथे लोक खोकेवाल्यांच्या नावाने बोंब मारीत आहेत. दिल्लीत मुख्यमंत्री केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री सिसोदिया यांनी जाहीरपणे सांगितले आहे की, ‘महाराष्ट्रातील खोक्यांचा फॉर्म्युला वापरून ‘आप’चे आमदार विकत घेण्याचा प्रकार सुरू झाला आहे.’ म्हणजे महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसलेल्या खोकेवाल्यांचा उद्धार झालाच,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

‘खोके हरामां’चे अस्तित्व फार काळ राहणार नाही
“बिहारात राजद-जदयुचे नेते जाहीरपणे बोलत आहेत, ‘महाराष्ट्र में जो खोकेवाली राजनीती हुई, वो बिहार में फेल हो गयी!’ पायरीवरच्या खोकेवाल्यांनी हे नीट समजून घ्यावे. सर्वत्र खोकेवाल्यांचीच धामधूम आहे. गद्दारीचे दुसरे नाव खोकेवाले पडले आहे. महाराष्ट्राला हा कलंकच लागला म्हणायचा. जगाच्या पाठीवर ‘बोको हराम’ नावाची एक बदनाम संघटना आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात ‘खोके हराम’ नावाची संघटना उदयास आली आहे. त्यात बोकेही आहेत आणि खोकेही आहेत. हरामखोरी हाच त्यांचा धर्म आहे. ‘खोके हरामां’चे अस्तित्व फार काळ राहणार नाही, हे मात्र नक्की,” असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *