Headlines

मुक्त विद्यापीठाच्या परीक्षेत वादग्रस्त प्रश्न , एआयएसफ आक्रमक

मुक्त विद्यापीठाचे अभ्यासक्रमाचे पुस्तक रद्द करण्याचे व अभ्यासक्रम समिती बरखास्त करण्याची मागणी, छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्वामी रामदास यांच्याशी संबंध जोडणे तसेच मनुस्मृति या ग्रंथाचे समर्थन करणारे प्रश्न विचारल्याचा केला विरोध

बार्शी / प्रतिनिधी – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बी.ए. तृतीय वर्ष राज्यशास्त्राच्या परीक्षेत (288/BAC453/EE/20220712) 12 जुलै 2022 च्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न क्र. 2 (अ) मध्ये शिवाजी महाराजांच्या राजनीतिला समर्थ रामदासांनी केलेले योगदान सांगा तसेच प्रश्न क्र. 3 (ई) मध्ये मनुस्मृती या ग्रंथाचे सामाजिक महत्व स्पष्ट करा हे प्रश्न विचारण्यात आले होते. प्रागतिक विचारांचे यशवंतराव चव्हाण यांचे नाव असलेल्या मुक्त विद्यापीठात भारतीय संविधान विरोधी अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज व रामदास स्वामी यांची भेटच झाली नसल्याचे अनेक इतिहास संशोधकांनी व न्यायालयाने दिनांक 16 जुलै 2018 रोजीच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निकालात नमूद केले आहे.

मुक्त विद्यापीठाच्या पॉलीटिक्स 288 या पुस्तकातील अभ्यासक्रमात मनुस्मृती संदर्भात केलेले विवेचन घटनाविरोधी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी सातत्याने चुकीचा इतिहास सांगून बदनामी केली जात आहे. या दोन्ही विषयांच्या अनुषंगाने संविधान विरोधी मनुस्मृती या ग्रंथाचे समर्थन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी लिहिण्यात आलेल्या खोट्या इतिहासाला अभ्यासक्रमात स्थान देण्यात आले आहे. त्यामूळे अभ्यासक्रम समिती रद्द करावी, संबंधित अधिकाऱ्यांच निलंबन करावे, सदर प्रकारची संपूर्ण जबाबदारी घेत कुलगुरूंनी अभ्यासक्रमातील इतिहास द्रोही तसेच घटनाविरोधी लिखाण तात्काळ मागे घेऊन, प्रश्नपत्रिकेत विचारण्यात आलेल्या प्रश्नांबाबत यशवंत चव्हाण मुक्त विद्यापीठाने जाहीर माफी मागावी अशी मागणी ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (AISF) सोलापूर जिल्हा कौन्सिल च्या वतीने बार्शी तहसिलदारांना करण्यात आली आहे.

सदर कृत्याच्या निषेधार्थ AISF च्या वतीने दि. 15 जुलै 2022 वार शुक्रवार रोजी बार्शी तहसिलदारांना निवेदन सादर करण्यात आले.यावेळी ऑल इंडिया स्टुडंटस् फेडरेशन चे कॉम्रेड पवन आहिरे , कॉम्रेड दीपक कोकाटे, कॉम्रेड शुभम शिंदे , कॉम्रेड संदेश अंधारे, कॉम्रेड राकेश चांदणे, कॉम्रेड डॉ.प्रवीण मस्तुद उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *