धार्मिक रंग देऊन समाजात तेढ निर्माण करू नये! ; हत्या झालेले उमेश कोल्हे यांच्या कुटुंबीयांची अपेक्षा; सामाजिक सलोख्याचा आग्रह



अमरावती : येथील व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या हत्येनंतर कोल्हे कुटुंबीय पुरते हादरून गेले आहेत. परंतु, या दु:खातही त्यांनी सामाजिक सलोख्यावर भर दिला आहे. कोल्हेंच्या मृत्यूला धार्मिक रंग देऊन समाजात तेढ निर्माण करू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

सख्ख्या भावाकडून भावाची हत्या केली जाते, म्हणून इतरत्र भावा-भावाचे संबंध बिघडत नसतात. अशाच प्रकारे या घटनेत देखील इतर धर्माच्या व्यक्तींनी आमच्या भावाला मारल्यामुळे त्या धर्मातील इतर सर्वच वाईट आहेत, असा त्याचा अर्थ होत नाही. या प्रकरणामुळे धार्मिक तेढ निर्माण होऊ नये, अशा शब्दात कोल्हे कुटुंबीयांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

५४ वर्षीय उमेश हे मनमिळावू, कुटुंबवत्सल होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून तसेच दोन बंधू आणि मोठा परिवार आहे. चार चुलत भाऊ, तीन बहिणी हेही अमरावतीतच राहणारे. कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र आले की, त्यांची संख्या पन्नासपर्यंत पोहचते. लग्न समारंभ, रंगपंचमी यासारख्या सणांच्या काळात उमेश यांचा उत्साह शिगेला पोहचत होता. वर्षभरापूर्वी त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर उमेश हेच कुटुंबाचे प्रमुख होते. पण, २१ जूननंतर कोल्हे कुटुंबीयांसाठी सारे काही अकल्पित घडले. पण, आता या प्रकरणाला धार्मिक रंग देऊन दोन समाजात तेढ निर्माण करणे योग्य नाही, असे कोल्हे कुटुंबीय सांगतात.

कोण आहे युसूफ खान?

या हत्या प्रकरणातील पशुवैद्यक असलेला ४४ वर्षीय युसूफ खान हा सातपैकी एक आरोपी. उमेश कोल्हे आणि युसूफ हे ‘ब्लॅक फ्रीडम’ नावाच्या व्हॉट्सअ‍ॅप समूहाचे सदस्य. दोघेही सोळा वर्षांपासूनचे व्यावयायिक मित्र. पण, कोल्हेंनी या समूहावर नुपूर शर्माचे समर्थन करणारी प्रतिक्रिया प्रसारित केल्याने दुखावलेल्या युसूफने ती इतर समूहांमध्ये पाठवून आरोपींना भडकवले, असा आरोप आहे.

कोल्हे यांचे अमित मेडिकल हे प्राण्यांच्या औषधींचे दुकान आहे. पशुवैद्यक युसूफची २००५ मध्ये कोल्हेंशी ओळख झाली. युसूफच्या संपर्कात असलेले अनेक पशुवैद्यक हे कोल्हे यांचे ग्राहक बनले. दोघांमध्ये मैत्री झाली. काही कामानिमित्त युसूफने कोल्हेंकडून दीड लाख रुपये उधार घेतले होते. पण, यातील एक लाख रुपयो युसूफने पत्नीसोबत कोल्हे यांच्या घरी जाऊन परत केल्याची माहिती युसूफच्या संबंधितांनी दिली. युसूफने अमरावतीच्याच ‘रुरल इन्स्टिटय़ूट’मधून पशुवैद्यकीय पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. २००५ पासून त्याने व्यवसाय सुरू केला. प्राण्यांचा तज्ज्ञ डॉक्टर म्हणून स्वत:ची ओळख निा केली. त्याच्या कुटुंबात तो एकमेव उच्चशिक्षित. वडिलांच्या निधनानंतर आई आणि चार अविवाहित बहिणींची जबाबदारी त्याच्यावर आली. त्याला दोन जुळी मुले आहेत. आरोपींमध्ये त्याचे नाव पाहून शेजाऱ्यांनाही मोठा धक्का बसला आहे.

आरोपी राणांचा कार्यकर्ता?

कोल्हे हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार शेख इरफान याने खासदार नवनीत राणा यांचा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत प्रचार केल्याची बाब चर्चेत आहे. शेख इरफानचा युवा स्वाभिमान पक्षाशी कोणताही संबंध नाही. विरोधकांनी आकसातून खोटे आरोप सुरू केले आहेत, असे रवी राणा यांचे म्हणणे आहे. उमेश कोल्हे यांची हत्या झाल्यानंतर यशोमती ठाकूर यांनी त्याविषयी अवाक्षरही काढलेले नाही. हे प्रकरण कोणाच्या दबावाखाली दडपले जात होते, हे समोर यायला हवे, असे नवनीत राणा यांचे म्हणणे आहे. शेख इरफान याच्या समाजमाध्यमावरील ‘पेज’वर नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यासोबतची छायाचित्रे समोर आल्याने वाद उफाळून आला आहे. खासदार नवनीत राणा या गेल्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार होत्या. त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला होता. यावेळी अल्पसंख्याक समुदायातील अनेक कार्यकर्ते त्यांच्यासोबत जुळले होते. या कार्यकर्त्यांनी रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षातर्फे प्रचारही केला होता. अमरावतीच्या कमेला ग्राउंड परिसरात राहणारा शेख इरफान हा ‘रहबर हेल्पलाईन’ ही स्वयंसेवी संस्था चालवतो. इरफान याने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी राणा यांचा प्रचार केला होता, असा आरोप केला जात आहे.

अमरावती कट्टरतावाद्यांची प्रयोगशाळा होतेय – मिश्रा

गेल्या वर्षभरातील घटना पाहता अमरावती शहर हे धार्मिक कट्टरवाद्यांची प्रयोगशाळा बनत चालल्याचे दिसून येत आहे, असा आरोप भाजप नेते कपिल मिश्रा यांनी पत्रकारांशी बोलताना केला. त्यांनी आज मृत उमेश कोल्हे यांच्या कुटुंबीयांची अमरावतीत भेट घेतली आणि त्यांना ३० लाख रुपयांची मदत दिली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मिश्रा म्हणाले, पोलिसांनी तथ्य लपवण्याचा बरेच दिवस प्रयत्न केला. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर या प्रकरणातील सत्य उजेडात आले. पोलिसांनी दहशतवाद पसरवणाऱ्यांच्या मुसक्या वेळीच आवळल्या असत्या, तर कोल्हे यांची हत्या टळू शकली असती. देशातील एक समूह हा अल्पसंख्याक असुरक्षित असल्याची ओरड करून एक विशिष्ट कार्यक्रम राबवत आहे. त्यात अनेक मोठे नेते, पत्रकार, वकिलांचा समावेश आहे. हे सर्व लोक देशभरात होत असलेल्या हत्यांसाठी जबाबदार आहेत. दहशतवाद्यांची भरती देशात सुरू व्हावी, यासाठी मार्ग तयार करण्याचे काम हा समूह करीत आहे. मारेकरी हे कठपुतलीसारखे आहेत. त्यांच्या पाठीमागे हा समूह आहे, असा आरोप मिश्रा यांनी केला. राज्यातरझा अकादमी किंवा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया, जमियत-ए-उलेमा यासारख्या संघटनांची भूमिका संशयास्पद आहे. पीएफआय हे सीमीचेच अपत्य आहे. तिच्यावर बंदी घातली पाहिजे, असेही मिश्रा म्हणाले.

Source link

Leave a Reply