Headlines

संजय राऊतांच्या अटकेनंतर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “हे सर्व जगजाहीर की…” | Aaditya Thackeray first reaction on arrest of Sanjay Raut pbs 91

[ad_1]

शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. त्यानंतर राज्यभरातून शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. राज्यात ठिकठिकाणी आंदोलन होत आहेत. शिवसेनेसह महाविकासआघाडीच्या नेत्यांनी ही राजकीय सुडापोटी केलेली कारवाई असल्याचा आरोप केलाय. अशातच शिवसंवाद यात्रेसाठी महाराष्ट्र दौऱ्यावर असणाऱ्या शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी राऊतांच्या अटकेवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते सोमवारी (१ ऑगस्ट) चिपी विमानतळावर दाखल झाल्यानंतर माध्यमांशी बोलत होते.

आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा कोकणात पोहचली आहे. ते शिवसेना बंडखोर आमदार व शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांचा मतदारसंघ असलेल्या सिंधुदुर्गमधील सावंतवाडीत मेळावा घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर चिपी विमानतळावर पोहचल्यावर पत्रकारांनी त्यांना राऊतांच्या अटकेविषयी विचारले. त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले, “हे महाराष्ट्राचा आवाज दाबण्याचं कटकारस्थान आहे आणि हे सर्व जगजाहीर आहे.”

“तुम्ही लिहून घ्या हे सरकार एक-दीड महिन्यात कोसळणार”

संवाद यात्रेत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, “हे सर्व एक दीड महिन्याचं आहे, तुम्ही लिहून घ्या हे सरकार कोसळणार आहे. महाराष्ट्र गद्दारी सहन करत नाही. मी मंत्री म्हणून काम सुरू केलं तेव्हा पहिलं काम कोकणातील पर्यटनाला चालना देण्याचा निर्णय घेतला.”

“आतापर्यंत महाराष्ट्रात इतकं घाणेरडं राजकारण पाहिलं नाही”

“सध्या दोन लोकांचं जंबो मंत्रीमंडळ आहे. कोण मुख्यमंत्री, कोण उपमुख्यमंत्री हेच कळत नाही. कुणी कुणाला बोलू देत नाही. सध्या त्यांचं लक्ष घाणेरड्या राजकारणावर आहे. मी आजोबा आणि वडिलांसोबत लहानपणापासून फिरलो, पण इतकं घाणेरडं राजकारण पाहिलं नाही,” असं म्हणत आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्ला चढवला.

“ज्याने राजकीय ओळख दिली त्याच्याच पाठीत खंजीर खुपसला”

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, “पक्ष फोडो, गद्दारी करा, ज्या माणसाने तुम्हाला घडवलं, तुम्हाला राजकीय ओळख दिली, सगळं काही दिलं त्याच माणसाच्या पाठीत खंजीर खुपसणं ही कधीही महाराष्ट्राची ओळख नव्हती. मी आज तुम्हाला इतकंच विचारायला आलो आहे की, हे घाणेरडं राजकारण तुम्हाला पटतंय का? हे सरकार बेकायदेशीर तर आहेच, पण गद्दार आणि बेईमानांचं सरकार आहे.”

हेही वाचा : Photos : सकाळी सात वाजता घरात, १० तास चौकशी, दिवसभरात ईडीकडून संजय राऊतांवर नेमकी काय कारवाई? वाचा…

“…तर देशात किती अस्थिरता निर्माण होईल”

“इथून २० आमदार फोडा, तिथून ३० आमदार फोडा, तिथून पाचचा गट घ्या अशी सरकारं बनायला लागली तर देशात किती अस्थिरता निर्माण होईल याचा विचार करा. आज देशात बेरोजगारी वाढत आहे, महागाई वाढत आहे. मात्र, महाराष्ट्रात पक्ष फोडण्याचं काम सुरू आहे,” असंही ठाकरेंनी नमूद केलं.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *