Headlines

सळई उद्योगांवर छापे; ५६ कोटींची रोकड, १४ कोटींचे सोने जप्त: जालन्यासह चार जिल्ह्यांत प्राप्तिकर विभागाची कारवाई

[ad_1]

औरंगाबाद, जालना : राज्यातील जालना, औरंगाबाद, नाशिक आणि मुंबईमध्ये सळई उद्योगाशी संबंधित ठिकाणांवर प्राप्तिकर विभागाने छापे टाकले. त्यात १२० कोटींची करचुकवेगिरी उघड झाली असून, ५६ कोटींची रोकड, १४ कोटींचे सोने जप्त करण्यात आले. 

  १ ते ८ ऑगस्टदरम्यान प्राप्तिकर विभागाचे २०० पेक्षा अधिक अधिकारी आणि कर्मचारी जालना शहरात ठाण मांडून होते. नाशिकमधील पाच पथकांनी ही कारवाई केली. जालना औद्योगिक वसाहतीमधील एसआरजे पित्ती स्टील्स प्रा. लि. आणि कालिका स्टील्स अलॉय प्रा. लि. या दोन उद्योगांची नावे प्राप्तिकर छाप्याबाबत गेल्या आठवडाभरापासून चर्चेत आहेत. याशिवाय विमलराज सिंघवी तसेच प्रदीप बोरा या दोन व्यावसायिकांची नावेही प्राप्तिकर विभागाच्या छाप्यांच्या अनुषंगाने चर्चेत आहेत. गुरुवारी या छाप्यांतील बेहिशेबी मालमत्तेचे वृत्त आणि छाप्यांच्या वेळी सापडलेल्या कोटय़वधी रुपयांच्या नोटांची छायाचित्रे प्रसारमाध्यमांतून समोर आली. त्यामुळे प्राप्तिकर कार्यालयाच्या नाशिक येथील अन्वेषण आणि शोध विभागाने केलेल्या कारवाईची व्यापकता स्पष्ट झाली़

जालना शहरात १२ मोठय़ा व २० च्या आसपास सळई उत्पादक कंपन्या आहेत. मध्य प्रदेश, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेशात सळयांचा पुरवठा या उद्योगातून केला जातो. गेल्या काही दिवसांपूर्वी वस्तू सेवा कर चोरी करणाऱ्या व्यापारी व उद्योगाच्या साठय़ाची तपासणी करण्यासाठी राज्यातील वस्तू सेवा कर विभागानेही कारवाई केली होती. १५० कोटींपेक्षा अधिक वीज देयके भरणाऱ्या जालना उद्योग समूहातील कर चुकवेगिरीची चर्चा नेहमी होत असे. मात्र, झालेल्या कारवाईची माहिती उपलब्ध होत नव्हती.  जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांनी प्रदूषण करणाऱ्या सळया उत्पादक कारखान्यांना नोटिस दिल्या होत्या. त्यानंतर प्राप्तिकर आणि वस्तू व सेवा कर विभागातील कारवाईचा तपशील बाहेर येत नव्हते. या वेळी प्राप्तिकर विभागाच्या प्रसिद्धिपत्रकात कर चुकवेगिरीच्या कार्यपद्धतीचाही उल्लेख करण्यात आला आहे.

कर्मचाऱ्यांच्या नावे लॉकर

जालन्यातील स्टील उद्योगांनी कोलकाता येथे बनावट कंपन्या तयार करून गैरव्यवहार केल्याचे या छाप्यात स्पष्ट झाले. काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या नावे नागरी सहकारी बँकांमध्ये लॉकर उघडले. अधिकचा खर्च दाखवून वेगवेगळय़ा प्रकराची अनुदाने मिळवून गैरव्यवहार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. विविध ठिकाणी केलेल्या लॉकरच्या तपासणीत बेहिशेबी संपत्ती आढळून आल्याचा दावा प्राप्तिकर विभागाकडून करण्यात आला.

जालन्यात कारवाई कुठे? एसआरजे पित्ती स्टील्स प्रा. लि.,  कालिका स्टील्स अलॉय प्रा. लि या कंपन्यांवर कारवाई झाल्याचे समजते. तसेच विमलराज सिंघवी आणि प्रदीप बोरा या व्यावसायिकांवर कारवाई झाल्याची चर्चा आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *