संजय शिरसाटांच्या कार्यालयातून ठाकरेंचे फोटो हद्दपार, चंद्रकांत खैरेंचा जोरदार हल्लाबोल, म्हणाले… | Chandrakant Khaire answer Sanjay Shirsat over removing photos of Aaditya Uddhav Thackeray pbs 91



शिवसेनेतून बंडखोरी करणाऱ्या आमदारांनी आधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंविषयी कोणतीही तक्रार नसल्याचं म्हणत ठाकरे कुटुंबाविषयी आजही आदर असल्याचे दावे केले. मात्र, काही दिवसातच बंडखोरांनी आदित्य ठाकरेंसह थेट उद्धव ठाकरेवरही शाब्दिक हल्ले करण्यास सुरुवात केली. आता तर शिंदे गटातील बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेना कार्यालयातून आदित्य व उद्धव ठाकरे यांचे फोटोही हटवले. यावर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी ‘ज्यांनी मोठं केलं त्यांनाच लोक विसरतात’ असं म्हणत जोरदार हल्ला चढवला. ते मंगळवारी (२ ऑगस्ट) एबीपी माझाशी बोलत होते.

चंद्रकांत खैरे म्हणाले, “ज्यांनी कार्यालयाचं उद्घाटन केलं, ज्यांनी तिकीट दिलं, मोठं केलं आणि ज्यांनी निवडून आणलं त्यांनाच हे लोकं विसरतात. ज्यांनी मोठं केलं त्यांना कधी विसरायचं नसतं हे एक नीतीमूल्य आहे. मात्र, या लोकांना इतका गर्व झालाय की, त्यांनाच कुणाचीच किंमत नाही.”

“शिरसाट आठवड्यातून पाच दिवस मुंबईत एकनाथ शिंदेंकडे पडलेले असायचे”

“हे संजय शिरसाट आठवड्यातून पाच दिवस मुंबईत एकनाथ शिंदेंकडे पडलेले असायचे. त्यानंतरही जनतेने त्यांना तिसऱ्यांदा निवडून दिलं. त्यांनी जमिनीवर राहायला हवं. उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांचे फोटो काढणं म्हणजे शिवसेनेच्या कार्यालयाचा अपमान आहे,” असंही खैरेंनी नमूद केलं.

संजय शिरसाट काय म्हणाले?

संजय शिरसाट म्हणाले की, “आदित्य ठाकरे यांचा फोटो माझ्या कार्यालयात नव्हता. उद्धव ठाकरेंचा फोटो जरूर होता. माझ्या कार्यालयात नेहमी एकच फोटो असतो. तुम्ही कार्यालयात पाहिलं तर तुम्हाला माझाही फोटो कुठे दिसणार नाही. पण आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. आम्ही त्यांच्यासोबत काम करत आहोत. त्यामुळे त्यांचा फोटो माझ्या कार्यालयात असणं अत्यावश्यक आहे.”

“शिवसेना प्रमुखांचा फोटो आयुष्यात कधीही हलणार नाही”

“राहिला प्रश्न शिवसेना प्रमुखांच्या फोटोचा, तर ते आमच्या हृदयस्थानी आहेत. त्यामुळे कार्यालयात प्रवेश करताच तुम्हाला शिवसेना प्रमुखांचा फोटो दिसेल आणि तो आयुष्यात कधीही तेथून हलणार नाही. कारण त्या शिवसेना प्रमुखांनी आम्हाला मोठं केलं आहे. शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादामुळेच आम्ही मोठे आहोत” असंही शिरसाट म्हणाले.

हेही वाचा : “शिवसेना संपत आलेला पक्ष”, भाजपा अध्यक्ष नड्डांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

उद्धव ठाकरेंना उद्देशून शिरसाट पुढे म्हणाले, “आम्हाला गद्दार, बंडखोर म्हणून तुम्ही रोजच आमची टेहाळणी करत असाल तर, आम्ही त्यांच्या फोटोकडे पाहून काय समजायचं? अरे हे… आम्हाला गद्दार म्हणतात, हे आम्हाला बंडखोर म्हणतात, हे आम्हाला विकलेले म्हणतात, असं सगळं पाहून आम्ही त्यांना अपेक्षित धरायचं का? ज्यादिवशी ते चांगलं बोलायला लागतील, तेव्हा त्यांच्याही फोटो कार्यालयात लावण्यात येईल.”



Source link

Leave a Reply