23 डिसेंबर 2022 पर्यंत अर्ज सादर करावेत

सोलापूर: सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राबविण्यात येणा-या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवठा या योजनेचा लाभ घेण्यासाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, सोलापूर येथे दिनांक 23 डिसेंबर 2022 पर्यंत अर्ज सादर करावेत असे, आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त कैलास आढे यांनी केले आहे.
स्वयंसहाय्यता बचत गटांना त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे या हेतून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना 90 टक्के (कमाल मर्यादा 3.15 लाख) शासकीय अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने याचा पुरवठा करण्यात येणार आहे. स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने याची कमाल मर्यादा 3.50 लाख इतकी राहील. स्वयंसहाय्यता बचत गटांनी कमाल मर्यादेच्या रक्कमेच्या 10 टक्के स्वहिस्सा भरल्यानंतर लाभ अनुज्ञेय आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावेत. स्वयंसहाय्यता बचत गटातील 80 टक्के सदस्य अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील असावेत व त्याबाबत सक्षम अधिकारी यांनी दिलेले जातीचे दाखले सादर करावेत.
बचत गटातील लाभार्थ्यांनी या अगोदर पॉवर टिलर व मिनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेतलेल्या नसावा. स्वयंसहाय्यता बचत गटांना योजनेचा लाभ दिल्यानंतर सदरची वस्तु गहाण किंवा विकता येणार नाही. स्वयंसहाय्यता बचत गटाचे अध्यक्ष व सचिव अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील असावेत. स्वयंसहाय्यता बचत गटातील सर्व सदस्याचे रेशनकार्ड, आधारकार्ड तसेच ग्रामसेवक ,सरपंच व तलाठी यांचे रहिवाशी प्रमाणपत्र असावे. स्वयंसहाय्यता बचत गटाचे राष्ट्रीयीकृत बँकेत खाते असावे सदर खाते आधार कार्डशी संलग्न असावे. प्राप्त उद्दिष्टांनुसार उपलब्ध तरतुदी पेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास लॉटरी पध्दतीने लाभार्थ्याची निवड केली जाईल.
जिल्हयातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील स्वयंसहाय्यता बचत गटांचे विहीत नमुन्यातील अर्जासाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन तिसरा मजला, सात रस्ता, सोलापूर या कार्यालयात कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. तसेच सदर परिपूर्ण प्रस्ताव वेळेत सादर करावेत. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. असे, आवाहनही समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त कैलास आढे यांनी केले आहे.