Headlines

राष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर रुग्णालयातील आधुनिक सुविधांसाठी शासनाकडे प्रस्ताव – पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार – महासंवाद

[ad_1]

  •         वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांसोबत मुंबईत बैठक
  •         दर्जेदार सुविधा उपलब्ध करुन देण्याला प्राधान्य

नागपूर, दि,24: राष्ट्रसंत तुकडोजी प्रादेशिक कर्करोग रुग्णालयाच्या अद्ययावत यंत्रसामुग्रीसाठी आणि इमारत बांधकामासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत असून, त्यासंदर्भांत वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्यासोबत मुंबई येथे बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी आज येथे दिली.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रादेशिक कर्करोग रुग्णालयाच्या संचालक मंडळाची बैठक विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा,  संचालक मंडळाचे उपाध्यक्ष अशोक क्रिपलानी, सचिव अनिल मालवीय, सहसचिव अरविंद धवड, सदस्य सुरेश शर्मा, रामकृष्ण छांगानी, अतिरिक्त संचालक कृष्णा त्रिमनवार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये, डॉ. दिवाण, महसूल उपायुक्त मिलिंद साळवे आदी बैठकीला उपस्थित होते.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रादेशिक कर्करोग रुग्णालय यांच्यात सामंजस्य करार करुन कर्करुग्णांसाठीच्या वैद्यकीय सुविधांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव शासनाला सादर करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. उपचारासाठी आलेल्या रुग्णाने आर्थिक अडचणीमुळे अर्धवट उपचार घेत परत जावू नये, यासाठी रुग्णालय त्यांच्या निधीतून उपचार करते. रुग्ण बरा करणे हा रुग्णालयाचा मुख्य उद्देश असून, यासाठी या रुग्णालयात अद्ययावत यंत्रसामुग्री आणि अध्यापक वर्ग आवश्यक आहे. शिक्षण आणि उपचार सुविधा उपलब्ध व्हाव्यात. यंत्रसामुग्री अद्ययावत असावी, यावर भर देण्यात येत आहे. त्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथून अध्यापक वृंद घेण्यात येत असून, रुग्णांवर उपचारासाठी येणारा खर्च रुग्णालयाकडून भागविला जाणार असल्याचे श्री. केदार यांनी सांगितले.

            यापूर्वी रुग्णालयातील उपचारासाठी आवश्यक असणारी यंत्रसामुग्री, त्या-त्या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर तसेच इमारतीच्या अद्ययावतीकरणासाठी आतापर्यंत आवश्यक निधी मिळवून दिला आहे. रुग्णालयाची इमारत पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असून, ती लवकरात लवकर पूर्ण झाली पाहिजे. त्यासाठी  प्रत्यक्ष क्षेत्रावर जावून पाहणी करावी, आणि तसा तत्काळ अहवाल सादर करण्याचे श्री. केदार यांनी यंत्रणेला आदेश दिले. रुग्णालयाच्या अद्ययावतीकरणासाठी आवश्यकता पडल्यास मुंबई येथील टाटा कर्करोग रुग्णालयाचे डॉ. शर्मा यांचीही मदत घेण्यात येईल, असेही श्री. केदार यावेळी म्हणाले.

*****

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *