रत्नागिरी जिल्ह्यात मत्स्योत्पादनामध्ये लक्षणीय वाढ



रत्नागिरी : करोना कालावधीत मासेमारीवरही आलेले निर्बंध आणि माशांचे स्थलांतर होण्याच्या प्रक्रियेचा परिणाम म्हणून मागील आर्थिक वर्षांत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मत्स्योत्पादनाने लक्षणीय वाढ नोंदवली आहे.

राज्याच्या सांख्यिकी विभागाकडून या संदर्भात उपलब्ध आकडेवारीनुसार २०२१-२२ या आर्थिक वर्षांत १ लाख १ हजार २२८ टन उत्पादन मिळाले आहे. आधीच्या वर्षांच्या तुलनेत यामध्ये ३५ हजार ८५४ टनांची वाढ आहे.

राज्याला लाभलेल्या समुद्र किनारी भागातील ५ जिल्ह्यांमध्ये अव्वल मत्स्योत्पादन मुंबई जिल्ह्यात २ लाख टनाहून अधिक आहे. दुसरा क्रमांक रत्नागिरी जिल्ह्याचा लागतो. त्यानंतर ठाणे, रायगड, सिंधुदुर्गचा क्रमांक आहे. सर्वच जिल्ह्यातील मत्स्योत्पादनात मोठी वाढ झाल्याचे आकडेवारीवरून दिसते आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षांत रत्नागिरी जिल्ह्याचे मत्स्योत्पादन ६५ हजार ३७४ टन इतके होते. वर्षभरात त्यात मोठी वाढ झालेली आहे. २०१३-१४ साली जिल्ह्यातील मत्स्योत्पादन १ लाख ६ हजार ८५२ टन होते. त्यानंतर दरवर्षी उत्पादनात घट होत गेली होती. सात वर्षांनंतर पुन्हा एक लाखापेक्षा अधिक उत्पादन मिळालेले आहे. जिल्ह्यात मासळी उतरवणारी २७ बंदरे असून त्यापैकी ५ मोठी आहेत. या बंदरांमध्ये दरवर्षी उतरवण्यात येणाऱ्या मासळीच्या आकडेवारीवरुन मत्स्योत्पादन काढले जाते. २०१७-१८ मध्ये सागरी मत्स्योत्पादन १८.३८ टक्के, २०१८-१९ मध्ये ८.२२ टक्के, तर २०१९-२० मध्ये १०.२६ टक्के घटले होते. २०२०-२१ मध्येही मत्स्योत्पादनात १.२१ टक्के घट होती. मात्र या चार वर्षांच्या तुलनेत २०२१-२२ मध्ये मत्स्योत्पादनात मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे.

पर्सीननेट मासेमारीवर बंदी घातल्यानंतरही पुढे तीन वर्षांच्या काळात मासेमारीत घट होत राहिली; मात्र त्यानंतर प्रथमच झालेली वाढ ही अभ्यासाचा विषय ठरला आहे. पूर्वी अनेक मोठे मच्छीमार जिल्ह्याच्या सागरी जलधी क्षेत्रात राहून मासेमारी करत असत. मात्र आधुनिक तंत्र किंवा मोठय़ा नौकांच्या उभारणीमुळे १२ नॉटिकल मैलाच्या बाहेर जाऊनही मासेमारी करणार्याची संख्या वाढली आहे. करोनाकाळातील निर्बंधांमुळे सलग दोन वर्षे अपेक्षित मासेमारी झाली नाही. त्याचा फायदा प्रजननासाठी झाला आणि त्यामधून जिल्ह्याच्या जलधी क्षेत्रातील मत्स्य साठे वाढले असावेत, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर समुद्राचे प्रवाह बदलत असल्यामुळे माशांचे स्थलांतर होत राहते. त्यामुळे अनेक माशांची संख्याही कमी-अधिक होत असते.

प्रजनन कालावधीत मासेमारी बंदीचे योग्य पद्धतीने पालन केले जाते. तसेच स्थलांतरित होणारी मासळी महाराष्ट्राच्या जलधी क्षेत्रात आल्यामुळे मत्स्योत्पादनात मोठी वाढ झालेली आहे.

एन. व्ही. भादुले, मत्स्यव्यावसाय विभागाचे साहाय्यक आयुक्त

मागील सहा वर्षांची मत्स्योत्पादन आकडेवारी:

वर्ष उत्पादन (मेट्रिक टन)

२०२१-२२ १ लाख १ हजार २२८

२०२०-२१ ६५ हजार ३७४

२०१९-२० ६६ हजार १७३

२०१८-१९ ७३ हजार ७३२

२०१७-१८ ८० हजार ३४०

२०१६-१७ ९८ हजार ४४३

Source link

Leave a Reply