आता तरी नव्या सरकारच्या मंत्रीमंडळात समावेश होणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर पंकजा मुंडे म्हणाल्या… | Pankaja Munde reaction on question about inclusion of her in new Shinde Fadnavis cabinet pbs 91



मागील अनेक दिवसांपासून भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या राजकीय पुनर्वसनाची चर्चा आहे. त्याबाबत आधी राज्यसभा निवडणुकीत, नंतर विधान परिषद निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा होती. मुंडे समर्थकांनीही याबाबत आक्रमक भूमिका घेतली. आता राज्यात नव्या सरकारच्या स्थापनेसह पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांचा मंत्रीमंडळात समावेश करण्याची मागणी मुंडे समर्थक करत आहेत. याबाबत पंकजा मुंडे यांनाच प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तरं देणं टाळलं. त्या औरंगाबादमध्ये माध्यमांशी बोलत होत्या.

“नवं सरकार स्थापन झालंय, मात्र अद्याप मंत्रीमंडळ विस्तार झालेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच फिरत आहेत. या सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार कधी होईल? काय अडचणी येत आहेत?” असे प्रश्न पत्रकारांनी विचारले. यावर पंकजा मुंडे म्हणाल्या, “या विषयावर मी काहीही बोलू शकणार नाही. या विषयावर निर्णय घेणारी यंत्रणा मोठी, सर्वोच्च आहे. ते बोलतील तेव्हा मंत्रीमंडळाचा विषय मार्गी लागेल.”

मुंडे समर्थक आता तरी पंकजा मुंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला पाहिजे अशी मागणी करत असल्याबाबत प्रश्न विचारला असता पंकजा मुंडे यांनी त्यावर बोलणं टाळलं. तसेच दुसऱ्या पत्रकाराला तुमचा प्रश्न काय असं विचारलं.

“अडीच वर्षात सरकारने कोणताही कागद हलवला नाही”

ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, “ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल असा मला पूर्ण विश्वास आहे. गेल्या अडीच वर्षात सरकारने कोणताही कागद हलवला नाही, कुठलंही काम केलं नाही. ओबीसीचं आरक्षण प्रलंबित होतं. आता ओबीसींच्या हिताचं सरकार आहे. त्यामुळे ओबीसींचं राजकीय आरक्षण मार्गी लागेल.”

“ओबीसींवर अन्याय होणार नाही अशा निर्णयाची अपेक्षा”

“तोपर्यंत सरकारने निवडणुका घेऊ नयेत, अशी विनंती मी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. त्यांनी या निवडणुका ओबीसी आरक्षणासहच होतील असा विश्वास दिला आहे. न्यायालयाने १९-२० जुलैला तारीख दिलीय. त्यात यावर स्पष्टता येईल. मात्र, ओबीसींवर अन्याय होणार नाही अशाप्रकारचा निर्णय यातून व्हावा अशी आमची अपेक्षा आहे,” असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.

हेही वाचा : पंकजा मुंडेंना उमेदवारी न दिल्याने समर्थकाचा आत्महत्येचा प्रयत्न

“मराठवाड्याच्या ज्या योजना आहेत त्या सर्व अकडलेल्या, अर्धवट राहिलेल्या योजना पूर्ण केल्या जातील. तसेच नव्या योजनाही मार्गी लागतील. याबाबत एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी मला विश्वास दिला आहे. ते जनहिताचे निर्णय घेतील,” असंही पंकजा मुंडे यांनी नमूद केलं.



Source link

Leave a Reply