वंचित विद्यार्थ्यांसाठी स्नेहग्राम येथे परिवर्तनाच्या वाटा समूहाने उभारले ग्रंथालय

बार्शी – दि.14 नोव्हेंबर (प्रतिनिधी) बालदिनाचे औचित्य साधत बार्शी तालुक्यातील कोरफळे येथील स्नेहग्राम (Snehagram)या ठिकाणी वंचित विद्यार्थ्यांसाठी परिवर्तनाच्या वाटा समुहाच्या वतीने दोन लक्ष रुपयांचे ग्रंथालय उभारण्यात आले आहे.या ग्रंथालयाचे उद्घाटन राज्याचे पूर्व शिक्षण संचालक डॉ. गोविंद नांदेडे यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमासाठी परभणीचे शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, करमाळ्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, शिक्षण विस्तार अधिकारी प्रवीण काळम पाटील, गोदावरीताई राठोड, सावित्रीबाई फुले यांचे वंशज दिलीप नेवसे, स्नेहग्राम चे संचालक महेश निंबाळकर व विनया निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.(Barshi , Korfale)

वरील सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रथम ग्रंथालयाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व बाल दिनानिमित्त पंडित नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.तसेच यावेळी राकेश पवार यांनी सुंदर रीतीने तयार केलेल्या परिवर्तनाच्या वाटा समुहाच्या लोगोचे अनावरण करण्यात आले.

यावेळी सावित्रीबाई फुले (Savitribai Phule)यांचे वंशज दिलीप नेवसे यांना सामाजिक व शैक्षणिक कार्याबद्दल “जीवन गौरव”या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.स्नेहग्राम येथील वंचित विद्यार्थ्यांसाठी त्यांनी यावेळी रोख स्वरूपात 20 हजार रुपयांची मदत केली व आपले दातृत्व सिद्ध केले.

मागील बारा वर्षापासून शाळाबाह्य, अनाथ, वंचित विद्यार्थ्यांसाठी काम करणारे महेश निंबाळकर (Mahesh nimbalkar)व विनया निंबाळकर यांचा यावेळी विचार मंचावर उपस्थित डॉ. गोविंद नांदेडे साहेब यांच्या हस्ते विशेष गौरव पत्र देऊन सपत्नीक गौरव करण्यात आला.

यावेळी बोलताना डॉ.गोविंद नांदेडे म्हणाले की,महेश आणि विनया यांनी तयार केलेले स्नेहग्राम हे वंचित,उपेक्षित व पालावरच्या विद्यार्थ्यांसाठी आधुनिक काळातील शैक्षणिक तीर्थक्षेत्रच म्हणावे लागेल. स्नेहग्राम येथील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे म्हणजे सीमेवर लढणाऱ्या सैनिकाप्रमाणे सर्वोच्च पातळीवरची देशसेवाच आहे. आजही समाजातील वंचित घटकाला दर्जेदार शिक्षण मिळत नाही ही देशाची शोकांतिकाच म्हणावी लागेल. देशाचे भवितव्य प्रत्येक वर्गातून घडते. त्यामुळे प्रत्येक शिक्षकाने महेश निंबाळकर व विनया निंबाळकर प्रमाणे समर्पित वृत्तीने कार्य करण्याची गरज आहे. शिक्षकच देशाला सर्वोच्च शिखरावर विराजमान करू शकतो ही भावना त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.तसेच स्नेहग्राम येथील 40 विद्यार्थ्यांना वर्षातील पाच दिवस संपूर्ण जेवण देण्याचा संकल्पही त्यांनी यावेळी केला.

तसेच विठ्ठलदादा भुसारे आपल्या प्रेरणादायी व वास्तववादी भाषणात म्हणाले की,कोणत्याही परिणामाची चिंता न करता महेश व विनया यांनी स्विकारलेले हे कार्य निश्चितच सलाम करण्यापलीकडे आहे. नोकरी सोडून कोणताही पगार न घेता समर्पित वृत्तीने असे कार्य करणे आजच्या जगात दुर्मिळ आहे. आजच्या भोगवादी जगात महेश व विनया यांनी त्यागवादी जीवन स्विकारून स्नेहग्राम साकारले आहे.महेश तुझ्यासारख्या शिक्षकांची आज महाराष्ट्राला गरज आहे. पगार न घेता लेकरांसाठी आयुष्य समर्पित करणारा महेश हा महाराष्ट्रातील नायक आहे.यावेळी विठ्ठल दादा भुसारे यांनी वामनदादा कर्डक यांची ‘तुफानातील दिवे’ ही कविता सादर केली.व अवघे स्नेहग्राम मंत्रमुग्ध झाले.

पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यावेळी आपल्या मनोगतात म्हणाले की, स्नेहग्राम येथे कोणतीही अडचण निर्माण झाल्यास मी सर्वतोपरी सहकार्य करेल. या ठिकाणचे कार्य उदात्त विचाराने प्रेरित व समाजाला दिशादर्शक आहे.

जीवनगौरव पुरस्काराला उत्तर देताना दिलीपजी नेवसे यांनीही स्नेहग्रामचे खूप कौतुक केले व परिवर्तनाच्या वाटा समूहाच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार बहाल करण्यात आल्याबद्दल समूहाचे आभार मानले.

स्नेहग्रामचे संचालक महेश निंबाळकर यांनीही या वेळी प्रेरणादायी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, स्नेहग्रामचा जन्म पालावरच्या शाळेतून झाला. शाळाबाह्य मुले पाहून मन अस्वस्थ होत होते. या मुलांसाठी आपण काहीतरी केले पाहिजे ही भावना स्वस्थ बसू देत नव्हती. जिल्हा परिषद शाळेची नोकरी सांभाळून अशा मुलांचा सांभाळ करणे शक्य नव्हते. म्हणूनच आम्ही पूर्ण आयुष्य स्नेहग्राम साठी समर्पित करण्याचा निर्णय घेतला. पत्नी विनया हिच्या सोबतीने आज आम्ही चाळीस वंचित मुलांना या ठिकाणी दर्जेदार शिक्षण देत आहोत. हे काम करत असताना रोज अनेक नवनवीन संकटे येत आहेत. परंतु खूप हिमतीने आम्ही स्नेहग्राम चालवत आहोत. येथील शाळाबाह्य मुले मोठ्या पदावर जातील तेव्हाच स्नेहग्रामचा विजय होईल.

शिक्षण विस्तार अधिकारी गोदावरीताई राठोड यांनीही मोजक्या शब्दात प्रभावी मनोगत व्यक्त केले. जीवन गौरव पुरस्कार मानपत्र वाचन विद्या मुरूमकर व साक्षी सराफ या चिमुकल्यांनी केले. यावेळी विचार मंचावर शिक्षण विस्तार अधिकारी प्रवीण काळम पाटील, निमंत्रीत सदस्य शिक्षण समिती औरंगाबाद प्रभाकर पवार, राऊत के.डी सर, डॉ.राम वाघमारे, रमेश चव्हाण,राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त संदीप पवार, विक्रम अडसूळ, नारायण मंगलारम, उमेश खोसे यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक भरत काळे यांनी केले.बहारदार सूत्रसंचालन प्रवीण लोहाडे यांनी तर आभार प्रदर्शन विनोद राठोड यांनी केले. यावेळी राज्यभरातून आलेल्या सर्व परिवर्तनाचा वाटा समुह सदस्यांचा विशेष स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जगदीश कुडे, लहू बोराटे, मनोहर इनामदार, सोज्वल जैन,नितीन अंतरकर, गजेंद्र बोंबले, संजय खाडे, शंकर वरवडे, अमरसिंग चव्हाण, धर्मराज करपे,दत्तात्रय राऊतवाड, दिपाली सबसगी, महेश कुंभारे, सुभाष भानुसे, मंगेशकुमार अंबिलवादे, श्रीरंग अवचरमल, मीनाक्षी राऊत, स्वाती गवई, वैशाली साबदे, वर्षा देशमुख, विद्या गवई, भुजंग पवार, विनायक सुरसे, संदीप राठोड, आबासाहेब मदने, अर्जुन राऊत, डॉ.जालु काळे, डॉ.रामप्रसाद राऊत, राम तांगडे, मच्छिंद्र भराडे, शिवकुमार जैस्वाल, वंदना चव्हाण, प्रतिभाताई लोखंडे, सारिका जैन, सुनील मोरे, आशा भोसले, वर्षा कदम,यांच्यासह राज्यभरातून मोठ्या संख्येने परिवर्तनाच्या वाटा समूह सदस्यांची उपस्थिती होती.

Leave a Reply