Headlines

सतीश आळेकर यांना विष्णुदास भावे गौरव पदक

[ad_1]

सांगली : नाटय़क्षेत्रात मानाचे समजले जाणारे विष्णुदास भावे गौरव पदक यंदा ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक, अभिनेते, पटकथा  लेखक पद्यश्री सतीश आळेकर यांना जाहीर करण्यात आले. गौरवपदक, २५ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्काराचे वितरण ५ नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या हस्ते होणार आहे. अखिल महाराष्ट्र नाटय़ विद्यामंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी या पुरस्काराची घोषणा गुरुवारी सांगलीत केली.

आद्यनाटककार विष्णुदास भावे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नाटय़क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तीस हे गौरवपदक देण्यात येते. करोनामुळे दोन वर्षे पदक वितरण सोहळय़ात खंड पडला होता. परंतु आता निर्बंध उठवल्याने यंदा हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. अखिल महाराष्ट्र नाटय़ विद्यामंदिर ही संस्था गेल्या ८० वर्षांपासून नाटय़क्षेत्रात कार्यरत आहे.  आळेकर यांनी रंगभूमीशी संबंधित विविध क्षेत्रात लीलया संचार केला आहे. सन १९७३ सालापासून १९९२ पर्यंत थिएटर अकादमी संस्थेचे व्यवस्थापक पदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती. सन १९९६ ते २००० या कालावधीत पुणे विद्यापीठात ललित कला केंद्राचे विभाग प्रमुख म्हणून ते कार्यरत होते. ‘मिकी आणि मेमसाब’, ‘महानिर्वाण’, ‘महापूरसारख्या’ नाटकाचे लेखन त्यांनी केले आहे. तसेच ‘झुलता पूल’, ‘मेमरीख् भजन’,‘सामना’ आदी एकांकिका, ‘बेगम बर्वे’, ‘शनवार-रविवार’,‘महानिर्वाण’ या नाटकांचे दिग्दर्शन केले आहे. नाटकातून अभिनय करण्याबरोबरच आळेकर यांनी काही मराठी, हिंदी चित्रपट आणि दूरचित्रवाणीवरील मालिकांमधून विविध व्यक्तिरेखा रंगविल्या आहेत. त्यांना पद्यश्री पुरस्कारासह राज्य शासनाचा नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कारासह नाटय़क्षेत्रातील मानाचे पुरस्कार मिळालेले आहेत. 

पत्रकार बैठकीस विनायक केळकर,विलास गुप्ते, मेघा केळकर, जगदीश कराळे, आनंदराव पाटील, बलदेव गवळी, प्राचार्य भास्कर ताम्हनकर, विवेक देशपांडे, भालचंद्र चितळे उपस्थित होते.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *