Headlines

या महिन्यात पावसाचे रौद्ररुप? ; शेवटच्या टप्प्यात १०९ टक्के जलधारांचा अंदाज

[ad_1]

पुणे : मोसमी पावसाच्या शेवटच्या टप्प्यात सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रात बहुतांश भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे. संपूर्ण देशात या कालावधीत सरासरीच्या तुलनेत १०९ टक्के पाऊस होणार असल्याचे भारतीय हवामान शास्त्र विभागाने गुरुवारी (१ सप्टेंबर) जाहीर केले.

मुंबई, ठाण्यासह संपूर्ण कोकण विभाग, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा आणि पूर्व विदर्भात शेवटच्या टप्प्यामध्ये काही भागांत मुसळधारांची शक्यता आहे. देशाचा पूर्वोत्तर भाग आणि पश्चिम-उत्तर राज्यांमध्ये मात्र पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे.

सप्टेंबरच्या शेवटच्या टप्प्यामध्ये देशात बहुतांश भागात पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे. प्रशांत महासागरात ‘ला नीना’ स्थिती कायम आहे. अशा वातावरणात सरासरीच्या तुलनेत १०९ टक्के पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. सप्टेंबरमध्ये देशाच्या बहुतांश भागात दिवसाचे कमाल तापमान सरासरीच्या जवळ किंवा त्यापेक्षाही कमी राहण्याची शक्यता आहे. पावसाचे प्रमाण कमी राहणाऱ्या उत्तर-पश्चिम भागासह दक्षिण-पूर्व राज्यांमध्ये काही भागातच तापमानात वाढ दिसून येईल.

महाराष्ट्रात अनेक भागांत पाऊस सरासरीच्या पुढे राहणार आहे. या भागात संपूर्ण महिन्यात दिवसाचे कमाल तापमान सरासरीच्या खालीच राहील. राज्यात जूनमध्ये पावसाचे प्रमाण कमी होते. त्यानंतर जुलैमध्ये पावसाने सरासरी भरून काढली. ऑगस्टपर्यंत सर्वच भागांत पावसाने सरासरी पूर्ण केली आहे. सध्या राज्यातील पाऊस सरासरीच्या तुलनेत १८ टक्क्यांनी अधिक आहे.

अंदाज काय?

देशाच्या तीस ते चाळीस टक्के भागात सरासरीपेक्षा अधिक, तर पन्नास टक्के भागांत सरासरीनुसार पाऊस होण्याची शक्यता आहे.

रुद्रवर्षा कुठे?

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, पुणे, सोलापूर, नाशिक, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, वर्धा आदी जिल्ह्यांत या महिन्यात अधिक पाऊस होण्याचा अंदाज आहे.

परतीचा प्रवास कधी?

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात राजस्थानमधून पावसाच्या परतीचा प्रवास सुरू होण्याचे संकेत हवामान विभागाने गेल्या आठवड्यात दिले होते. मात्र, सध्या तरी पावसाच्या परतीच्या प्रवासाबाबतची स्थिती तयार झालेली नाही. त्याबाबतची स्थिती दिसून येताच, ती जाहीर केली जाईल, असे हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी सांगितले.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *