शेकापच्या भूमिकेमुळे रायगडात राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी ; स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आघाडी संपुष्टात येण्याची चिन्हेहर्षद कशाळकर, लोकसत्ता

अलिबाग : विधानसभा निवडणुकीत झालेल्या बंडखोरीमुळे शेकाप उमेदवारांचा पराभव झाला, एकदा फसलो असलो तरी यापुढे नाही फसणार, पराभवाचा बदला घेणार अशी भूमिका शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी पक्षाच्या अमृतमहोत्सवी वर्धापनदिनाच्या निमित्ताने मांडली. या भूमिकेमुळे रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सुंपष्टात येण्याची शक्यता आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत शेकापचे तीनही उमेदवार पराभूत झाले होते. अलिबागमधून सुभाष पाटील, पेणमधून धैर्यशील पाटील तर उरणमधून विवेक पाटील यांचा पराभव झाला होता. विधानसभा निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच शेकापचा एकही आमदार रायगड जिल्ह्यातून निवडून आला नव्हता. या पराभवाला राष्ट्रवादी काँग्रेस जबाबदार असल्याचा दावा शेकापनेते वारंवार करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने फसवल्यानेच शेकापचे उमेदवार पराभूत झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर शेकाप वर्धापन दिन सोहळय़ात जयंत पाटील यांनी एकदा फसलो पुन्हा नाही फसणार, समविचारी पक्षांना सोबत घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील यांनी अलिबागलाघेतलेल्या पत्रकार परिषदेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाची शेकाप सोबत आघाडी करण्याची तयारी असल्याचे स्पष्ट केले होते. आघाडी संदर्भातील अंतिम निर्णय खासदार सुनील तटकरेच घेतील असे जाहीर केले होते. यानंतर रोहा येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात खासदार सुनील तटकरे यांनी आम्ही वेट अ‍ॅण्ड वॉचच्या भूमिकेत आहोत. कुठल्याही पक्षाला आम्हाला सोबत घेतल्याशिवाय जिल्हा परिषदेवर सत्ता मिळवता येणार नसल्याचे म्हटले होते.

या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर झालेल्या शेकाप वर्धापन दिन सोहळय़ात पक्षाचे सरचिटणीस कोणती भूमिका घेतात याकडे सर्वाचेच लक्ष लागले होते. आपल्या भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसचा थेट उल्लेख करणे टाळले असले पण यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. धैर्यशील पाटील यांनी काँग्रेस विचाराशी जुळवून घेणे ही पक्षाची मोठी चूक ठरल्याची भूमिका मांडली. यापुढे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जायला नको अशी मागणी त्यांनी केली. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषद निवडणूकांमध्ये शेकाप राष्ट्रवादी काँग्रेसशी जुळवून घेण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे दिसून येत आहे.

शिवसेनेचा बंडखोर गट आधीच राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज आहे. शिवसेनेचे तीनही आमदार राष्ट्रवादीच्या विरोधात सातत्त्याने आक्रमक भूमिका घेत आले आहेत. त्यामुळे शिवसेनेचा बंडखोर गट राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात असणार आहे. अशा परिस्थितीत शेकापने घेतलेल्या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्ह्यात कोंडी होणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संबंध जिल्ह्यात फारसे चांगले नाहीत. त्यामुळे तेही राष्ट्रवादी काँग्रेसशी जुळवून घेण्यास फारसे इच्छुक असणार नाहीत. तसे झाले तर जिल्ह्यात बदलत्या राजकीय परिस्थितीचा सर्वाधिक फटका जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला बसू शकेल.

Source link

Leave a Reply