समुद्रात पोहण्यासाठी उतरलेल्या तरुणाचा बुडून मृत्यूरत्नागिरी : पुण्याहून रत्नागिरीत पर्यटनासाठी आलेल्या चार मित्रांपैकी एका तरुणाचा गावखडी येथील समुद्रात बुडून मृत्यू ओढवला आहे . पोलिसांकडून या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार प्रशांत काळे, आकाश सुतार, राजकुमार पिटले आणि कृष्णा येडीलवाड (सर्वजण रा. पुणे) हे चौघे मित्र रविवारी रत्नागिरीत पर्यटनासाठी आले होते. रत्नागिरी तालुक्यातील गावखडी येथे रस्त्याच्या बाजूला असलेले सुरूचे बन, शांत किनारा पाहिल्यावर ते सकाळी साडेअकरा वाजता किनाऱ्यावर फिरायला गेले. तेथे मोबाइल फोनवर एकत्र छायाचित्रे घेतल्यानंतर त्यांच्यापैकी आकाश सुतार दुपारी दोनच्या सुमारास समुद्रात पोहण्यासाठी उतरला. त्याच्याबरोबर असलेले तिघेजण पोहता येत नसल्यामुळे किनाऱ्यावर बसून होते. यावेळी समुद्राला भरती आली होती. तसेच काही प्रमाणात वारे वाहत असल्यामुळे पाण्याला करंटही होता.

हळूहळू लाटांचा वेग वाढू लागला, पण आकाशला पाण्याचा अंदाज आला नाही आणि बघता बघता तो लाटांच्या तडाख्याने खोल समुद्रात ओढला गेला. आकाश बुडत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याचा मित्र राजकुमार पिटले याने समुद्राच्या पाण्यात उतरण्याचा प्रयत्न केला; परंतु समुद्राच्या लाटांमध्ये आकाश दिसेनासा झाला होता. किनाऱ्यावरील त्याच्या मित्रांनी तातडीने पूर्णगड सागरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. तेथून पोलीस अंमलदार आणि ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत आकाश बेपत्ता झाल्याचे निदर्शनास आले. बुडालेल्या आकाशचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता, पण तो सापडला नाही. मात्र सोमवारी सकाळी सव्वानऊच्या सुमारास किनाऱ्यावर वाळूत रुतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. शवविच्छेदनानंतर तो त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

Source link

Leave a Reply