Headlines

पुढील काळ डाव्या आंबेडकरी एकजुटीचा – भाई धनंजय पाटील

बार्शी -प्रतिनिधी – पुढील काळ हा डाव्या व आंबेडकरी एकजूटीचा आहे, असे प्रतिपादन भाई धनंजय पाटील यांनी व्यक्त केले. ते शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे स्मृतिदिन तसेच दलित पँथरचे सुवर्णमहोत्सवी वर्ष व शिवजयंतीच्या निमित्ताने आयटक कामगार केंद्र, बार्शी येथे 20 फेब्रुवारी 2022 रोजी दलित पँथर विचारधारा व आजची परिस्थिती या चर्चासत्रात अध्यक्षीय समारंभात ते बोलत होते.

पाटील पुढे म्हणाले, नामांतराच्या चळवळीत कष्टकरी व आंबेडकरी चळवळीची फाटाफूट करण्याचा डाव शोषणकारी व्यवस्थेने आखला होता, शिवसेना त्याचीच निर्मिती होती, धर्मांध जातीयवादी वर्चस्ववादी प्रवृत्तीला प्रत्युत्तर म्हणजे दलित पॅंथर ठरली.

कॉम्रेड शौकत शेख म्हणाले कॉ. गोविंद पानसरे यांचे मार्क्सवादी विचार कष्टकरी वर्गाला अत्यंत प्रेरणादायी आहेत पानसरे यांना पाहता आले अनुभवता आले.

चर्चासत्रातील पुढील वक्ते, पुआहो सोलापूर विद्यापीठाचे प्रा. डॉ. दत्ता घोलप म्हणाले, फ्रान्स, रशिया येथील तरुणांच्या चळवळी, चिन मधील सांस्कृतिक क्रांती व अमेरिकेतील ब्लॅक पँथर च्या लढ्याच्या पार्श्वभूमीवर दलित पँथर उभा राहिली, विद्रोही कवी, साहित्यिक यांनी तत्त्वज्ञानाच्या आधारावर स्पष्ट संघर्ष केला, मार्क्सवादी आंबेडकरी विचारांना एकत्र आणण्याचे महत्त्वाचे ऐतिहासिक काम दलित पँथरने केले.

परंडा येथील इंग्रजी विषयाचे प्रा. शंकर अंकुश म्हणाले, जशास तसे उत्तर देण्याची रीत अमेरिकेतील ब्लॅक पँथरने सशस्त्र पद्धतीने स्वीकारली दलित पँथरने जशास तसे उत्तर दिल्याने ती श्रमिक दलित वर्गाला प्रेरणा देत राहील.

कम्युनिस्ट पक्ष राज्य कार्यकारिणी सदस्य कॉम्रेड प्रा. तानाजी ठोंबरे म्हणाले विद्रोही लढाऊ सर्व जातीमधील तरुणांचे पँथर मध्ये होते. लाठ्या-काठ्या व शहीदत्त्व पत्करून लढ्याच्या मार्गाने ती पुढे जात राहिली. वर्चस्ववादी धर्मांध शक्तींचा तीव्र विरोध आंबेडकरवादी विचारांचा स्पष्ट स्वीकार, पोटासाठी शरीरविक्रय करणाऱ्या पासून श्रमिक, दलित तरुण यांना एकत्र केल्याने पँथर संपवण्याचा डाव प्रस्तापितांकडून आखला गेला, परंतू आंबेडकरवाद व मार्क्सवाद ही जैविक एकजुटीचा विचार पँथरने केला तसाच तो आजच्या घडीला धर्मांध जातीयवादी शक्तींना हाणून पाडण्यासाठी अत्यावश्यक व मार्गदर्शक ठरेल.

यावेळी सभेचे प्रास्ताविक कॉ. अनिरुद्ध नखाते यांनी केले तर सूत्रसंचालन कॉ. डॉ. प्रविण मस्तुद यांनी केले तर आभार कॉ. बालाजी शितोळे यांनी मानले. यावेळी कॉम्रेड लक्ष्मण घाडगे, शौकत शेख, ए बी कुलकर्णी, लहू आगलावे, भारत भोसले, पवन आहिरे, सुयश शितोळे, शुभम शिंदे, आनंद गुरव, आनंद धोत्रे, भारत पवार, सुरेखा शितोळे तसेच पुरोगामी संस्था-संघटनांचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *