रब्बी पीक कर्जाचे वाटप 15 मार्चपर्यंत करा जिल्हाधिकारी शंभरकर यांचे निर्देश

सोलापूर, दि. 25 (जिमाका): जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पीक कर्जाचे वाटप बँकांनी 15मार्च 2022पर्यंत त्वरित करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिले.
           

नियोजन भवन येथे बँक प्रतिनिधीच्या ऑनलाईन बैठकीत श्री. शंभरकर बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रशांत नाशिककर, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक नितीन शेळके यांच्यासह बँक प्रतिनिधी उपस्थित होते.
           

श्री. शंभरकर म्हणाले, शेतकऱ्यांना त्वरित पीक कर्ज उपलब्ध करून द्या. खरिपाच्या पीक कर्ज वाटपाप्रमाणे रब्बीचे वाटप करा. प्रत्येक बँकेच्या क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी आपल्या शाखा प्रमुखांना कळवून आढावा घ्यावा. कोणत्याही बँकांनी प्रलंबित प्रकरणे ठेवू नका. उद्दिष्टाप्रमाणे प्रत्येक बँकांच्या कामात सुधारणा व्हाव्यात. बँक अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जनतेपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. कागदपत्रे अपुरी असतील तर विविध शिबीराच्या माध्यमातून यावर तोडगा काढण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.


            श्री. नाशिककर यांनी सर्व बँकांच्या कर्ज प्रकरणाच्या स्थितीची माहिती दिली. रब्बी हंगामात 2327 कोटी 72 लाखांचे बँकांना उद्दिष्ठ देण्यात आले होते. यापैकी 1075 कोटी 63 लाख रूपयांचे वाटप झाले आहे. ॲक्सीस बँक, फेडरल बँक, विदर्भ-कोकण ग्रामीण बँक आणि इंडसइन्ड बँक यांनी आपले उद्दिष्ट बऱ्यापैकी पूर्ण केल्याची माहितीही त्यांनी दिली.

Leave a Reply