Sanjay Raut Arrest: ईडीची आणखी दोन ठिकाणी छापेमारी, सर्च ऑपरेशन सुरु | ED Raids after Shivsena Sanjay Raut arrested over Patra Chawl Land Scam Case in Mumbai sgy 87पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांना अटक केल्यानंतर सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कारवाईला वेग आला आहे. ईडीने संजय राऊत यांच्या प्रकरणाशी संबंधित मुंबईतील दोन ठिकाणी छापे टाकले आहेत. ईडीकडून दोन्ही ठिकाणी झाडाझडती सुरु आहे. दरम्यान या प्रकरणाशी संबंधित आणखी काही लोकांना ईडीकडून समन्स पाठवण्यात आलं असल्याची माहिती मिळाली आहे. संजय राऊत सध्या ईडी कोठडीत आहेत.

संजय राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत कोठडी

पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी ईडीने संजय राऊत यांना रविवारी रात्री उशिरा अटक केली. राऊत यांना सोमवारी विशेष ‘ईडी’ न्यायालयापुढे हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना ४ ऑगस्टपर्यंत ‘ईडी’ कोठडी सुनावली.

Maharashtra News Live : सर्व घडामोंडीची माहिती एका क्लिकवर…

एक कोटी सहा लाख रुपये मिळाल्याचा आरोप

पत्राचाळ गैरव्यवहारातील एक कोटी सहा लाख रुपये प्रवीण राऊत यांच्यामार्फत संजय राऊत यांना मिळाल्याचा आरोप आहे. ईडी त्याबाबत तपास करत आहे. ‘ईडी’ने संजय राऊत यांना आठ दिवसांची कोठडी देण्याची मागणी न्यायालयाला केली होती. संजय राऊत यांच्या वकिलांनी कोठडी द्यायची असेल तर आठ दिवसांपेक्षा कमी द्यावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर न्यायालयाने संजय राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली. न्यायमूर्ती एम़ जी़ देशपांडे यांच्यासमोर ही सुनावणी झाली. वैद्यकीय कारणास्तव रात्री साडेदहानंतर राऊत यांची चौकशी करणार नसल्याचे ‘ईडी’कडून स्पष्ट करण्यात आले.

‘प्रवीण राऊत याचा मोहरा म्हणून वापर’

पत्राचाळ गैरव्यवहारातून संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबाला एक कोटी सहा लाख रुपये मिळाले. ‘ईडी’ने आतापर्यंत गैरव्यवहाराच्या रकमेचा माग काढला असता ‘एचडीआयएल’कडून प्रवीण राऊतच्या खात्यात सुमारे ११२ कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आल्याचे दिसून आले होते. ही रक्कम प्रवीण राऊत यांनी त्यांचे जवळचे सहकारी, कुटुंबातील सदस्य, त्यांच्या व्यावसायिक संस्था इत्यादींच्या विविध खात्यांमध्ये वळती केली. त्यातील एक कोटी सहा लाख ४४ हजार ३७५ रुपये संजय राऊत यांची पत्नी वर्षां राऊत यांना देण्यात आले. त्यातील ५५ लाख रुपये २००९-२०१० मध्ये कर्जाच्या (असुरक्षित) स्वरूपात वर्षां राऊत यांना मिळाले. त्यातून एक सदनिका खरेदी करण्यात आली. याशिवाय प्रवीण राऊतचे व्यावसायिक संबंध असलेल्या प्रथमेश डेव्हलपर्स यांच्यामार्फत वर्षां राऊत आणि संजय राऊत यांना ३७ लाख ५० हजार रुपयांचा फायदा मिळाला. त्यासाठी वर्षा आणि संजय राऊत यांनी अनुक्रमे १२ लाख ४० हजार व १७ लाख १० रुपये गुंतवणूक केली होती. अवनी इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीतील केवळ पाच हजार ६२५ रुपयांच्या गुंतवणुकीवर वर्षां राऊत यांना १३ लाख ९४ हजार फायदा मिळाला, अशी माहिती ‘ईडी’ने न्यायालयात दिली. याशिवाय संजय राऊत हे या प्रकरणाच्या कटातही सहभागी असून प्रवीण राऊत याचा मोहरा म्हणून वापर करण्यात आला. प्रवीण राऊत याने संजय राऊत यांच्याशी असलेली जवळीक दाखवून म्हाडाकडून परवानगी मिळवल्याचा आरोप ‘ईडी’ने केला आहे. राऊत यांच्याकडे आलेल्या रकमेतून आठ करारांद्वारे १० भूखंड अलिबाग येथील किहिम येथे खरेदी करण्यात आले. हे करार स्वप्ना पाटकर आणि संजय राऊत यांची पत्नी वर्षां राऊत यांच्या नावावर आहेत. तसेच पत्राचाळ गैरव्यवहारातील रक्कम व्यवहारात आणण्यासाठी अवनी इन्फ्रास्ट्रक्चर स्थापन करण्यात आल्याचा आरोप आहे. याशिवाय संजय राऊत कुटुंबियांच्या देश-विदेशातील दौऱ्याचा (प्रवासावर) खर्च प्रवीण राऊतने केल्याचा आरोप आहे. प्रकल्पाच्या काळात प्रवीण राऊत याने संजय राऊत यांना दर महिन्याला दोन लाख रुपये रोख दिल्याचाही आरोप आहे. याबाबत संजय राऊत यांचा १ जून, २०२२ मध्ये ईडीने जबाब नोंदवला होता. त्यावेळी राऊत यांनी प्रवीण राऊतच्या पत्राचाळ प्रकल्पातील सहभागाबाबत माहिती नसल्याचे सांगितले. यावेळी राऊत यांना प्रवीण राऊतकडून आलेल्या रकमेबाबत विचारणा केली असता त्यांनी कोणतेही ठोस उत्तर दिले नसल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.Source link

Leave a Reply