पालघर जिल्हा प्रगतिशिल जिल्हा म्हणून ओळख निर्माण करणार – पालकमंत्री दादाजी भुसे – महासंवाद

[ad_1]

पालघर दि. 26 :- जिल्हा नियोजन समिती मार्फत जिल्ह्यात विविध ठिकाणी विकास कामे सुरू आहेत. भविष्यात पालघर जिल्हा हा प्रगतिशिल जिल्हा म्हणून ओळख निर्माण करणार असा विश्वास कृषी माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केले.

72 वा प्रजासत्ताक दिन सोहळा पोलीस परेड ग्राऊंडवर, पालकमंत्री दादाजी भूसे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी 72 व्या प्रजासत्ताक दिना निमित्त पालकमंत्री दादाजी भुसे यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या.

 

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा वैदेही वाढाण, खासदार राजेंद्र गावित, आमदार श्रीनिवास वनगा, नगराध्यक्षा डॉ. उज्वला काळे, जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, जिल्हा पोलिस अधिक्षक दत्तात्रेय शिंदे, निवासी जिल्हाधिकारी डॉ.किरण महाजन, सर्व विभागातील अधिकारी वर्ग, कर्मचारी, नागरिक व पत्रकार उपस्थित होते.

पालघर जिल्ह्याच्या मुख्यालयाचे काम सिडको मार्फत करण्यात येऊन जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद व पोलीस अधीक्षक कार्यालय सुरु करण्यात आले आहे. तसेच महिला रुग्णालया करीता 5 एकर, बिरसा मुंडा आदिवासी विकास भवन करीता 5 एकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन करीता 5 एकर, शासकीय बालगृहाकरीता 5 एकर जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. व मोखाडा येथे नविन एकलव्य निवासी शाळेकरीता आदिवासी विकास विभागास 10 एकर जागा देण्यात आली आहे. सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागा मार्फत राज्यात निराधार, तृतीयपंथी, अपंग, दुर्धर आजाराने रोगग्रस्त व्यक्ती व निराधार विधवा, घटस्फोटीत महिला, परितक्त्या, देवदासी यासारख्या दुर्बल घटकांसाठी अर्थसहाय्य देण्याच्या हेतूने राज्यपुरस्कृत तसेच दारिद्रय रेषेखालील वृध्द व्यक्तीकरीता केंद्रपुरस्कृत योजना राबविण्यात येतात. या योजनांची पालघर जिल्ह्यात 100% अंमलबजावणी करण्याकामी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मोहिमेमध्ये जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनीधी, पदाधिकारी, विविध विभागाचे अधिकारी, सेवाभावी संस्थेचे प्रतिनीधी यांच्या समन्वयातून संपूर्ण ग्रामीण भागामध्ये प्रथमच अशी मोहिम राबविण्यात येत आहे. सदर मोहिमेचे स्वरूप हे ग्रामस्तरापासून ते तालुकास्तरापर्यंत विविध शिबीरांच्या माध्यमातून प्रशासनाच्या योजना / लाभ तळागाळातील लोकांचे दारी जाऊन त्यांस मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये एकही पात्र लाभार्थी विशेष सहाय्य योजनांच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेणार असल्याचे पालकमंत्री दादाजी भूसे यांनी सांगितले.

कोविड विषाणूचा मुकाबला करण्यासाठी पालघर ग्रामीण जिल्हयात 7 PSA Plant (पी.एस.ए. प्लॅट) च्या माध्यमातून 5.67 मेट्रीक टन ऑक्सीजन निर्मीती करण्यात येत आहे. तसेच 6 LMO Plant (एल.एम.ओ.प्लँट ) कार्यान्वीत करून 60 मेट्रीक टन ऑक्सीजन साठवणेची क्षमता निर्माण करण्यात आली आहे. पालघर जिल्हा ऑक्सिीजन उपलब्धतेमध्ये स्वयंपूर्ण जिल्हा झालेला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्या मध्ये कोविड़ केअर सेंटर स्थापन करण्यात आले आहेत. मला सांगण्यास अत्यंत अभिमान वाटतो की, ड्रोनव्दारे लस वाहतूक करण्यास पालघर हा राज्यातील पहिला जिल्हा आहे. पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील व दूरच्या कार्यक्षेत्रामध्ये ड्रोनव्दारे लस पुरवठा करण्याचा नाविन्यपूर्ण प्रयोग करण्यात येत आहे. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे व ग्रामीण रुग्णालयांसाठी 86 रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या आहेत. कोविड 19 या आजारामुळे निधन पावलेल्या पालघर ग्रामीण भागातील 915 तर वसई – विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील 1850 असे एकूण 2765 व्यक्तींच्या निकट नातेवाईकास 13 कोटी 82 लाख इतके सानुग्रह सहाय्य अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे.

कोविड मुळे दोन्ही पालक गमावलेल्या जिल्ह्यातील 15 बालकांना प्रत्येकी 5 लक्ष रुपयाचे मुदतठेव प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले आहे. तसेच या बालकांना प्रधानमंत्री केअर फंडामधून प्रत्येकी 10 लक्ष रुपये देण्यात आले आहे. असे एकूण 2 कोटी 10. लाख रुपये या बालकांना भविष्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. तसेच कोविडमुळे एक पालक गमावलेल्या 375 बालकां मधून 109 बालकांना बालसंगोपन योजने अंतर्गत 1100 रुपये प्रति महिना देण्यात येत असल्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

देहविक्री व्यवसाय करणाऱ्या महिलांना मदत व त्यांच्या बालकांचे संगोपन करण्यासाठी जिल्ह्यातील 1222 महिला व 599 बालके यांना कोविड काळात 2 कोटी 21 लाखाचा निधी वितरीत करण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातील पर्यटन विषयक विकास करण्याकरीता जिल्ह्यातील सागरी किनाऱ्यांचा विकास करणे, मिनी महाबळेश्वर म्हणून प्रसिध्द असलेले जव्हार शहर व परिसरातील पर्यटन स्थळांचा व जिल्ह्यातील इतर पर्यटन स्थळांचा विकास करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. माध्यान्ह भोजन योजने अंतर्गत 1559 बांधकाम कामगार तर विक्रमगड व जव्हार तालुक्यातील 2465 मनरेगा कामगारांना माध्यान्ह भोजन देण्यात येत असल्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या अभीसरण (Convergence) योजने अंतर्गत पालघर जिल्ह्यातील शाळेच्या सरंक्षक भिंती बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मनरेगा निधीसह सर्व साधारण जिल्हा नियोजन मधून 48 शाळांसाठी 1 कोटी 24 लाख तर आदिवासी उपाय योजने मधून 103 शाळांसाठी 5 कोटी 34 लाख निधी उपलब्ध करून त्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. ई-श्रमकार्ड लाभार्थ्यांच्या सामाजिक सुरक्षेसाठी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत रु. 1 लाख पर्यंत अपघाती विमा व तात्पुरते अपंगत्व आल्यास विमा अपघाती मृत्यु झाल्यास व कायम अपंगत्व आल्यास रु. 2 लाख विमा कवच नोंदणी केल्यापासुन संपूर्ण एक वर्षासाठी मोफत लागू करण्यात आले आहे. पालघर जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत 2 लाखापेक्षा अधिक श्रमिकांची नोंदणी करण्यात आली आहे. प्रधानमंत्री मातृवंदना योजने अंतर्गत सुमारे 69 हजार लाभार्थ्यांच्या खात्यावर 31 कोटी 30 लक्ष रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत जिल्ह्यातील 1 लाख शेतकऱ्यांना 250 क्विंटल तूर बियाणे वाटप करण्यात आले. तसेच रब्बी हंगामासाठी 465 क्विंटल हरभरा बियाणांचा पुरवठा करण्यात आला आहे. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी याकरीता पिक पध्दतीत बदल करण्यावर भर देण्यात आला असून, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना फळबाग लागवड अंतर्गत 4048 लाभार्थ्यांनी 1953 हेक्टर क्षेत्रावर लागवड केली आहे. कृषि यांत्रिकीकरण होण्याच्या दृष्टीने ट्रॅक्टर, पावर टिलर व इतर अवजारे उपलब्ध करून देणे कामी 165 शेतकऱ्यांना 1 कोटी 28 लाख इतके अनुदान वाटप करण्यात आले असल्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन 2021-22 अंतर्गत जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय पालघर यांना 14 चारचाकी व 50 मोटर सायकल तसेच पोलीस आयुक्त कार्यालय मिरा-भाईंदर, वसई-विरार यांना 13 चारचाकी व 72 मोटर सायकल अश्या एकूण 27 चारचाकी व 122 मोटर सायकल उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. महास्वामित्व योजने अंतर्गत ड्रोनव्दारे गावठाण भूमापन करण्याची प्रक्रिया जिल्ह्यात सुरू असून, 377 गावांच्या गावठाण हद्दी निश्चित करण्यात आल्या आहेत. सदरचे काम पुर्ण होताच मिळकत धारकांना सनद वाटप करण्यात येणार आहेत. महाआवास अभियान टप्पा 2 मध्ये 851 घरकुलांचे प्रधानमंत्री आवास योजना व राज्य पुरस्कृत आवास योजने अंतर्गत काम पूर्ण झाले असून त्यापैकी 3 लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात आज प्रशस्तीपत्रक व घरकुलाची चावी हस्तांतर करण्यात येणार आहे. उर्वरीत सर्व 848 लाभार्थ्यांना देखील आज त्यांचे गावस्तरावर गृहप्रवेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज पालघर जिल्ह्यात जी विकासकामे सुरू आहेत, ती पाहता लवकरच आपला जिल्हा राज्यात प्रगतशील जिल्हा म्हणून ओळख निर्माण करेल यात शंका नाही. शासन आणि जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न तसेच जनसहभाग यामुळेच हे साध्य होणार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी मिळून एकत्रितपणे जिल्ह्याच्या विकासाला प्राधान्य देवू असे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

यावेळी उत्कृष्ठ काम करणाऱ्या शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार पालकमंत्री दादाजी भूसे यांनी केला. तसेच तृतीयपंथी यांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत अनुमती पत्र पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.

0000000

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *