संजय राऊतांच्या अटकेनंतर बाळासाहेब ठाकरेंच्या वाहन चालकाने वाटले पेढे; म्हणाला, “२०२४ पर्यंत राऊत…” | Prakash Rajput Driver of Balasaheb Thackeray celebrate arrest of Sanjay Raut with Shrikant Shinde in Delhi pbs 91शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली आणि त्यानंतर न्यायालयाने त्यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली. त्यानंतर मंगळवारी (२ ऑगस्ट) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वाहन चालकाने दिल्लीत खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली आणि पेढे वाटून आनंद व्यक्त केला. प्रकाश राजपूत असं या वाहन चालकांचं नाव आहे. त्यांनी १९९३ ते २००० या काळात बाळासाहेब ठाकरेंच्या गाडीवर चालक म्हणून काम केल्याचं सांगितलं. याबाबत झी २४ तासने वृत्त दिलं आहे.

प्रकाश राजपूत यांनी दिल्लीत जाऊन खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. तसेच श्रीकांत शिंदेंना पुष्पगुच्छ आणि पेढे दिले. यानंतर संजय राऊतांच्या अटकेवर बोलताना राजपुतांनी खूप आनंद झाल्याची भावना व्यक्त केली. तसेच संजय राऊतांनी शिवसेना संपवण्याचं काम केल्याचा आरोप करत आता राऊत २०२४ पर्यंत तुरुंगातून बाहेर निघायला नको, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

“संजय राऊत २०२४ पर्यंत तुरुंगातून बाहेर निघायला नको”

धुळे जिल्ह्यातील शिरपूरचे प्रकाश राजपूत म्हणाले, “संजय राऊत जेलमध्ये गेले त्याबद्दल मी खूप खुश आहे. त्या निमित्ताने मी खासदार श्रीकांत शिंदे यांना पेढे दिले आहेत. राऊतांनी चुकीची कामं केली आणि शिवसेना संपवली. आता २०२४ पर्यंत ते तुरुंगाबाहेर निघायला नको.”

“मी १९९३ ते २००० या काळात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या गाडीवर चालक होतो,” असंही राजपूत यांनी नमूद केलं.

हेही वाचा : Photos : सकाळी सात वाजता घरात, १० तास चौकशी, दिवसभरात ईडीकडून संजय राऊतांवर नेमकी काय कारवाई? वाचा…

राजपूतांच्या प्रतिक्रियेनंतर राजकीय चर्चांना उधाण

एकूणच शिवसेनेतील बंडखोर गटाकडून वारंवार ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना नाही. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदासाठी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केल्याचा आरोप करत ठाकरे कुटुंबाला घेरण्याचा प्रयत्न होत आहे. अशातच आता प्रकाश राजपूत या बाळासाहेबांच्या जुन्या चालकाने खासदार शिंदेंची दिल्लीत भेट घेऊन दिलेल्या या प्रतिक्रियेची जोरदार चर्चा आहे. शिंदे गटाने ठाकरे कुटुंबाची कोंडी करण्यासाठीच ही खेळी केल्याचा आरोपही होत आहे.Source link

Leave a Reply