Headlines

शहापूर उपजिल्हा रुग्णालयात स्वातंत्र्यदिनी सहा बालकांवर जटिल शस्त्रक्रिया

[ad_1]

संदीप आचार्य

शहापूरच्या आदिवासी पाड्यातून शस्त्रक्रियागृहाबाहेर सहा बालके शस्त्रक्रियेसाठी आली होती. मानेला जन्मजात गाठ असलेल्या बाळापासून ते हायड्रोसिल तसेच जीभ टाळूला चिकटलेल्या बाळांच्या शस्त्रक्रिया करायच्या होत्या. स्वातंत्र्यदिनी आरोग्य विभागाच्या शहापूर उपजिल्हा रुग्णालयात विख्यात बालशल्य चिकित्सक डॉ. संजय ओक व त्यांच्या पथकाने एकापाठोपाठ एक अशा सहाही शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या. केईएमचे अधिष्ठाता व पालिकेच्या सर्व रुग्णालयांचे संचालक म्हणून ११ वर्षांपूर्वी निवृत्त झालेले डॉ. ओक हे वर्षाकाठी शासनाच्या ग्रामीण रुग्णालयात जाऊन सुमारे एक हजार बालकांच्या शस्त्रक्रिया करतात.

आरोग्य विभागाच्या उपजिल्हा तसेच जिल्हा रुग्णालयात खाजगी डॉक्टरांनी येऊन स्वेच्छेने रुग्णसेवा करावी, असे आरोग्य विभागाचे धोरण आहे. तथापि फारच थोडे खाजगी तज्ज्ञ अशा प्रकारे ग्रामीण भागातील आरोग्य विभागाच्या रुग्णालयात जाऊन शस्त्रक्रिया करतात. डॉ. ओक हे अशांपैकी एक असून गेली ११ वर्षे दर रविवारी शहापूर उपजिल्हा रुग्णालय, अलीबाग जिल्हा रुग्णालय, पनवेल रुग्णालय तसेच डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात जाऊन लहान मुलांवरील जटील शस्त्रक्रिया करतात. शहापूर उपजिल्हा रुग्णालयाअंतर्गत झालेल्या शस्त्रक्रियांसाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत तेथील डॉक्टर आदिवासी क्षेत्रातील आश्रमशाळा, जिल्हा परिषदेच्या शाळा तसेच आंगणवाड्यात जाऊन नियमितपणे बालकांच्या आरोग्याची तपासणी करतात. यात अनेकदा हृदयविकाराच्या रुग्णांपासून ते कर्करुग्णांपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे रुग्ण आढळतात असे वैद्यकीय अधिकारी डॉ. संकेत कुलकर्णी यांनी सांगितले. यापैकी ज्या रुग्णांवर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रिया करणे शक्य असते, अशा बालरुग्णांची तपासणी करून डॉ. ओक तसेच डॉ. अभय गुप्ता आणि भूलतज्ज्ञ डॉ. जयश्री कोरे या शस्त्रक्रिया करतात. साधारणपणे आमच्या रुग्णालयात वर्षाकाठी लहान मुलांच्या शंभर ते दीडशे शस्त्रक्रिया केल्या जातात, असे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोहर बनसोडे यांनी सांगितले. या शस्त्रक्रियांसाठी आमच्या रुग्णालयात सुसज्ज अशी मॉड्युलर शस्त्रक्रियागृह असून तेथे या शस्त्रक्रिया करण्यात येतात असेही डॉ. बनसोडे यांनी सांगितले.

२०१७ ते जानेवारी २०२० पर्यंत आमच्याकडे ३८३ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यानंतर करोनाच्या काळात शस्त्रक्रिया बंद होत्या. मात्र एप्रिल २०२२ पासून आतापर्यंत ४१ लहान मुलांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य योजनेतील डॉक्टर जिल्ह्यातील ५७० अंगणवाड्या, ५०२ शाळा तसेच २४ आश्रम शाळांना वर्षातून दोनवेळ भेटी देऊन तेथील मुलांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येते. यात वेगवेळ्या आजारांचे तसेच ज्यांना शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे अशा मुलांचा शोध घेऊन त्यांच्या शस्त्रक्रियांची व्यवस्था केली जाते असे डॉ. संकेत कुलकर्णी यांनी सांगितले.

डॉ. ओक यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले की, मी आठवड्यातील प्रत्येक रविवार लहान मुलांच्या शस्त्रक्रियांसाठी देतो. अन्य खाजगी व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांना कदाचित एवढा वेळ देता येणार नाही, हे मान्य केले तरी महिन्यातून एखादा रविवार या लहान मुलांच्या शस्त्रक्रियेसाठी दिल्यास आदिवासी तसेच ग्रामीण दुर्गम भागातील लहान मुलांच्या रखडलेल्या शस्त्रक्रिया लवकर होऊ शकतील. साधारणपणे वर्षाकाठी मी वेगवेगळ्या शासकीय रुग्णालयात जाऊन ७०० ते हजार शस्त्रक्रिया करतो. ज्या जटिल शस्त्रक्रिया शासकीय रुग्णालयात करता येणे शक्य नसते, अशा शस्त्रक्रिया ठाण्यातील कौशल्या रुग्णालयात केल्या जातात तर कर्करुग्णांवर पालिकेच्या शीव रुग्णालयातही शस्त्रक्रिया करण्यात येतात, असे डॉ. ओक यांनी सांगितले.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *