सांगली: अश्लील छायाचित्रांची देवाणघेवाण करत सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला साडेचौदा लाखांचा गंडा



मोबाईलवरील अ‍ॅपच्या माध्यमातून अश्लील फोटोंची देवाणघेवाण करून इस्लामपूरातील एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला साडेचौदा लाखांचा गंडा एका तरूणीने साथीदाराच्या मदतीने घातला आहे.याबाबत इस्लामपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, समतानगरमध्ये वास्तव्यास असलेल्या निवृत्त कर्मचार्‍याने शारीरिक तपासणी केली होती.

या तपासणीची माहिती घेउन मुंबई हेल्थ केअर सेंटरमधून पूजा शर्मा या नावाच्या महिलेने दूरध्वनीवर संपर्क साधून आपल्याकडे तपासणी फाईल आली असून संपूर्ण शरीर तपासणी करावी लागणार असल्याचे सांगितले. त्यानंतर व्हॉटसअ‍ॅपवर अर्धनग्न छायाचित्रे मागवून घेतली. यानंतर त्याच क्रमांकावरून महिलेने नग्न छायाचित्रे पाठवली.

हेही वाचा : “काही लोकांना जमिनीवर आणायचं असेल तर…” जामीन मिळताच आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

यानंतर विक्रम राठोड या नावाच्या इसमाने दूरध्वनीवरून संपर्क साधून आपण दिल्ली क्राईम ब्रँचमधून बोलत असून सदरची छायाचित्रे समाज माध्यमावर प्रसारित केली जाणार असून हे थांबविण्यासाठी पैशांची मागणी करण्यात आली. काही दिवसांनी संबंधित महिलेेने आत्महत्या केली असल्याचे सांगून प्रकरण मिटविण्यासाठी बँक खात्यामार्फत पैसे मागवून घेण्यात आले. ३ ते २१ सप्टेंबर या कालावधीत १४ लाख ४० हजार रूपये संबंधित खात्यामध्ये वर्ग करण्यात आले आहेत. या दोघांनी आपली फसवणूक केल्याची तक्रार निवृत्त कर्मचार्‍याने इस्लामपूर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

Source link

Leave a Reply