Pune Mumbai Expressway completed by December 2023 Inspection of work by Chief Minister Eknath Shinde ysh 95मुंबई: मुंबई तसेच एकूणच महाराष्ट्रात पायाभूत सुविधांची कामे मोठय़ा प्रमाणावर सुरू असून राज्याला देशातले प्रथम क्रमांकाचे राज्य बनविण्यासाठी आम्ही ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार सध्या सुरू असलेले पायाभूत सुविधा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित केल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी दिली. राज्यातील सरकार बदलले असून आता मुंबईही बदणार असल्याची ग्वाहीही त्यांनी या वेळी दिली.

गोरेगाव येथील एसटेक प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी शिंदे बोलत होते. महानगर आयुक्त एसव्हीआर श्रीनिवासन, तसेच बांधकाम क्षेत्रातील मनीष गांधी, एसीटेक प्रदर्शनाचे संचालक सुमित गांधी, निरंजन हिरानंदानी, हफिज कॉन्ट्रॅक्टर, विकास ओबेरॉय, संदीप रुणवाल, आशीष रहेजा, हॅन्सग्रॉव्ह कंपनीचे ख्रिस्तोफी गोरलॅन, पाओलो रोमानी आदी या वेळी उपस्थित होते.

राज्यात सध्या मोठय़ा प्रमाणात पायाभूत सुविधा प्रकल्पांची कामे सुरू असून हे सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. केवळ तीन महिन्यांत सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. राज्याला भारतातील सर्वात विकसित राज्य म्हणून बघायचे आहे. त्यासाठी तुमची साथ हवी, असे आवाहनही त्यांनी या वेळी विकासकांना केले. राज्यातील सरकार बदलले आहे, आता मुंबईचे रूपही बदलणार असल्याचे सांगताना शिंदे यांनी पुढील दोन-अडीच वर्षांत मुंबईतील रस्ते पूर्णपणे काँक्रीटचे करण्यात येतील. रस्ते पूर्णपणे खड्डेमुक्त असतील आणि रस्त्यांमध्ये पाणी तुंबणार नाही, असे सांगितले.

तसेच आयकॉनिक इमारती उभारण्यात आल्या पाहिजेत, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी मुंबईचा इतिहास आणि वैभवदेखील जपण्यात येईल, असे सांगितले. मुंबई पारबंदर प्रकल्पाचे कामदेखील ८४ टक्के पूर्ण झाले असून नरिमन पॉइंटहून वीस मिनिटांत रायगड जिल्ह्यात पोहोचू शकणार आहोत. रायगड जिल्ह्यातही ग्रोथ सेंटर बांधण्यात येणार आहे. लॉजिस्टिक पार्क, टाऊनशिप आणि रोजगारनिर्मिती या महत्त्वाच्या मुद्दय़ांवर लक्ष केंद्रित केले जात असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. तसेच एमएमआरडीएचे एक लाख कोटींपेक्षा जास्त प्रकल्प सुरू असून दरवर्षी २५ हजार कोटींची कामे होतील, अशी योजना तयार करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

द्रुतगती मार्गावरील नवी मार्गिका डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण

लोणावळा : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील नवी मार्गिका-बोगद्याच्या (मिसिंग लिंक) कामाची गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आविष्कार असलेला हा प्रकल्प डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. या प्रकल्पामुळे पुणे ते मुंबई हा द्रुतगती मार्गावरील प्रवास सुमारे अर्ध्या तासांनी कमी होऊ शकणार असल्याचेही त्यांनी सांगितले. लोणावळा धरणाच्या खाली साधारण: ५०० ते ६०० फूट अंतरावरून हा बोगदा काढण्यात आला आहे. याच भागात मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रकल्पाची माहिती दिली. मुख्यमंत्री म्हणाले, बोगद्यांमध्ये सुरक्षेची सर्व खबरदारी घेण्यात आली असून, संपूर्ण बोगद्याला सुरक्षिततेच्या दृष्टीने सिमेंटचा थर बसिवण्यात आला आहे.Source link

Leave a Reply