Breaking Newsmass communicationsolapur university

विद्यार्थ्यांमधील सकारात्मक मानसिकता ऊर्जादायी : कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस

 विद्यार्थ्यांमधील सकारात्मक मानसिकता ऊर्जादायी : कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस


मास कम्युनिकेशन विभागातर्फे ऑनलाईन स्नेहसंमेलन व ‘विद्यावार्ता’चे प्रकाशन


सोलापूर/विशेष प्रतिनिधी – कोरोना महामारीच्या संकटात, लॉकडाऊन काळात  विद्यार्थ्यांनी सकारात्मक मानसिकता ठेवून वेळेचा सदुपयोग केला हे कौतुकास्पद आहे असे  गौरवोद्गार पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी काढले.

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सामाजिक शास्त्रे संकुलांतर्गत मास कम्युनिकेशन विभागातर्फे आयोजित ऑनलाईन स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन व ‘विद्यावार्ता’ या प्रायोगिक वार्तापत्राच्या प्रकाशनावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक प्रा. डॉ. गौतम कांबळे, संयोजक व विभागप्रमुख डॉ. रविंद्र चिंचोलकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या उपक्रमात मास कम्युनिकेशन , बी. व्होक तसेच अँकरिंग, डॉक्युमेंटरी मेकिंग आणि डिजिटल जर्नालिझम या  अभ्यासक्रमाचे विद्यार्थी सहभागी झाले होते . यात मास कम्युनिकेशन विभागांतील 45 विद्यार्थ्यांनी कथा, कविता , चारोळी,उत्स्फूर्त वक्तृत्व, एकपात्री,मिमिक्री , लघुपट इत्यादी कला गुणांचे सादरीकरण केले . यात विशेष सादरीकरणासाठी आमंत्रित केलेले माजी विद्यार्थी महेश कोटीवाले व निखिल भालेराव यांनी अनुक्रमे सादर केलेल्या मिमिक्रीने व गायनाने सर्वांची मने जिंकली.

कुलगुरु डॉ. फडणवीस पुढे म्हणाल्या की, कोरोनाने आपणा सर्वांनाच नव्या जबाबदारीची जाणीव करून दिली आहे. सामुहिक प्रयत्नातूनच कोणतेही संकट थोपवता येते हे दाखवून दिले आहे. लॉकडाऊन काळात विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी आपला वेळ नवोपक्रम व सर्जनशील कृतीतून व्यतीत केला आहे. याबाबतची मांडणी त्यांनी ‘विद्यावार्ता’मध्ये लेख लिहून केली आहे. मास कम्युनिकेशन विभागाने ऑनलाईन स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांमधील कलागुण विकसित करण्यासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. ही कौतुकास्पद बाब आहे. पुढील काळातही विद्यार्थ्यांनी आपल्यातील सकारात्मक मानसिकता वृद्धींगत करावी. स्वतःच्या, कुटुंबाच्या व मित्रपरिवाराच्या आरोग्यविषयक काळजीबाबत सजग राहावे.

 विद्यावार्ता अंक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक प्रा.डॉ. गौतम कांबळे म्हणाले की, मास कम्युनिकेशन विभाग हा सतत नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात अग्रभागी असतो. या विभागाने ऑनलाईन स्नेहसंमेलन आयोजित करून विद्यार्थ्यांमधील कलागुणांना मंच उपलब्ध करुन दिला. ‘विद्यावार्ता’ या अंकाचे नियोजन, संपादन, मांडणी अप्रतिम आहे. यातील लेख वाचनिय आहेत. विद्यार्थ्यांनी लॉकडाऊन काळात केलेले प्रयोग, अनुभव शब्दबध्द केले आहेत. हा उपक्रम कौतुकास पात्र आहे.

प्रारंभी विभागाचे प्रमुख डॉ. रविंद्र चिंचोलकर यांनी ‘विद्यावार्ता’चा लॉकडाऊन विशेषांक व ऑनलाईन स्नेहसंमेलनामागची भूमिका विशद केली. असे उपक्रम घेण्याच्या प्रक्रियेत कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस, संचालक प्रा. डॉ. गौतम कांबळे व विद्यापीठाचे पाठबळ मिळत असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांच्या मनातील सकारात्मक विचारांना पुढे आणण्यासाठी हा कार्यक्रम घेतल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अंबादास भासके व कु. तेजस्विनी कांबळे यांनी केले. पहिल्या व दुसर्‍या सत्राचे आभार अनुक्रमे डॉ. बाळासाहेब मागाडे व श्री. ऋषिकेश मंडलिक यांनी मानले. 


ऑनलाईन स्नेहसंमेलनात कलागुणांचा आविष्कार

दुसर्‍या सत्रात या स्नेहसंमेलनात जोया सुभेदार, विक्रम बरडे, अर्चना माने, शीला अडसुळे, बालाजी गुरव, डॉ. औदुंबर मस्के, उज्वला दंतकाळे, विजया कोकणे, विजय पारसेकर, मनमोहन भोसले, अब्दुल शेख, श्रद्धा राऊळ, वैष्णवी माळगे, अंबादास पोळ, नितीन ढवळे, महताब शेख, आसिफ मुलाणी, गणेश पवार, समर्थ सोरटे, विजयकुमार लोंढे, धनंजय पुराणिक, सद्दाम मुल्ला, विजया कोकणे, विनोद मोरे, शिवय्या स्वामी, नटराज बैटापल्ली, सुमित शिवशरण, विशाल पाटमस, सूर्यकांत माने, ईश्‍वर केरुरकर, सुहास भोसले, नितीन काजवे आदींनी बहारदार सादरीकरण केले. विक्रम बरडे, गणेश पवार, ऋषिकेश मंडलिक, विजया कोकणे यांच्या लघुपटाचे सादरीकरण झाले. याशिवाय विभागप्रमुख डॉ. रविंद्र चिंचोलकर, डॉ. अंबादास भासके, तेजस्विनी कांबळे, डॉ. बाळासाहेब मागाडे यांनीही कलागुण सादर केले. 

या ऑनलाईन स्नेहसंमेलनात 75 हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. अतिशय उत्साही वातावरणात हा कार्यक्रम पार पडला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!