Headlines

संजय राऊत यांना ‘ईडी’कडून अटक; सपना पाटकर यांना धमकावल्याप्रकरणी वाकोला पोलीस स्थानकात FIR दाखल | Sanjay Raut has been arrested by ED claims his brother Sunil Raut scsg 91

[ad_1]

पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना रविवारी रात्री उशीरा सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली.  राऊत यांच्या भांडुप येथील निवासस्थानी ‘ईडी’ने छापे घालून सुमारे साडेअकरा लाखांची रोख रक्कम जप्त केली. त्यानंतर राऊत यांना ‘ईडी’च्या कार्यालयात नेण्यात आले. तिथे रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती. या चौकशीनंतर रात्री उशीरा राऊत यांना ईडीने अटक केल्याची माहिती समोर आली आहे. संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली. या अटकेमुळे सत्ताधारी विरुद्ध विरोधी पक्ष हा संघर्ष पुन्हा एकदा पहायला मिळणार आहे.

“संजय राऊत यांना अटक करण्यात आली आहे. भाजपा त्यांना घाबरत असल्याने त्यांना अटक करण्यात आलीय. त्यांनी आम्हाला यासंदर्भातील (अटकेसंदर्भातील) कागदपत्रं दिलेली नाहीत. त्यांना यात गोवण्यात आलेलं आहे,” असा आरोप सुनिल यांनी केला. आज सकाळी साडेअकरा वाजता त्यांना न्यायालयासमोर हजर केलं जाणार असल्याची माहितीही सुनिल राऊत यांनी दिल्याचं एएनआय या वृत्तसंस्थेनं म्हटलंय.

वाकोला पोलीस स्थानकामध्ये संजय राऊतांविरोधात कलम ५०४, ५०६ आणि ५०९ अंतर्गत सपना पाटक यांना धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपना पाटकर या पत्रा चाळ प्रकरणातील साक्षीदार आहेत.

…अन् ईडीचे पथक त्यांच्या घरी पोहोचले
संजय राऊत यांच्या भांडुप येथील ‘मैत्री’ बंगल्यावर सकाळी सातच्या सुमारास ‘ईडी’चे अधिकारी अधिकारी दाखल झाले. सुमारे दहा अधिकाऱ्यांच्या या पथकाबरोबर केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआयपीएफ) जवानही तैनात करण्यात आले होते. शिवाय दादर येथील गार्डन कोर्ट इमारतीतही येथेही ‘ईडी’कडून शोधमोहीम राबवण्यात आली. यापूर्वी ‘ईडी’ने तीनवेळा त्यांना समन्स बजावले होते. मात्र, २७ जुलैला ‘ईडी’ने चौकशीला उपस्थित राहण्यासाठी समन्स बजावले असताना राऊत चौकशीला गैरहजर राहिले होते. त्यानंतर रविवारी ‘ईडी’चे पथक राऊत यांच्या घरी पोहोचले. 

बेलार्ड पिअर येथील कार्यालयात चौकशी व अटक
राऊत यांच्या खोलीतील कागदपत्रे आणि दस्तावेज ‘ईडी’ अधिकाऱ्यांनी तपासल़े  यावेळी साडेअकरा लाख रुपये ‘ईडी’ने जप्त केले. त्यानंतर याप्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी आपल्याला ‘ईडी’ कार्यालयात यावे लागेल, असे ‘ईडी’कडून राऊत यांना सांगण्यात आले. साडेनऊ तासांच्या ‘ईडी’च्या कारवाईनंतर सायंकाळी पाचच्या सुमारास राऊत यांना घेऊन ‘ईडी’ अधिकारी बेलार्ड पिअर येथील कार्यालयाकडे निघाले.   निवासस्थानाबाहेर निघताना राऊत यांनी गाडीतून हात उंचावून शिवसैनिकांना अभिवादन केले. साडेपाचच्या सुमारास राऊत ‘ईडी’च्या बेलार्ड पिअर येथील कार्यालयात दाखल झाले. तेथे त्यांची चौकशी करण्यात आली. यावेळी राऊत यांचे भाऊ सुनील राऊत आणि वकील ‘ईडी’ कार्यालयाबाहेर उभे होते. रात्री उशीरापर्यंत ही चौकशी चालली होती. याच चौकशीनंतर राऊत यांना अटक करण्यात आली.

खोटे पुरावे तयार केल्याचा आरोप
‘ईडी’च्या कारवाईला घाबरणार नाही, त्यांच्या दबावापुढे झुकणार नाही आणि घाबरून शिवसेनाही सोडणार नाही, असा निर्धार राऊत यांनी व्यक्त केला. ‘ईडी’ने माझ्याविरोधात खोटे पुरावे तयार करून कारस्थान रचून कारवाई केली आहे. ही कारवाई खोटी आहे, असेही राऊत म्हणाले.

उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संताप
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचा अवमान केला आणि लगेच दुसऱ्या दिवशी संजय राऊत यांच्या घरी ‘ईडी’चे पाहुणे दाखल झाले. हे काय चालले आहे? हे सगळे कारस्थान इतक्या निर्लज्जपणाने चालले आहे की, लाज-लज्जा सोडून देशात दडपशाही सुरू आहे, असे टीकास्त्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी भाजपावर सोडले. या जुलूमशाहीविरोधात लढत राहू आणि महाराष्ट्राची माती काय असते, मराठी माणसाचा पराक्रम काय असतो, हे अन्याय करणाऱ्यांना दाखवून देऊ, असा निर्धारही ठाकरे यांनी व्यक्त केला.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *