Headlines

सावित्रीच्या विचारानेच देशाचा समतोल विकास शक्य : दुग्धविकास युवक व क्रीडा कल्याणमंत्री सुनील केदार


नागपूर दि. 03 :समाजात वावरताना ज्या गोष्टीची लज्जा येते, घृणा वाटते, ज्या बाबींचा तिटकारा येतो अशा गोष्टी करूच नये हे संस्कार लहान वयात करण्याचे धारिष्ट्य दायित्व आणि संधी महिला जगताला प्राप्त आहे. त्यासाठी त्यांनी विपरीत परिस्थितीत समस्त महिला जगताला दिशा देणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या मार्गाला अनुसरावे. कारण याच विचाराने देशाचा समतोल विकास शक्य आहे, असे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन दुग्धविकास युवक व क्रिडा कल्याणमंत्री सुनील केदार यांनी आज येथे केले.

नागपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण, महिला व बालकल्याण, ग्राम विकास विभाग, महाराष्ट्र ग्राम सामाजिक अभियान या अंतर्गत सर्व विभागांनी संयुक्तरित्या सावित्रीबाई फुले जयंती महोत्सव आणि हिरकणी सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रश्मी बर्वे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, उपाध्यक्ष सुमित्राताई कुंभारे, सभापती उज्वला बोढारे, नेमावली माटे, भारती पाटील, तापेश्वर वैद्य, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे, प्रकल्प संचालक विवेक इलमे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत प्रमिला जाखलेकर, विविध पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, महिला पदाधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने सभागृहात उपस्थिती होती.

उत्तम संस्कारातील मुले, चांगले आणि वाईट जाणत्या वयातच कळणारी मुले, प्रगत व संस्कारी समाजाचा घटक होऊ शकतात. त्यामुळे आई ही एकच व्यक्ती अगदी तिसऱ्या ते सातव्या वर्षापर्यंत उत्तम संस्कारी मुले घडू शकते. सुदृढ समाजासाठी संस्कारक्षम पिढीचे असणे आवश्यक आहे, भारतीय अशिक्षित समाजावर महिला शिक्षणाचे महत्त्व बिंबविणाऱ्या सावित्रीबाई त्यामुळे देशाच्या आद्य शिक्षिका आहेत. हा देश त्यांच्या विचाराने प्रगती करू शकतो, अशी ग्वाही ना.केदार यांनी यावेळी दिली.

नागपूर जिल्हा परिषदेत मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी आहेत. ज्यांना प्रशासनाचा अनुभव नाही. मात्र उत्तम प्रशासन त्या जिल्ह्याला देत आहे. सावित्रीबाईचा आदर्श घेऊन ज्या महिला मागे राहिल्या त्यांच्या आयुष्यात बदल घडविण्यासाठी या सत्तेचा वापर पदाधिकाऱ्यांनी करावा.समतोल विकासाची कामे त्यांच्यामार्फत व्हावीत, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रश्मी बर्वे यांनी अन्यायग्रस्त महिलांना बाहेर काढण्यासाठी नेतृत्व वापरण्याचे आवाहन यावेळी केले. जिल्हा परिषदेने संयुक्तरित्या आयोजित केलेल्या उत्तम उपक्रमाचे कौतुक केले.

या कार्यक्रमात सावरा, वाघ, ढवळापुर, मानोरा या चार शाळांना साहित्य वाटप करण्यात आले. तर गायत्री भोला बिसांद्रे, डॉ. श्रमश्री मोरेश्वर लेंडे, वनिता खोंडे, पपीता सुरेश पाटील, प्रगती नरनावरे, एडवोकेट अड. मीनल रचाते, मनीषा उघडे, डॉ. सोनाली बाके, सैलजा बाबू, दूर्गा पातूरकर, निलू आत्राम, माया भोईटे, वैशाली पांडे धुर्वे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच ईश्वरी कमलेश पांडे या दृष्टीबाधित किशोर तरणपटूचा विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे संचालन वैशाली पांडवे धुर्वे यांनी केले. तर आभार प्रदर्शन माध्यमिक शिक्षणाधिकारी काटोलकर यांनी केले.

Source link

Leave a Reply