गेल्या काही दिवसांपासून राज्यात शिवसेना विरुद्ध शिंदे गट यांच्यात सातत्याने संघर्ष सुरू आहे. आज पुन्हा सामनातून शिंदे गटावर टीका करण्यात आली. “मधुचंद्र तर केला, पण लग्नच करायचे विसरलो अशी शिंदे गटाची अवस्था झाली आहे”, असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले होते. त्याला शिंदे गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. “मधुचंद्र, लग्न हे शब्द ठाकरेंच्या तोंडी शोभत नाही”, असं शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले संजय शिरसाट?
”सामना सारख्या वर्तमान पत्राचे मुख्य संपादक आता उद्धव ठाकरे आहेत. त्यांच्या तोंडी मधुचंद्र, लग्न असे शब्द शोभत नाही. आम्ही एका चांगला नेता म्हणून त्यांच्याकडे बघतो. मात्र, ते म्हणातात तसं आम्ही मधुचंद्राची एक महिन्यापूर्वी जी सुरूवात केली होती, ती यासाठी की आपलं लग्न पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे. तो लग्नाचा योग आता जुळून आला आहे. लग्नापूर्वी प्रेम होत नाही, असं कधी होत नाही. ज्याचे लग्नापूर्वी प्रेम झालेत ना, त्यांनी लग्नाचं काय होईल. यावर जास्त न बोललेलं बर असतं. त्यामुळे आमचा मधुचंद्रही झाला आहे आणि लग्नही झाले आहे. फक्त तुम्हाल बोलावण्याच योग आला नव्हता, तोही लवकरच येईल.”, असे प्रत्युत्तर संजय शिरसाट यांनी दिले आहे.
हेही वाचा – “चंद्रकांत खैरेंच्या डोक्यावर परिणाम झालाय” बंडखोर आमदार संजय शिरसाटांची बोचरी टीका!
सामनामधून शिंदे गटावर टीका
‘महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा फैसला आता जवळ आला आहे. या प्रकरणात काय घडले की, आपण घाईघाईने मधुचंद्र तर केला, पण लग्नच करायचे विसरलो! अशी शिंदे गटाची अवस्था झाली आहे’, अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली होती. मुख्यमंत्रीपदाची वरमाला बळेबळे गळ्यात घालून घेतली, पण मंत्रिमंडळ जन्माला येत नाही. त्यामुळे शिंदे-फडणवीसांच्या मधुचंद्रावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असंही लेखात म्हटले होते.