Headlines

ncp supriya sule mocks gajanan kirtikar joins shinde group

[ad_1]

खासदार गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. एकीकडे किर्तीकर शिंदे गटात गेल्यामुळे ठाकरे गटाला मोठा झटका बसल्याचं मानलं जात असताना यामुळे ठाकरे गटाला काहीही फरक पडलेला नाही, असा दावा पक्षाचे ज्येष्ठ नेतेमंडळी करत आहेत. या पार्श्वभूमीवर किर्तीकर यांनी शिंदे गटात जाताच उद्धव ठाकरेंवर टीकास्र सोडलं होतं. त्यासोबतच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसलाही लक्ष्य केलं होतं. त्यासंदर्भात टीव्ही ९ शी बोलताना आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी किर्तीकरांना खोचक टोला लगावला आहे. तसेच, राज्यातून सध्या बाहेर जात असलेल्या प्रकल्पांवरूनही त्यांनी राज्य सरकारला लक्ष्य केलं आहे.

“प्रकल्प बाहेर जाण्याला सरकारच जबाबदार”

राज्यातून ऊर्जा उपकरणांचा एक प्रकल्प मध्य प्रदेशमध्ये गेल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात असताना उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्येच हा प्रकल्प बाहेर गेल्याचा खुलासा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यावर उत्तर देताना ही जबाबदारी राज्य सरकारचीच असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या. “प्रकल्प राज्याबाहेर जाणं ही त्या त्या वेळच्या सरकारचीच जबाबदारी असते.तुम्ही मायबाप सरकार आहात. जो सरकारमध्ये बसलेला असतो, त्याच्यावरच जबाबदारी असते”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

“मला अतिशय प्रांजळपणे मुख्यमंत्र्यांना विचारते की गेली ७ वर्ष तुम्ही सत्तेत आहात. अनेक मुख्यमंत्री होऊन गेले, तेव्हा तुम्ही सत्तेत होतात. देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तुम्ही मंत्री होतात. त्यामुळे ७ वर्षांमध्ये घडलेल्या घडामोडींमध्ये तुम्ही सहभागी आहात”, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही लक्ष्य केलं आहे.

“फुटीरांच्या प्रत्येक गटात एक शिंदे कायम असतो, राज्यात मध्यावधी…”, संजय राऊतांचं सूचक विधान!

एखादं वक्तव्य चुकीचं असेल, तर त्याची बाजू मी कधीच घेणार नाही. आपल्या लोकांच्या चुका लपवायच्या आणि दुसऱ्यांवर टीका करायची असं मी कधी करणार नाही. आमच्या लोकांकडून झालेल्या चुका मी कबूलही केल्या आहेत. प्रसंगी माफीही मागितली आहे.

किर्तीकरांना प्रत्युत्तर!

दरम्यान, गजानन किर्तीकर यांनी शिवसेनेत झालेल्या सर्व घडामोडींसाठी राष्ट्रवादी काँग्रेस जबाबदार असल्याची टीका केली होती. त्यावरून सुप्रिया सुळेंनी किर्तीकरांना खोचक टोला लगावला आहे. “राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप केल्याशिवाय बातमी कशी होणार? हे नाणं चालतंय मार्केटमध्ये. ठीक आहे. किर्तीकर हे खूप मोठे आणि ज्येष्ठ नेते आहेत. ते अनेक वर्ष आमचे मार्गदर्शक राहिले आहेत. त्यांना अधिकार आहे तो बोलायचा. पण शेवटी राष्ट्रवादीवर टीका केल्याशिवाय बातमी होत नाही ना”, असं त्या म्हणाल्या.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *